Friday, April 19, 2024

शाहरुखच्या बंगल्यापेक्षाही जास्त संपत्तीचे मालक आहेत नसीरुद्दीन शाह, महिन्याला एक, तर वर्षाला कमावतात १२ कोटी

नसीरुद्दीन शाह म्हणजे अभिनयाचे एक विद्यापीठच जणू! साधारण चेहरा असला तरी त्यांच्या अभिनयापुढे चेहरा नेहमी दुय्यम ठरला किंबहुना अजूनही ठरतोय. सशक्त अभिनय, दमदार आवाज या दोन गोष्टींच्या बळावर त्यांनी त्यांचे विश्व निर्माण केले आहे. थिएटरपासून चित्रपटांपर्यंत नसीरुद्दीन शाह यांनी अनेक नावाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केले आणि त्यांना अजरामर केले. मागच्या ४६ वर्षांपासून नसीर साहेब अविरत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सिनेमांमध्ये त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. त्यांना केवळ पडद्यावर अभिनय करताना बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. आज नसीरुद्दीन शाह हे मोजक्याच मात्र अतिशय अविस्मरणीय भूमिका साकारताना दिसतात. १९७५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा ‘निशांत’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात त्यांची व्यक्तीरेखा जरी छोटी असली, तरी बॉलिवूडला एक तगडा कलाकार मिळाला. बुधवारी (दि. २० जुलै) नसीरुद्दीन शाह त्यांचा ७२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

नसीरुद्दीन शाह यांचा जन्म २० जुलै, १९४९ रोजी उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर साहेब यांनी अलीगढ विद्यापीठातून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नसीर साहेबांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर नसीर यांनी त्यांचा मोर्चा सिनेमाकडे वळवला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, त्यांनी अभ्यासापासून वाचण्यासाठी अभिनयाची वाट धरली होती. ते अभ्यासात खूपच साधारण असल्यामुळे, नेहमी शाळेत मार खायचे. यावर उपाय म्हणून त्यांनी करियरसाठी सिनेमांची निवड केली.

सन १९७५ मध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांचा अतिशय छोटा रोल होता, पण नसीर साहेबांनी हीच संधी समजली आणि त्याचे सोने केले. भूमिका छोटी नक्कीच होती मात्र याच भूमिकेमुळे सर्वानी त्यांच्यातली प्रतिभा ओळखली आणि चित्रपटांनी त्यांच्यासाठी दरवाजे उघडले. यानंतर ‘भूमिका’, ‘स्पर्श’, ‘आक्रोश’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी दिली ती १९८० साली आलेल्या ‘हम पांच’ सिनेमाने. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम केले. यात चित्रपटांमध्येही त्यांनी त्यांची वेगळी ओळख कायम ठेवली. नसीर साहेबांनी त्यांच्या ४६ वर्षाच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे एक वेगळी ओळखही मिळाली. शिवाय अनेक किस्से किंवा संस्मरणीय गोष्टी देखील घडल्या.

नसीरूद्दीन शाह यांच्या सिनेमात येण्यापूर्वी नसीर यांचे एका मुलीसोबत अफेयर होते, पण अफेयरच्या काही दिवसानंतर तिचे आणि नसीर साहेबांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअप करताना तिने जे कारण दिले होते, ते कारण तर काही अंशी बरोबर होते. मात्र, आज त्या मुलीला पश्चाताप होत असेल. त्या मुलीने ब्रेकअप करताना नसीर साहेबांना सांगितले की, “तू हिरोसारखा आकर्षक दिसत नाहीस.” मात्र ते हिरोसारखे दिसत नसल्यामुळेच त्यांना श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात ब्रेक मिळाला होता.

नसीर साहेबांनी त्यांच्या चित्रपटांमुळे त्यांच्या अभिनयामुळे खूप प्रसिद्धी मिळवली, पण तेवढीच प्रसिद्धी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मिळाली. नसीर साहेबांचे पहिले लग्न त्यांच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या मनारा सिकरी यांच्याशी झाले होते. मनारा यांना परवीन मुराद या नावाने सुद्धा ओळखले जायचे. मनारा या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या बहीण होत्या. लग्नाच्या वेळी नसीर २० तर मनारा सिकरी ३४ वर्षांच्या होत्या.

अलिगढ युनिव्हर्सिटीत शिकत असताना नसीर आणि मनारा यांची भेट झाली. त्यानंतर नसीर यांनी मनारा यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. कारण, मनारा घटस्फोटित आणि एका मुलाची आई होत्या, पण घरच्यांचा विरोध झुगारुन त्यांनी १९६९ साली मनारा यांच्यासोबत लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून नसीर यांना एक मुलगी असून तिचे नाव हिबा आहे. मात्र, पुढे काही काळातच त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

पुढे काही काळाने नसीर साहेबांची भेट नाट्यकार सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ नाटकाच्या सरावादरम्यान अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी झाली. काही काळाने हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रत्ना या नसीर यांच्या पेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. या दोघांनी १ एप्रिल, १९८२ रोजी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. यांच्या लग्नाला आता ४० वर्षे झाली आहेत. या दोघांना ईमाद आणि विवान ही दोन मुले आहेत. ईमाद ‘यू होता तो क्या होता’, तर विवान ‘सात खून माफ’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटांमध्ये झळकला आहे. मनारा यांच्या निधनानंतर हिबा नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच राहते.

करिअरमध्ये नसीर साहेबांनी २४० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. ‘आक्रोष’, ‘चक्र’, ‘मासूम’, ‘सर्फरोश’, ‘कर्मा’, ‘जाने भी दो यारो’, ‘अलर्बट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘इक्बाल’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘देढ इश्किया’,’भवनी भवाई’, ‘मासूम’, ‘अर्धसत्य’, ‘मंडी’, त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘गुलामी’,‘मोहरा’ आदी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. तर त्यांनी ‘भारत एक खोज’ आणि ‘मिर्जा गालिब’ या मालिकांमध्ये दमदार भूमिका केल्या आहे. त्यांनी उतार वयातही ‘डर्टी पिक्चर’, ‘सात खून माफ’, ‘बेगम जान’, ‘डेढ़ इश्किया’ या चित्रपटांमध्ये लव मेकिंग सीन दिले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, नसीर यांच्याकडे एकूण ३६५ कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. ते महिन्याला १ आणि वर्षाला १२ कोटींहून अधिक रुपये कमावतात. एका वृत्तानुसार, नसीर यांनी नाटक, चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून ही संपत्ती मिळवली आहे. नसीरुद्दीन शाह यांना आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वश्रेष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना एक्स बॉयफ्रेंड विक्रम भटांनी झाप झाप झापलं; म्हणाले, ‘ती जगातली…’

‘या’ धमाकेदार वेबसिरीजमधून अभिनेत्री काजोल करणार ओटीटी पदार्पण, चाहत्यांना लागली उत्सुकता

खरं की काय! अजयच्या चित्रपटात काजोल करणार शाहरुखसोबत रोमान्स?, एका क्लिकवर घ्या जाणून

हे देखील वाचा