भारतात आता ओटीटी प्लॅटफॉर्म ने इतका चांगला जम बसवलाय की, प्रत्येक जण या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या वेबसिरीज या नव्या प्रकारचा चाहता झाला आहे. नवा कसला आता आपल्याकडे ही वेबसिरीज हा प्रकार जुनाच झाला म्हणा! कारण विशेषतः गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये या वेबसिरीज पाहण्यासाठी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सदस्य आहे.
अनेक उत्तमोत्तम कलाकृती वेबसिरीज या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच सैफ अली खान स्टारर तांडव या वेबसिरीजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. आता ही वेबसिरीज आपल्याला कधी आणि कुठे पाहायला मिळणार हे आपण पाहणार आहोत.
सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज तांडवचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांना अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. अली अब्बास जफर यांनी हे राजकीय नाट्य दिग्दर्शित केलं आहे. हिमांशु मेहरा आणि अली अब्बास यांनी स्वतः या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.
येत्या १५ जानेवारीला अमेझॉन प्राईमवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. नेमकं काय पाहायला मिळणार आहे या वेबसिरीजमध्ये याची झलक आपल्याला टिझरमध्येच पाहायला मिळते. चला तर मग पाहुयात या टिझर मध्ये नेमकं काय आहे.
एका मिनिटाच्या टीझरची सुरुवात ही प्रचंड गर्दी आणि राजकीय ध्वजांनी होते. या वेबसिरीजमध्ये सैफ हा आपल्याला राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये आपल्याला सैफची प्रभावी एन्ट्री पाहायला मिळते. त्याच वेळी, एक व्हॉइसओव्हर ऐकू येतो, “हिंदुस्तान को सिर्फ एक ही चीज चलाती है, राजनीती। इस देश में जो प्रधानमंत्री है वो ही राजा है।”
तांडवमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय डिंपल कपाडिया, तिग्मांशू धूलिया, सुनील ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय, जिशान अयूब खान, कृतिका कामरा, कुमुद मिश्रा, गौहर खान, अनूप सोनी, सारा-जेन डायस, कृतिका अवस्थी, डिनो मौर्या आणि परेश पहाजा हे मातब्बर कलाकार देखील मिनिटभराच्या टीझरमध्ये भाव खाऊन जातात.
सदर वेबसिरीज ही अली अब्बास जफर यांचं वेबसिरीज माध्यमातलं पदार्पण आहे. या राजकारणकेंद्री वेबसिरीज मध्ये आपल्याला नक्कीच सत्तेचा मोह, खुर्चीचा खेळ इत्यादी गोष्टी पाहायला मिळणार हे नक्की!