हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल अभिनेत्रींमध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री नुसरत भरुचाचा (Nushrrat Bharuccha) नवा चित्रपट ‘जनहित में जारी’ तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या चित्रपटात नुसरतने कंडोम विक्रेतीची भूमिका साकारली होती. याबद्दल बोलताना ती म्हणते, “चित्रपटातील माझे पात्र जितके मनोरंजक आहे, तितकेच ते आव्हानात्मक आहे. खऱ्या आयुष्यात एखादी स्त्री केमिस्टच्या दुकानात जाऊन कंडोम मागते, तर लोकांची खूप विचित्र प्रतिक्रिया असते. गावात असे काही घडले, तर ती ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरायला वेळही लागत नाही. अजूनही लोक कंडोमबद्दल बोलायला घाबरतात, ते विकत घेणे तर लांबच राहिले.”
आयुष्मान खुरानासोबत तुलना
‘ड्रीमगर्ल’मध्ये अभिनेता आयुष्मान खुरानासोबत (Ayushman Khurrana) काम केलेल्या नुसरत भरुचाची आजकाल त्याच्याशी खूप तुलना केली जात आहे. ती म्हणते, “मी आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल’मध्ये काम केले आहे. त्यामुळे लोक मला ‘फिमेल आयुष्मान खुराना’ या नावानेही हाक मारतात. आयुष्मान ज्या प्रकारे करत आहे, जर मी त्याच्यासारखे थोडेसे करू शकले, तर मला खूप आनंद होईल.” (nushrratt bharuccha speaks about her character in upcoming film janhit mein jaari)
प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून कथा
नुसरत भरुचा म्हणते, “जेव्हाही मला एखाद्या चित्रपटाची ऑफर येते, तेव्हा मी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून स्क्रिप्ट ऐकते आणि एक प्रेक्षक म्हणून मी हा चित्रपट तिकीट विकत घेऊन पाहू शकेन का, असा प्रश्न पडतो. जर मला हो वाटत असेल, तरच मी चित्रपट साइन करते. आता असे सिनेमे बनवले जात आहेत की, प्रेक्षकही महिला मुख्य भूमिका असलेले चित्रपट पाहण्याचा आनंद घेत आहेत.”
कंडोमबद्दल बोलावेच लागेल
सध्या अभिनेत्री नुसरत भरूचा सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. कंडोम विक्रेतीच्या भूमिकेमुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. नुसरत म्हणते, “पूर्वी जेव्हा मी सोशल मीडियावर काही पोस्ट करायचे, तेव्हा लोक काय कमेंट करतात हे पाहण्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये जात नसे. पण आता मी असा चित्रपट करत आहे, तर त्याबद्दल उघडपणे बोलायला काय हरकत आहे?”
‘कोणाचे विचार नाही बदलू शकत’
हटके चित्रपटांतून आपला ठसा उमटवण्याचा सतत प्रयत्न करणारी नुसरत भरूचा म्हणते, “सर्वांना कंडोमबद्दल माहिती आहे पण कोणीही त्याबद्दल उघडपणे बोलत नाही. महिलांनी याबाबत पुरुषांपेक्षा अधिक जागरूक असले पाहिजे, कारण ही समस्या पुरुषांची नसून महिलांची आहे. आज दरवर्षी एक कोटी गर्भपात होत आहेत. या चित्रपटाद्वारे आपण कोणाचीही विचारसरणी बदलू शकत नाही. कारण जोपर्यंत मनुष्याला स्वतःवर कोणतीही समस्या येत नाही, तोपर्यंत तो बदलत नाही.”
सध्या ‘जनहित में जारी’ चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा