Tuesday, July 9, 2024

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी घेतला होता जगाचा निरोप

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दित प्रेक्षकांच्या मनावर मोठी छाप पाडली होती. या कलाकारांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. मात्र असेही अनेक अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपट जगतात होते ज्यांच्या करिअरची सुरूवात होत असतानाच त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. अशाच अभिनेत्रींच्या यादीत नाव घेतले जाते ते मोनल नवलचे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस सौंदर्याने मोनलने दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट जगतात आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली होती. मात्र अवघ्या वयाच्या २१ व्या वर्षी तिला जगाचा निरोप घ्यावा लागला. गुरूवार (१४ एप्रिल) मोनलचा स्मृतीदिन पाहूया या अभिनेत्रीच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी. 

अभिनेत्री मोनल नवलचा (Monal Naval) जन्म १९८१ मध्ये झाला होता, मात्र वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी या गुणी अभिनेत्रीने १४ एप्रिल २००२ रोजी या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री मोनल नवल प्रामुख्याने तेलगू, कन्नड सिनेमांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, परंतु तिने हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले होते.  मोनल नवलचे पूर्ण नाव राधा मोनल नवल होते. तिचे वडील अशोक नवल आणि आई सरथा नवल. मोनल नवलने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्ली आणि कॉलेज बॉम्बे येथे केले. मोनल नवलने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग, फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धांमधून केली आणि नंतर या माध्यमातून तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. त्यानंतर ती तमिळ तेलुगू आणि हिंदीमध्येही दिसली.

आपल्या अभिनय कारकिर्दिला तामिळ चित्रपटातून सुरूवात करणाऱ्या मोनालने ‘मां तुझे सलाम’ या चित्रपटातही काम केले होते. ज्यामध्ये ती अभिनेता अरबाज खानसोबत दिसली होती. मोनल नवलने अरबाज खानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र या प्रतिभावान अभिनेत्रीच्या मृत्यूने मात्र सर्वांनाच हादरवून टाकले. मोनल नवलने १४ एप्रिल २००२ रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. चेन्नईतील एका खोलीत तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिला नैराश्येपोटी जीव दिल्याचे बोलले जात होते. तसेच ती डिप्रेशनची शिकार झाली होती अशीही माहिती समोर आली होती. मोनलने तमिळ, तेलुगू व्यतिरिक्त हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा