नाचा रे! मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय

Mumbai Healthcare Proffesionals At Corona Virus Centre Show Dance Moves


मराठी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली आहे. पण एक असा चित्रपट सन २०१६ साली प्रदर्शित झाला, ज्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणावा लागेल. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धमाल केली. यापूर्वी असा चित्रपट कदाचित कोणीच पाहिला नसावा. आता तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की, नेमका तो चित्रपट आहे तरी कोणता? तर तो चित्रपट म्हणजेच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ होय. सैराट चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही कमालीची लोकप्रिय झाली. आजही त्यातील गाणी कानावर पडली की, आपसूकच आपले पाय थिरकू लागतात. असेच काहीसे आता एका रुग्णालयात पाहायला मिळाले आहे, जिथे डॉक्टर्ससह परिचारिकाही ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला आहे. सर्वांचीच दैना झाली आहे. प्रत्येकजण चिंतेत दिसत आहे. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सर्वांचे मन जिंकले आहे. हा व्हिडिओ आहे मुंबईतील गोरेगावमधील एका कोव्हिड सेंटरचा.

खरं तर मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को कोविड- १९ केंद्राला बुधवारी (२ जून) एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त आयोजित केलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमावेळी आरोग्यसेवा कर्मचारी रूग्णाच्या वॉर्डमध्ये नाचताना दिसले. यावेळी केंद्राने हा कार्यक्रम केवळ एक वर्ष पूर्ण झाले म्हणून नव्हे, तर गेल्या वर्षी देशभर पसरलेल्या कोविड- १९मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांना तणावमुक्त करण्यासाठी आयोजित केले होते.

यावेळी डॉक्टरांसोबतच परिचारिकांनीही ‘झिंगाट’ या प्रसिद्ध गाण्यावर मोकळेपणाने डान्स केला आणि या आव्हानात्मक काळात लहान पण आठवणीत राहील अशा क्षणाचा आनंद लुटला. यावेळी काहींनी तर थेट खाटांवर चढून धमाकेदार डान्स मुव्हज केले. उपस्थितांनीही या क्षणाचा आनंद घेतला.

या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण यावरून बांधू शकतो की, ऍनी या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त काहींनी यावर संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत “व्हायरस डिटॉक्स,” असे लिहिले. दुसर्‍याने लिहिले की, “ते प्रत्येक मजेसाठी पात्र आहेत. ते सतत लोकांना मदत करत होते. त्यांना सलाम.”

एका युजरने असेही म्हटले की, “आम्ही पृथ्वीवरील सर्वात प्रख्यात लोक आहोत. यामुळे मला माझ्या देशाबद्दल विशेष वाटते. जेव्हा साथीचा रोग सर्व देशभर सुरू झाला, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की, आपण या कोव्हिडविरुद्ध जिंकू.”

सैराटमधील गाण्यांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात झिंगाटव्यतिरिक्त ‘याड लागलं’, ‘आताच बया का बावरलं’, ‘सैराट झालं जी’ यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसिद्ध कलाकारांना घेऊन न बनवता, नवख्या चेहऱ्यांना संधी दिली होती, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. सैराट चित्रपटाने तब्बल ११० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत होते. त्यांनी आपली एक वेगळीच ओळख तयार केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.