मागील काही काळापर्यंत फक्त प्रेमकथा म्हणजेच लव्हस्टोरी पर्यंतच सीमित असणाऱ्या बॉलीवूडवर अनेक टीका झाल्या. बॉलीवूडमध्ये लव्हस्टोरी व्यतिरिक्त दुसरे काही नाही असे म्हणणाऱ्यांना आता टीका करण्यासाठी वेगळा विषय आठवावा लागणार आहे. कारण मागील काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आहे. ऐतिहासिक, खेळ, राजकारणापासून ते पर्यावरण,महिला प्रधान आदी. मग जागरूक प्रेक्षक असल्यामुळे म्हणा किंवा येणाऱ्या काळाची गरज, बॉलीवूडने कात टाकायला कधीचीच सुरुवात केली आहे. बॉलीवूडमध्ये ‘धर्म’ या अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावरही अनेक चित्रपट आले. ज्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खरंच विचार करायला भाग पाडले. परंतू हे सिनेमे प्रदर्शित झाल्यावर वादही तसेच झाले. चला तर मंडळी, जाणून घेऊया अशाच काही सिनेमांबद्दल, जे धर्मावर आधारीत होत, ते सिनेमे सुपरहिट झाले परंतू वाद मात्र सुप्पर डुप्पर हिट झाले.
पी.के.
२०१४ साली आलेला राजू हिरानी दिग्दर्शित आमिर खान आणि अनुष्का शर्मा अभिनित पी.के. हा त्यावर्षातलं सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपटाची कथा साधी मात्र रंजक होती. एलियन असलेला आमिर खान चुकून पृथ्वीवर राहून जातो आणि त्याचा त्यांच्या जगात संदेश पाठवायचा रिमोट एक माणूस चोरतो. त्यानंतर सुरुवात होते ती त्या चोर माणसाला शोधून रिमोट मिळवण्यासाठी. मात्र आमिरच्या त्यांच्या घरी जाण्याच्या प्रवासात आमिरला अनेक दिव्यातून जावे लागते. यात तो एका खोट्या बुवाचा पर्दाफार्श करतो. यात विविध धर्म आणि त्याबद्दल असलेल्या चुकीच्या रूढी यांवर भाष्य करत त्या संकल्पना नव्याने मांडण्यात आल्या आहेत.
यासिनेमावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी धार्मिक भावना दुखवण्याचा आरोप लावत चित्रपटाविरोधात अनेक आंदोलनं केली होती.
ओह माय गॉड
२०१२ साली परेश रावल आणि अक्षय कुमार यांचा आलेला ओह माय गॉड हा सिनेमा देव आणि देवाबद्दल असलेल्या आपल्या चुकीच्या समजुती आणि रूढी यांवर भाष्य करतो. नास्तिक असलेल्या कांजीलाल मेहता म्हणजेच परेश रावलच्या अँटिक मूर्ती विकण्याच्या दुकानाचे भूकंपात नुकसान होते. त्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करायला गेल्यावर त्याला ऍक्ट ऑफ गॉड मुळे क्लेम नाकारला जातो. ह्याच क्लेम विरोधात कांजीलाल कोर्टात जाऊन केस करतात. अनेक वकिलांच्या नकारानंतर ते स्वतः त्याची केस लढतात. या दरम्यान आपल्या युक्तिवादातून ते लोकांच्या आस्तिक आणि नास्तिक याबद्दल असलेल्या व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करतात. या सिनेमाला देखील सुरुवातीला विरोध झाला होता.
माय नेम इज खान
करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित माय नेम इज खान हा सिनेमा २०१० साली प्रदर्शित झाला. या सिनेमात शाहरुख एका एस्पर्गर्स सिंड्रोम आजाराने ग्रस्त व्यक्तीची भूमिका साकारली होती. अमेरिकेत घडणाऱ्या या सिनेमात ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिम समाजाला अमेरिकन लोकांचा रोष पत्करावा लागतो. यातच शाहरुखच्या सावत्र मुलाचा खून होऊन हिंदू असणारी काजोल शाहरुखला यासाठी जबाबदार धरत त्याला सोडून जाते. त्यामुळे शाहरुखला राष्ट्राध्यक्षांना भेटून सांगायचे असते की सर्व खान आतंकवादी नसतात. या प्रवासात तो मुस्लिम समाजाचे नवीन चित्र जगासमोर आणत जातो.
धर्म-संकट में
२०१५ साली आलेला हा चित्रपट संवेदनशील विषयामुळे वादात अडकला होता. परेश रावल, नसरुद्दीन शहा आणि अन्नू कपूर यांची भूमिका असलेला हा सिनेमा नक्की धर्म काय? या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. परेश रावल सुरुवातीला मुस्लिम धर्माला नावा ठेवत असतात मात्र त्यांना समजते की त्याचे खरे आई वडील मुस्लिम आहेत आणि दत्तक घेतलेलं आई वडील हिंदू. त्यानंतर तो धर्म म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो.
वॉटर
दीपा मेहता यांचा हा सिनेमा २००५ साली आला. विधवांच्या त्रासदायक आणि भयाण जीवनात हा चित्रपट भाष्य करतो. त्याकाळात देशाच्या अनेक भागात होत असलेल्या विधवांबरोबर होत असलेल्या गोष्टींचे वर्णन या सिनेमात आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सुद्धा अनेक वेळा आंदोलन झाली होती आणि हा सिनेमा बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. काही संस्थांनी तर शूटिंग बंद होण्यासाठी सुसाइड प्रोटेस्टचासुद्धा आधार घेतला होता.