Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर हॅपी बर्थडे रितेश : आर्किटेक्ट ते बॉलिवूडचा ‘फॅमिली मॅन’, वाचा मराठमोळ्या रितेश देशमुखचा ‘अभिनय प्रवास’

हॅपी बर्थडे रितेश : आर्किटेक्ट ते बॉलिवूडचा ‘फॅमिली मॅन’, वाचा मराठमोळ्या रितेश देशमुखचा ‘अभिनय प्रवास’

बॉलिवूडचा ‘फॅमिली मॅन’ म्हणून ओळख असलेला रितेश आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून रितेशने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. एका मोठया राजकीय कुटुंबात जन्मलेल्या रितेशने करियरसाठी राजनीतीची निवड न करता चंदेरी दुनियेची वाट निवडली. आर्किटेक्ट असलेल्या रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा केला.

मुंबईत 17 डिसेंबर 1978 रोजी रितेशचा जन्म झाला. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा रितेश दुसरा मुलगा. संपूर्ण देशमुख घराणं राजकारणात सक्रिय आहे. अगदी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील या घराण्याला भूषवायला मिळाले. असे असले तरी रितेशला लहानपणापासून अभिनेताच व्हायचं होतं.

रितेशची (Riteish Deshmukh) शालेय शिक्षण लातूर येथील बाभळगाव येथे झाले. पुढचे शिक्षण रितेशने मुंबईत घेतले. रितेशने मुंबईच्या कमला रहेजा महाविद्यालयातून त्याने आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. काही दिवस त्याने परदेशात एका कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम देखील केले. मात्र त्याचे अभिनेता होण्याचे स्वप्न त्याला स्थिर बसवू देत नव्हते, म्हणून त्याने मुंबईत येऊन अभिनयात काम करायला सुरुवात केली.

रितेशने २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. मात्र पहिल्याच सिनेमाने त्याची निराशा केली. हा सिनेमा सपशेल आपटला. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्याच्यावर अनेकदा टीका झाली. तरीही त्याने कधीही कोणाला उत्तर दिले नाही आणि तो न खचता काम करत राहिला. त्यानंतर त्याच्या २००४ साली आलेल्या ‘मस्ती’ या चित्रपटाने त्याला यश आणि ओळख मिळून दिली. त्यानंतर रितेशने कधीच मागे वळून पाहिले नाही.

त्याच्या या प्रवासात त्याने खूप उतार चढाव पाहिले. एक कॉमेडी अभिनेता म्हणून त्याने त्याचे बस्तान बसवले होते. तेव्हाच त्याच्यावर विनोदी अभिनेता म्हणून शिक्का बसवत अनेकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर रितेशने ‘एक व्हिलन’ ह्या सिनेमातून नकारात्मक भूमिका साकारत टीकाकारांना चोख उत्तर दिले.

त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक तर झाले, शिवाय त्याला या भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाले. रितेशने हिंदी मध्ये बर्दाश्त, क्या कूल हैं हम, ब्लफमास्टर, मालामाल वीकली, कॅश, हे बेबी, धमाल, हाउसफुल, डबल धमाल, हाउसफुल 2, हमशकल्स, एक विलेन, हाउसफुल 3, बँजो, बँकचोर, टोटल धमाल आणि मरजावां अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

मराठीशी असलेली त्याची नाळ तो कधीही विसरला नाही. हिंदी भाषेत यशस्वी होत असतांनाच त्याने मराठी मधेही चित्रपटांची निर्मिती करायला सुरुवात केली. ‘येल्लो’, ‘बालक पालक’ अशा दर्जेदार सिनेमांची त्याने निर्मिती केली.

‘लय भारी’ सिनेमातून त्याने मराठी मध्ये प्रवेश केला. त्यांनंतर त्याने ‘माउली’ ह्या सिनेमात देखील काम केले. रितेशने मनोरंजन सृष्टीमध्ये कोणाचाही पाठिंबा न मिळवता, स्वकर्तृत्वावर यश प्राप्त केले. रितेशने 2012 मध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसुझा सोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुलं आहेत. (riteish deshmukh birthday special know some lesser known facts about actor)

हेही वाचा-
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ‘या’ दिवशी होणार सातवी आवृत्ती; एकदा वाचाच
‘असा करा सुखी संसार’, रितेश देशमुखने सांगितला जेनलियाबरोबरच्या सुखी संसाराचा फॉर्मुला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा