मराठी रंगभूमीवरील खरे महाराज आणि अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रशांत दामले (Prashant Damle) ओळखले जातात. प्रशांत यांनी त्यांच्या अभिनयाने आणि उत्कृष्ट नाटकांनी रंगभूमीला एक नवीन चकाकी मिळवून दिली. प्रशांत दामले खऱ्या अर्थाने रंगभूमीवर राज्य करतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चित्रपटांपेक्षा अधिक नाटकांमध्ये रमणारे प्रशांत दामले सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या नाटकांच्या संबंधित पोस्ट आणि त्यांची विविध मतं या माध्यमाच्या मार्गातून मांडत असतात. सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रशांत दामले अनेकदा लाइमलाईट्मधे येत असतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमधून त्यांनी करोना आणि निर्बंधाबाबत भाष्य केले आहे.
प्रशांत दामले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात अस झालय.. सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर”. नेहमीच नाटक संपले की, प्रेक्षक कलाकारांना भेटून त्यांचे कौतुक करत त्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी प्रोत्साहित करतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील हे खास नाही अविस्मरणीय क्षण नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक दोघांसाठी विशेष असतात. मात्र कोरोनामुळे असलेली बंधनं सध्या या खास क्षणाच्या आड येत आहे. कोरोनाचे नियम लक्षात घेऊन जरी सरकारने नाट्यगृह आणि मनोरंजनाची ठिकाणं सुरु केली असली, तरी त्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन केले जाते. यामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांची नाटकानंतर होणारी भेट सध्या बंद आहे. यामुळेच प्रशांत दामले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
प्रशांत दामलेंच्या या पोस्टवर सर्वच नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या या पोस्टवर समर्थन दिले आहे. यासोबतच त्यांना भेटता न आल्याचे दुःख देखील त्यांनी व्यक्त केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले, “प्रशांत दादा तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद. दोन वर्षानंतर नाटक बघितलं आणि दोन वर्षांची कसर भरून निघाली. असच काम करत रहा स्वस्थ रहा मस्त रहा. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.” दुसऱ्याने लिहिले, “इतक्या दिवसांनी तुम्ही रत्नागिरीत आलात तरी या बंधनामुळे तुम्हाला भेटणे टाळले. याशिवाय आमसूल, आमरस, कुळीथ पीठ आदी कोकणाचा मेवा देखील तुम्ही मिस केला.” या सर्व कमेंट्स दामले यांनी देखील कमेंट्स करत लवकरच सर्व सुरळीत होईल अशी अशा व्यक्त केली आहे.
हेही वाचा-