Thursday, March 28, 2024

B’day special | परेश रावल यांना पहिल्या नजरेत झालं होतं थेट ‘मिस इंडियाशी’ प्रेम; झाडाखाली 9 पंडितांसमोर घेतले होते सात फेरे

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल (paresh raval)आपल्या उत्कृष्ट चित्रपटांद्वारे, गेल्या ४ दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. त्यांच्या व्यावसायिक जीवनाविषयी बऱ्यापैकी चाहत्यांना माहिती असेल. पण कदाचित त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती नसेल. तुम्हाला माहित आहे का? परेश रावल यांचे लग्न एका माजी मिस इंडियाशी झाले होते. होय, अभिनेत्याने माजी मिस इंडिया स्वरूप संपतशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. परेश रावल मंगळवारी (30 मे)ला त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टाेरीबद्दल…

200पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम
परेश रावल यांचा जन्म 30 मे, 1955 रोजी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालय नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स एँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले. परेश यांनी सुरुवातीपासूनच ठरवले होते की, त्यांना चित्रपटांमध्येच कारकीर्द करायची आहे. यामुळे ते त्यांच्या महाविद्यालयातही अभिनयासाठी खूप प्रसिद्ध होते. परेश यांनी आजपर्यंत तब्बल 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोदीसह त्यांनी खलनायकाच्या व्यक्तिरेखा देखील साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाची कहाणी देखील बरीच रंजक आहे.

या चित्रपटात स्वरूप संपत यांनी केलंय काम
स्वरूप संपत यांनी 1979मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावे केला होता. चित्रपटसृष्टीतही त्यांनी बरीच कामे केली आहेत. स्वरूप संपत यांनी ‘ये जो है जिंदगी’ या कॉमेडी टीव्ही शोमध्ये उत्तम काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘नरम गरम’ (1981), ‘साथिया’ (2002) आणि 2019मध्ये आलेल्या ‘उरी’ चित्रपटातही काम केले आहे. चित्रपटात काम करण्यासोबतच स्वरूप संपत आता विशेष मुलांना अभिनय शिकवतात.

पहिल्या नजरेतच झालं होतं प्रेम
एका मुलाखती दरम्यान परेश रावल म्हणाले होते की, “स्वरूप संपत यांचे वडील भारतीय राष्ट्रीय रंगमंचाचे निर्माता होते. मी माझ्या काही मित्रांसोबत बंगाली नाटक पाहण्यासाठी गेलो होतो, तेव्हा तिथे मला स्वरुप पहिल्यांदा दिसली आणि मी तिच्या प्रेमात पडलो. शेजारी बसलेल्या माझ्या मित्राला मी सांगितले की, एक दिवस ही मुलगी माझी बायको होईल. त्यानंतर माझ्या मित्राने मला विचारले, ती कोणाची मुलगी आहे, हे तरी तुला माहित आहे का? मी मात्र मनापासून सांगितले होते की, एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल.”

अशी सुरू झाली लव्हस्टोरी
परेश रावल यांनी सांगितले की, त्या दिवसापासून 1 वर्ष स्वरूप संपत यांच्याशी त्यांचे बोलणे झाले नव्हते. असेच एक दिवस परेश रावल यांचे नाटक पाहिल्यानंतर, स्वरूप त्यांना भेटण्यासाठी बॅकस्टेजवर आल्या आणि त्यांनी विचारले की, “ऐका, तुमचे नाव काय आहे?” या प्रश्‍नानंतर परेश आणि स्वरूप यांच्या खास भेटी सुरू झाल्या आणि मैत्रीही झाली.

ही मैत्री काही दिवसातच प्रेमात बदलली. या जोडप्याने मुंबईतील लक्ष्मीनारायण मंदिरात लग्न केले होते. असे म्हटले जाते की, या लग्नात मंडप नव्हता, तर त्यांनी झाडाखालीच केवळ 9 पंडितांसमोर सात फेरे घेतले होते. या जोडप्याला २ मुले आहेत अनिरुद्ध आणि आदित्य, ज्यांच्यासोबत परेश आणि स्वरूप मुंबईत राहतात.

परेश रावल यांचे गाजलेले चित्रपट
तसे पाहिले तर परेश रावल यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘उरी’, ‘वेलकम’, ‘हंगामा’, ‘गरम मसाला’, ‘संजू’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.(paresh rawal wife swaroop sampat love story interesting facts birthday special)

हे देखील वाचा