Saturday, July 6, 2024

‘…म्हणून माझी हिम्मत होत नाही’, सायली संजीवने सांगितला नाशिक ते मुंबई प्रवासाचा ‘थरारक’ अनुभव

हिंदी मनोरंजन क्षेत्र असो किंवा मराठी चित्रपट जगत असो या कलाकारांना आपली स्वप्न पूर्ण करायला मुंबईला यावेच लागते. म्हणूनच मुंबईला स्वप्नांची नगरी अशी खास ओळख मिळाली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला या शहराने नवी ओळख दिली आहे, जगायचे बळ दिले आहे. मराठी चित्रपट जगतातही असे अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आहेत ज्यांनी छोट्याशा शहरातून येऊन मुंबईमध्ये आपल्या स्वप्नांसाठी मोठी धडपड केली आहे. या कलाकारांना या शहराबद्दल कधी वाईट अनुभव येतात तर कधी चांगले अनुभव येतात. असाच प्रवास आणि अनुभव अभिनेत्री सायली संजीवने तिच्या शब्दात व्यक्त केला आहे.

सायली संजीव (Sayali Sanjiv) ही मराठी चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने चित्रपटसृष्टीत चांगलीच ओळख निर्माण केली आहे. मात्र हे यशाचे शिखर गाठण्यासाठी तिने मोठा संघर्ष केला आहे. मुळची नाशिककर असलेल्या सायलीने मुंबई ते नाशिक असा आपला प्रवास अत्यंत संघर्षमय रित्या पार केला आहे यावेळचा तिचा अनुभव सायलीने सांगितला आहे.

“नाशिकसारख्या प्रगत आणि निवांत शहरातून मी २०१६ मध्ये मुंबईत दाखल झाले. आधी एका महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनयाची पारितोषिके मिळवली होती. तिथे परीक्षक म्हणून आलेल्या प्रवीण तरडे यांनी मला मुंबईत येण्यासाठी प्रोत्साहन दिले. काही ठिकाणी माझे नाव देखील सुचवले. अपेक्षेप्रमाणे कामे मिळत नाहीयेत असे लक्षात आल्यावर मी नाशिकला परत येऊन राज्यशास्त्रातून बी.ए. पूर्ण केले. त्याच सुमारास मला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली आणि मी खऱ्या अर्थाने मुंबईकर झाले. माझ्या वडिलांचा माझ्यावर प्रचंड जीव होता. मी जरी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले असले, तरी नाशिकमध्ये माझे वडील प्रत्येक ठिकाणी मला सोडायला आणि न्यायला स्वतः यायचे. त्यांनी मला तसे फारसे कष्ट कधी पडू दिले नव्हते आणि अशा या सुरक्षित कौटुंबिक वातावरणातून एकदम अवाढव्य मुंबईनगरीत मी एकटी माझे नशीब घडवण्यासाठी आले होते. एक मात्र मी नक्की ठरवले होते, चार पैसे जास्त कमवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागली तरी चालेल; पण मी रिक्षा किंवा टॅक्सीशिवाय फिरणार नाही. मी मुंबईत आल्या आल्या पल्लवी या माझ्या मैत्रिणीकडे पार्ल्याला २-३ महिने राहिले. मग दिंडोशीला फिल्मसिटी जवळ राहायला गेले.”

यावेळची एक विशेष आठवण सांगताना सायली म्हणते की, “एकदा पावसाळ्यात एका कार्यक्रमानंतर आरे मार्गे गोरेगावला परतताना एक भीतीदायक अनुभव आला. वाटेत झाड पडल्यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती आणि त्या अनोळखी भागात अचानक आपण एकटे असल्याची जाणीव झाली. सरळ चालत हायवेपर्यंत आले; पण तिथेही काही वाहन मिळेना. शेवटी एका भल्या माणसाने घरापर्यंत सोडले. वाटेत कळले की त्यांना माझ्या मालिका खूप आवडतात. त्यामधले काम खूप आवडत होते. आजही तो प्रसंग मनावर कोरल्यामुळे आरे मार्गे कुठेही जायची माझी हिम्मत होत नाही.” याबद्दल पुढे बोलताना ती म्हणते की,  “इथे मला जसे मनोरंजन क्षेत्रात काम करते म्हणून घर भाड्याने द्यायला नकार देणारे भेटले, तसेच रोज काहीतरी नवीन पदार्थ खाऊ घालणारे प्रेमळ शेजारीही मिळाले. इथे तुम्हाला चांगली वाईट सर्व प्रकारची माणसे भेटतात, ज्यांच्यामुळे इथे सतत काहीतरी घडत असते. हे शहर माझ्यासारख्या अनेकांची लाईफलाईन आहे. माझ्यासाठी तर हे शहरच ‘गार्डियन’ आहे. याने मला सांभाळलंय, उभे केले आहे आणि पुढेही नेले आहे!” दरम्यान सायली संंजीव सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा