Thursday, December 5, 2024
Home कॅलेंडर पाकिजा@४९: दिग्दर्शकाची पत्नीच अभिनेत्री, दोघांमधील वादामुळे १६वर्षे लांबला चित्रपट; शुटींग दरम्यान दारु पिऊन बेशुद्ध झालेली ‘मीनाकुमारी’

पाकिजा@४९: दिग्दर्शकाची पत्नीच अभिनेत्री, दोघांमधील वादामुळे १६वर्षे लांबला चित्रपट; शुटींग दरम्यान दारु पिऊन बेशुद्ध झालेली ‘मीनाकुमारी’

‘पाकिजा’ हा सिनेमा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुंदर स्वप्न.1972 साली आलेल्या या सिनेमाने इतिहास रचला. एका वेश्येची अतिशय मार्मिक कथा या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. मीनाकुमारी आणि राजकुमार यांचा प्रभावी अभिनय, कमाल अमरोही यांचे जबरदस्त दिग्दर्शन यांमुळे देखील हा सिनेमा विशेष गाजला. लता मंगेशकर यांच्या रसाळ आणि सुमधुर आवाजातील गाण्यांनी या सिनेमाला चार चाँद लावले.

सिनेमा तयार करायला तब्बल 16 वर्ष इतका मोठा कालावधी लागला. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा 1 वर्षाचा काळ सर्व विसरले आणि खुल्या हातांनी प्रेक्षकांनी या सिनेमाचे स्वागत केले. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर एकच महिन्याच्या आत मीनाकुमारी यांनी या जगाचा निरोप घेतला. 4 फेब्रुवारी 1972 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. या वर्षी या सिनेमाने 50 वर्ष पूर्ण करत 51 व्या वर्षात एन्ट्री केली आहे. त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊया या सिनेमातील काही खास आणि रंजक गोष्टी.

मीनाकुमारी आणि कमाल अमरोही ही पति पत्नींची जोडी या सिनेमातून अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. लग्नानंतर कमाल यांनी मीनाकुमारी यांच्यावर अनेक नियम लादले. त्यामुळेच ह्या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आणि काही वर्षातच या दोघांमध्ये मनमुटाव आला. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या भांडणांमुळे ‘पाकिजा’ चित्रपटावर परिणाम व्हायला सुरुवात झाली.

Pakeezah
Pakeezah

पुढे काही काळातच हा सिनेमा बंद झाला. मात्र याचा वाईट परिणाम चित्रपटाशी संबंधित इतर लोकांवर झाला. यामुळे कमाल यांनी मीनाकुमारी यांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी म्हटले होते, “मला माहित आहे की, तुम्ही फक्त एकाच अटीवर ‘पाकिजा’ करायला तयार व्हाल. ती अट म्हणजे, मी तुम्हाला घटस्फोट देणे. मला तुमची ही अट मान्य आहे. मी तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करायला तयार आहे.

या सिनेमासोबत अनेक लोकांचे जीवन जोडलेले आहे. त्यामुळेच तुम्ही हा सिनेमा नक्की पूर्ण करा.” कमाल यांच्या या पत्राला उत्तर देताना मीनाकुमारी यांनी लिहिले, “हा सिनेमा पूर्ण करायला मला सुद्धा खूप आनंद होणार आहे. पण मला या सिनेमाबद्दल मानधन म्हणून फक्त एक रुपया द्या.”

‘पाकिजा’ सिनेमा बनवताना सर्वानीच अनेक प्रकारचे जुगाड केले होते. हे जुगाड करताना प्रेक्षकांना कुठेही थांगपत्ता लागणार नाही ही काळजी जरूर घेतली गेली. या सिनेमात आधी मीनाकुमारी यांच्यासोबत धर्मेंद्र यांची जोडी होती. मात्र, शूटिंगच्या वेळी धर्मेंद्र आणि मीनाकुमारी यांच्यात जवळीक वाढायला लागली होती. जेव्हा कमाल अमरोही यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी कोणाही मागचा पुढचा विचार न करता धर्मेंद्र यांना सिनेमातून काढून टाकले. त्यावेळी धर्मेंद्र यांच्यासोबत सिनेमाचे बरेच शूटिंग झाले होते.

यानंतर या सिनेमात राजकुमार यांची वर्णी लागली. त्याकाळी कॅमेराला लावण्यात येणार रीळ रोल खूप महाग असायचा. त्याचा पुन्हा होणार खर्च टाळण्यासाठी त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत शूट केलेले काही सीन्स राहू दिले होते. म्हणजेच लॉन्ग शॉट, पाठमोरा शॉट तसाच होता, फक्त क्लोज अप शॉट त्यांनी राजकुमार यांच्यासोबत पुन्हा शूट केले.

शूटिंगच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये एकदा दिग्दर्शक कमाल अमरोही आणि मीनाकुमारी मध्यप्रदेशच्या शिवपुरी परिसरात गेले होते. परत येताना त्यांची पेट्रोल संपल्यामुळे गाडी बंद पडली. दूरदूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते. त्यामुळे हे दोघे रात्री गाडीत बसून होते. तेव्हा साधारण 2 वाजेच्या दरम्यान काही लोकांचा एक समूह त्यांच्या गाडीजवळ आला, त्या समूहाच्या मुख्य माणसाने इतर समूहाच्या लोकांना मीनाकुमारी यांच्यासोबत भेट घालून दिली.

त्यांची जेवणाची, पाणी पिण्याची व्यवस्था केली. तेव्हा त्यांचा मुख्य माणूस एक चाकू घेऊन आला आणि मीनाकुमारींना म्हणाला मी तुमचा खूप मोठा फॅन आहे कृपया मला चाकूने हातावर सही द्या. आधी त्यांनी सही द्यायला नकार दिला, मात्र त्या माणसाने खूप आग्रह केल्यावर त्यांनी त्याला सही दिली. तो माणूस म्हणजे मध्यप्रदेशमधील कुख्यात गुंड अमृतलाल होता.

हा सिनेमा बंद पडल्यानंतर जेव्हा पुन्हा सुरु झाला तोपर्यंत मीनाकुमारी यांना दारू पिण्याचे मोठे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांची तब्येत खूप ढासळायला लागली होती. एक दिवस एका गाण्याचे शूटिंग करत असताना मीनाकुमारी अचानक बेशुद्ध झाल्या. त्यामुळे कमाल यांनी त्या गाण्याच्या डान्सचे शूटिंग बॉडी डबल वापरून पूर्ण केले.

मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वादामुळे हा सिनेमा बंद झाला होता. मात्र जेव्हा हे शूटिंग पुन्हा सुरु झाले तेव्हा मीनाकुमारी यांच्या शरीरात खूप बदल झाला होता. त्यांचा चेहेरा देखील बदलला होता. त्यामुळे अनेक गाण्यांमध्ये त्यांचा चेहेरा ओढणीने लपवला आहे. तर काही ठिकाणी लॉन्ग शॉटने काम चालवले आहे.

Pakeezah 2
Pakeezah

हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यावर अनेक टीका झाली. 16 वर्ष रखडलेला सिनेमा फ्लॉपच असणार असे आधीपासूनच बोलायला सुरुवात झाली होती. झालेही तसेच खूप गाजावाजा करून ह्या सिनेमाचा प्रीमियर संपन्न झाला. मात्र प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे काही चित्रपटगृहांनी हा सिनेमा उतरवला.

जेव्हा मीनाकुमारींना हे समजले तेव्हा त्यांनी खूप आजारी असून देखील आकाशवाणीवर एक मुलाखत दिली. ही मुलाखत ऐकून काही जणं हा सिनेमा पाहायला गेले सुद्धा. पण दुर्दैवाने मुलाखतीनंतर काही दिवसांनी मीनाकुमारींनी या जगाला अलविदा म्हटले. त्यांच्या जाण्याचे वृत्त येताच लोकांनी पुन्हा हा सिनेमा पाहायला सुरुवात केली, आणि पुढे जाऊन हा सिनेमा सुपरडुपर हिट सिद्ध झाला.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा