सध्या प्रेक्षकवर्गाकडून मालिकेंना विशेष प्राधान्य मिळत आहे. मराठीमध्ये तर अशा बऱ्याच मालिका आहेत, ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशीच एक मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ सद्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यात संजीवनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारने आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली आहेत.
या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात, ज्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्साही असतात. तसेच ही मालिका आता पुन्हा एक नवे वळण घेऊन येत आहे. आता संजीवनी अर्थातच अभिनेत्री शिवानी पोलिसांच्या वर्दीमध्ये पडद्यावर झळकणार आहे. होय, येत्या भागात प्रेक्षकांना शिवानी पोलिस बनलेली पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवानीने सांगितले की, तिला पोलिसांच्या वर्दीमध्ये पाहून तिच्या वडिलांनी कशी प्रतिक्रिया दिली. शिवानी म्हणाली की, “संजू आता नव्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या प्रवासामध्ये मला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे, मी एका दिवसातच बुलेट चालवायला शिकले. संजूने पोलिस होणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे. मला खूप चांगली संधी मिळाली असे मला वाटले. कारण माझे वडिल देखील पोलिस खात्यामध्ये काम करतात. ते बॅक ऑफिसमध्ये सीनियर हेड क्लर्क आहेत. जेव्हा मी वर्दी घालून त्यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्यांना मला बघून खूप आनंद झाला. त्यांना आनंदी पाहून मी सुद्धा भावूक झाले.”
मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजितच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच या मालिकेतील इतर पात्र देखील चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. विशेष म्हणजे, शिवानी पोलिस बनल्यानंतर मालिकेत आणखी काय काय नवीन वळणं पाहायला मिळतील, यासाठी प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल