×

दाक्षिणात्यनंतर आता मराठी चित्रपटाचाही मोठ्या पडद्यावर राडा! ‘पावनखिंड’ने केली धमाल

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र ‘पावनखिंड’ चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत चित्रपटगृहात हाउसफुलचा बोर्ड कायम ठेवला आहे. या चित्रपटाच्या कमाईने आता अनेक चित्रपटांना आव्हान दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कथा, मांडणी, गाणी आणि कलाकारांचा अभिनय या सगळ्याच आघाडीवर यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. या चित्रपटाच्या यशाने सध्या सगळ्यांनाच विचार करायला लावले आहे. आजपर्यंत फक्त ‘पुष्पा’, ‘बाहुबली’ अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचीच देशभर चर्चा व्हायची. मात्र आता सगळीकडे फक्त ‘पावनखिंड’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रभर फक्त याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरसुद्धा ‘पावनखिंड’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट मराठी सिनेमा क्षेत्राला देशभर प्रसिद्ध करणार असल्याचीच चिन्हे सध्या दिसत आहेत. (marathi film pawankhind did marvaleous collection in its opening weekend)

साडे तीनशे वर्षापुर्वी घडलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जौहरच्या वेड्यातुन सोडवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडेंनी कशा प्रकारे जीवाची बाजी लावली आणि अतुल्य पराक्रम करत विरमरण पत्करले, याची कथा यामध्ये दाखविण्यात आली आहे. चित्रपट शिवजयंतीच्या एक दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या दिवसात या चित्रपटाने तब्बल १.५ कोटी रुपयाचा गल्ला जमावला आहे. त्याचबरोबर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सहा कोटीची कमाई केली आहे. त्यामुळेच हा चित्रपट आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला जोरदार टक्कर देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘पावनखिंड’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर,समीर धर्माधिकारी अशा दिग्गज कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. या कलाकारांच्या अभिनयाचे सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. स्वामीनिष्ठा, देशभक्ती, अतुल्य पराक्रम, शौर्य काय असते याचा अनुभव घ्यायचा असेल. तर हा चित्रपट प्रत्येकाने पाहायलाच हवा.

हेही पाहा – 

Latest Post