Tuesday, April 23, 2024

“हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” नवीन शोमध्ये दिसणार भाऊ आणि निलेश साबळे

आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येतेय. डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार असून या कार्यक्रमाचे नाव आहे, “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!” या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत.


तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.

डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही डॅा निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॅामेडीचे जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता लोटपोट हसण्यासाठी सज्ज रहा आणि पहायला विसरू नका, “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!” फक्त कलर्स मराठीवर!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आयुष्मान खुराना बनला युथ आयकॉन, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्याला ही मोठी जबाबदारी
अजयच्या वाढदिवसानिमित्त ‘मैदान’चे प्रमोशन करताना दिसला अक्षय कुमार, सोशल मीडियावर लिहिली स्पेशल नोट

हे देखील वाचा