Friday, August 1, 2025
Home मराठी ‘नजीकच्या भविष्यासाठी ओटीटी हा ‘सर्कल ऑफ होप’’, चित्रपट जाणकारांचे मत

‘नजीकच्या भविष्यासाठी ओटीटी हा ‘सर्कल ऑफ होप’’, चित्रपट जाणकारांचे मत

लॉकडाऊन काळात चित्रपटगृहे बंद असताना ‘ओव्हर द टॉप’ अर्थात ओटीटीमुळे मनोरंजन क्षेत्र तरले. नजीकच्या भविष्यातही निर्माते, दिग्दर्शक यांसारखी जी लोकं कन्टेट बनवू इच्छित आहेत, मात्र तो कुठे प्रदर्शित करायचा या बद्दल साशंक आहेत, अशांसाठी ओटीटी हा ‘सर्कल ऑफ होप’म्हणून पुढे येईल, अशी मते चित्रपट क्षेत्राशी संबंधित मान्यवरांनी व्यक्त केली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व पिफ यांच्या वतीने १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत ‘चित्रपटगृह की ओटीटी?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर, अभिनेते आणि ‘वन ओटीटी’ या आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा स्वप्नील जोशी, चित्रपट वितरक व सल्लागार म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे डॉ. अजय फुटाणे यांच्याशी या वेळी विनोद सातव यांनी संवाद साधला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते.

आपल्या ओटीटीच्या अनुभवाविषयी सांगताना अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा एकत्रित अभिनय असलेला ‘एबी आणि सीडी’ हा माझा चित्रपट लॉकडाऊन सुरू झाल्याने ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी पडला. मात्र ओटीटीमुळे मला त्याचे सर्व पैसे मिळाले. माझ्या सारख्या अनेक जणांना या ओटीटीने कोविड काळात तारले.”

candid talks pune film festival
candid talks pune film festival

आजवर मराठी चित्रपट सृष्टीने मला खूप काही दिले. आता या इंडस्ट्रीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या परिसंस्थेला परत काहीतरी देण्याच्या विचारातून मी ‘वन ओटीटी’ हे व्यासपीठ घेऊन येत आहे. यामध्ये मराठी, गुजराती, भोजपुरी, बंगाली या भाषांमध्ये कन्टेट देण्याची इच्छा असल्याचे स्वप्नील जोशी यांनी नमूद केले. ‘समांतर’च्या यशाने या सर्व प्रयत्नांना एक हेडस्टार्ट तर दिलाच शिवाय आमचा आत्मविश्वास वाढविला, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक दशकात चित्रपटाचा प्रवास बदलत आहे. भिंगामधून पाहिला जाणारा चित्रपट, टूरिंग टॉकिज, तंबू, एकपडदा चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, आयमॅक्स, डॉल्बी, टू डी, फाईव्ह डी या बदलणा-या तंत्रज्ञानामुळे क्रांती होत असून चित्रपट आज लोकल टू ग्लोबल प्रवास करत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत डॉ. फुटाणे म्हणाले, “मनोरंजन ही आज मूलभूत गरज झाली असून भारत हे संपूर्ण जगाचे सर्वांत मोठे मनोरंजन मार्केट आहे. चित्रपटगृहासोबतच आता ओटीटी हा पर्याय उभा राहत असला तरी स्पर्धा राहणार असून हे दोन्ही पर्याय सख्या चुलत भावंडांप्रमाणे पुढे जातील.” आता यापुढे आपला चित्रपट हा कोणत्या माध्यमातून प्रदर्शित करायचा आहे याचा विचार लेखकाने चित्रपट लिहिण्याच्या सुरुवातीपासून करायला हवा तरच त्या त्या माध्यमांच्या आधारे चित्रपटाला न्याय देणे शक्य होईल, असे मत स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केले.

आज जगभराचा विचार केल्यास मराठी भाषेचा प्रेक्षक दुस-या क्रमांकावर असून प्रादेशिक भाषांना ओटीटी व्यासपिठावर मोठी संधी आहे, इतकेच नव्हे तर प्रादेशिक कन्टेट देणारे ओटीटी महत्वाची भूमिका पार पाडतील असे बरदापूरकर यांनी सांगितले. भारतात इंटरनेटचा डेटा हा स्वस्त आहे, किंबहुना आपण फ्री डेटाच वापरतो. प्रत्येक घरात किमान एक स्मार्टफोन आहे. त्यातही तो घरातील गृहिणी किंवा मुलांकडे असतो. त्यामुळे हाच आमचा टार्गेट ऑडीयन्स आहे, असेही बर्दापूरकर यांनी नमूद केले.

प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि चित्रपत निर्माते यांना कोविड नंतरच्या काळात आज अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा आणि ओटीटी माध्यम समजून घेण्याचा एक प्रयत्न या चर्चासत्राद्वारे करीत असल्याचे मेघराज राजे भोसले यांनी सांगितले. ओटीटी माध्यमाबद्दल अनेक शंका आज चित्रपटाशी संबंधित अनेकांमध्ये आहेत. चित्रपट तयार झाल्यानंतर त्याचे वितरण, प्रदर्शन आदी निर्मात्यांसमोरील प्रश्न सोडविण्याचा एक प्रयत्न या चर्चासत्राद्वारे पिफच्या माध्यमातून होत असल्याचे डॉ. पटेल म्हणाले.

हेही वाचा- 

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

हे देखील वाचा