‘पात्र व कथा डोक्यात असूनही दिवसभर वाराणसी शहर फिरायचो’, दिग्दर्शकाने सांगितला चित्रपटनिर्मितीचा प्रवास


चित्रपटांमध्ये व्यक्तीरेखांना न्याय देणारे नायक- नायिका महत्त्वाचे असतातच. याबरोबरच चित्रीकरणाचे ठिकाण (लोकेशन्स) हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडते, असा सूर लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आज झालेल्या ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमादरम्यान उमटला.

पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत एनएफएआय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘बारा बाय बाय’, ‘लैला और सात गीत’, ‘ब्रिज’, ‘जून’, ‘आरके’ या चित्रपटांचे दिग्दर्शक व टीम यांच्याशी संवाद साधला.

‘बारा बाय बाय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गौरव मदान, निर्माते, पटकथाकार, सिनेमॅटोग्राफर सनी लाहिरी, ‘लैला और सात गीत’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग, ‘ब्रिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिपाल कोलिता, ‘जून’ चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव खिस्ती, सुहृद गोडबोले, अभिनेत्री रेशम, ‘आरके’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रजत कपूर आदी यावेळी उपस्थित होते.

‘बारा बाय बाय’ चित्रपटाचा नायक हा वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर डेथ फोटोग्राफी करणारा शेवटचा छायाचित्रकार आहे. प्राचीन वाराणसी शहर ज्याप्रमाणे विकासामुळे बदलत आहे. तसेच, स्मार्टफोनच्या जमान्यात नायकाची ओळखही पुसल्या जात आहे. शहर आणि त्याच्या आयुष्यात होणाऱ्या या स्थित्यंतरापासून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवायची नायकाची इच्छा आणि त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला असल्याचे सांगत दिग्दर्शक गौरव मदान म्हणाले, “मुख्य भूमिकेतील कलाकारांबरोबरच चित्रपटातील लोकेशन्सचा आम्ही विशेष विचार केला. भारतीय चित्रपटसृष्टीत वाराणसीचे घाट व ते शहर दाखविल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, घाटाची, त्याच्याशी निगडीत जीवनाची, व्यक्तींची कथा सांगण्याचा आमचा प्रयत्न होता.”

“चित्रपटातील पात्र व कथा डोक्यात होतीच, तरीही आम्ही दिवसभर वाराणसी शहर फिरायचो आणि मग लिहित जायचो. यामुळे लोकेशन्सनुसार कथा साकारली गेली. या प्राचीन शहराची आजची विदारक अवस्था जवळून पाहता आली. शहराचे स्वत:चेच असे विविध रंग चित्रपटामध्ये अनुभविता येतील,” असेही मदान यांनी सांगितले.

चौदाव्या शतकात काश्मीरमधील संत लल्लेश्वरी देवी किंवा लाल देड यांच्या कवितांवर प्रेरित ‘लैला और सात गीत’ हा चित्रपट काश्मीरमधील भटक्या मेंढपाळ समाजातील लैलाची कथा प्रेक्षकांना सांगतो. चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग म्हणाले, “काश्मीरचे सौंदर्य, हिमालयाच्या पर्वतरांगा यांच्या पार्श्वभूमीवर घटणारी लैलाची कथा स्त्रीवादी विचारांसोबतच निसर्गाशी असलेले मानवी नाते अलगदपणे उलगडण्याचा प्रयत्न करते. संगीत व चित्रकारणाचा परिसर हा कथेला एका उंचीवर नेऊन ठेवतो.”

“मी स्वत: अभिनयाचे औपचारिक धडे गिरवले असले, तरी माझ्या चित्रपटात याआधी अभिनय न केलेल्यांना प्राधान्य देणे मी पसंत करतो,” असे सांगत नजीकच्या भविष्यात काश्मीरच्या लोकेशन्समध्येचे पुढील दोन प्रोजेक्ट करण्याचा मानस असल्याचे सिंग यांनी बोलून दाखविले.

ब्रह्मपुत्रा नदीची एक उपनदी असलेल्या नदीच्या काठावर वसलेल्या गावात किशोरवयीन मुलीची संघर्षमय कथा सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्रिपाल कोलिता यांनी आपल्या ‘ब्रिज’ या आसामी चित्रपटात केला आहे.

याबद्दल सांगताना ते म्हणाले, “आसाममध्ये दरवर्षी पुराचे संकट येते. गेल्या काही वर्षांत ही तीव्रता वाढली आहे. आज असलेले आपले घर, संसार उद्या येणाऱ्या नदीच्या पुराने उद्ध्वस्त होतो. तरीही येथील लोक नदीला आई मानत तिची पूजा करतात. जीवनातील संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. मात्र, त्यातून पार होत नव्या दिवसाची वाट दाखविणारा विचार चित्रपटातून दाखविला आहे.” चित्रपट आसाममध्ये चित्रित झाला असून आसामचे व ब्रह्मपुत्रा नदीचे सौंदर्य यामध्ये पाहायला मिळते.

‘जून’ चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यामध्येच करण्याचा आमचा सुरुवातीचा विचार होता. मात्र, नंतर कथेला अनुसरून ते चित्रीकरण औरंगाबाद शहरात करण्याचा निर्णय झाला, असे सांगत चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव खिस्ती म्हणाले, “पात्रांना एक कोंदण देतं शहर दाखवीत कथा सांगण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या ताणात असलेला नील व अपघाताने त्याच्या आयुष्यात आलेली नेहा यांची ही गोष्ट आहे.” आजच्या पिढीतील नातेसंबंध हे गुंतागुंतीचे, अनेक पदर असलेल्या असतात हे चित्रपटात दाखविले असल्याचे सुहृद गोडबोले यांनी सांगितले.

‘आरके’ चित्रपटाचे दिग्दर्शक रजत कपूर यांनी स्वत: चित्रपटात देखील ‘आरके’ नावाच्या नायकाची व्यक्तीरेखा साकारली आहे. यावेळी नायकाचे प्रतिबिंब गायब होते आणि ते शोधण्याचा आणि ते सापडल्यानंतरचा प्रवास चित्रपटात दाखविला आहे. याबद्दल सांगताना कपूर म्हणाले, “चित्रपट तयार करत असताना दिग्दर्शकाने अंत:प्रेरणेला महत्त्व द्यायला हवे. तुमच्या कल्पनांना कोणतेही लॉजिक नसते, त्यामुळे लॉजिक बाजूला ठेऊन काम केले तर त्यामध्ये असलेला तारतम्य भाव आपोआप समोर येतो.”

“चित्रपटाच्या एडिटिंगसाठी मला तब्बल साडे चार महिने लागले. त्यासाठी मी रोज सकाळी एकदा चित्रपट पाहायचो आणि त्यातील बदलावर दिवसभर काम करायचो. काल चित्रपटाचा भारतातील प्रिमीअर पिफमध्ये पार पडला याचा विशेष आनंद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!