आज बॉलिवूडमधील गोड आणि मराठमोळं जोडपं रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या लग्नाचा वाढदिवस. ३ फेब्रुवारी २०१२ साली त्यांनी मुंबईमध्ये लगीनगाठ बांधली. आज लग्नाच्या आठ वर्षांनी देखील यांचे प्रेम पूर्वीइतकेच किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त वाढलेले आहे. या इंडस्ट्रीमध्ये जिथे काही काही लग्नं अगदी कमी म्हणजे आठवडाभर, महिनाभर चालतात, तर काहींनी लग्नाच्या अनेक वर्षांनी सुद्धा घटस्फोट घेतला आहे. अशा ग्लॅमर क्षेत्रात जिथे नात्यांपेक्षा जास्त पैसा आणि प्रसिद्धी महत्त्वाची आहे, तिथे काही जोडपे त्यांचे लग्न नुसते टिकवले नाही, तर ते प्रेमाने आणि आनंदाने आयुष्य जगतही आहेत. अशीच जोडी आहे आपल्या रितेश आणि जेनेलियाची.
‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. पहिली भेट तितकीशी चांगली नसली, तरी एकमेकांना नक्कीच काहीतरी देऊन गेली. त्यानंतर या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले, आणि २०१२ साली त्यांनी लगीनगाठ बांधली.
रितेश हा महाराष्ट्रीयन, तर जेनेलिया ख्रिश्चन असल्याने या दोघांनी आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि नंतर चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी जेनेलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि ते दोघे पहिल्यांदा आई- बाबा झाले. त्यानंतर त्यांना २०१४ साली दुसरा मुलगा झाला. या दोघांनी एकमेकांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांसोबत स्वीकारले आहेत. त्यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ते कधीच नात्यात इगो आणत नाही. ज्याची चूक असेल तो स्वतःहून माफी देखील मागतो. हेच त्यांच्या यशस्वी लग्नाचे गुपित आहे.
ही जोडी सोशल मीडियावरही भरपूर सक्रिय असून, लोकप्रियसुद्धा आहे. त्यांना लाखो फॉलोवर्स असून ते नेहमी या दोघांच्या फोटो, व्हिडिओला भरभरून लाईक्स आणि कमेंटस देतात. पाहा त्यांचे सोशल मीडियावरील काही निवडक व्हिडिओ.
रितेश आणि जेनेलिया यांचा ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा सोबतचा शेवटचा सिनेमा होता.
हेही वाचा-
रितेशभाऊ-जेनेलिया वहिनींचा झिंगाटवर ‘सैराट’ डान्स, कोणी बेधुंद होऊन नाचतंय तर कोणी जमिनीवर पडतंय…
अजय-काजोल पासून ते रितेश-जेनेलिया पर्यंत ‘या’ आहेत रील आणि रियल लाईफ जोड्या
फक्त एक रुपया! जेव्हा जेनेलिया-रितेशला शगुनच्या नावाखाली मिळाला होता एक रुपया