Saturday, July 27, 2024

अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शान आला होता इंडस्ट्रीत; वयाच्या 17व्या वर्षी मिळाली गाण्याची संधी

बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा सुप्रसिद्ध गायक शान शनिवारी (30 सप्टेंबर) आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. शानचे खरे नाव शंतनू मुखर्जी आहे. त्याच्या कुटुंबातील अनेकांचे नाते संगीताशी जोडलेले आहे. शानने इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी गायली आहेत, जी सुपरहिट झाली आहेत. त्याची रोमँटिक गाणी तरुणांना नेहमी आकर्षित करतात.

शानचा आवाज ज्याप्रकारे लोकांच्या हृदयावर आणि मनावर जादू करतो ते पाहून काही लोक असे म्हणू शकतात की, गायक होणे ही शानची पहिली पसंती होती. मात्र, तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन इंडस्ट्रीत आला आणि त्याने संगीत क्षेत्रात आपले यश कमावले. चला तर जाणून घेऊया शानचा जीवनप्रवास…

लहान वयात जाहिरातींसाठी शानने गायल्या जिंगल्स
शानचा जन्म 30 सप्टेंबर, 1972 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा येथे झाला होता. जीवनात सर्वात मोठा आधार असलेले त्याचे वडील तो 13 वर्षांचा असतानाच हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर शानची आई संगीताच्या जगात सामील झाली. ज्यातून मिळणारे पैसे ते त्यांचा घरखर्चासाठी वापरत होत्या. शानने लहानपणापासूनच जाहिरातींसाठी जिंगल्स गायला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने चित्रपटात प्रथमच गाणे गायले होते.

शानने हिंदीतच नव्हे, तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. यासह, तो टेलिव्हिजनवर होस्ट म्हणून देखील झळकला आहे. त्याने टीव्हीवर ‘सारेगामापा’, ‘सारेगामापा लिटल चॅम्प्स’, ‘स्टार व्हॉईस ऑफ इंडिया’ आणि ‘म्युझिक का महामुकाबला’ यासह इतर अनेक शो होस्ट केले आहेत. शानप्रमाणेच त्याची बहीण सागरिका ही सुप्रसिद्ध गायिका आहे.

‘परिंदा’ या चित्रपटात 1989 मध्ये त्याला फक्त एकच ओळ गायला मिळाली. त्या काळात शान आणि त्याच्या बहिणीने देखील अल्बम काढला जो सुपरहिट झाला होता. शानने आरडी बर्मन यांच्या ‘रूप तेरा मस्ताना’चे रिमिक्स गायले त्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. 1999साली शानने ‘भूल जा’ हे गाणे लिहिले, ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले होते.

शानने शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, सैफ अली खान, आमिर खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, शाहिद कपूर, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन आणि आर माधवनसह इतर कलाकारांच्या चित्रपटांत आपला आवाज दिला आहे.

त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तो वयाच्या 24व्या वर्षी राधिका मुखर्जीला भेटला, ती व्यापारी कुटुंबातील होती. पुढे दोघांनी 2003 मध्ये लग्न केले. त्यांना सोहम आणि शुभ नावाची दोन मुले आहेत.

चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त शानने टीव्ही शोमध्ये परीक्षकाचे कामही केले. सावरिया चित्रपटातील ‘जब से तेरे नैना’ या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. शान क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात राहतो.

शानने गायलेली सुपरहिट गाणी
माय दिल गोज
‘सलाम नमस्ते’ या चित्रपटातील या गाण्यात सैफ अली खान आणि प्रीति झिंटाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे गाणे शानने गायत्री अय्यरसोबत गायले होते. जे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडले होते.

चांद सिफारिश
आमिर खान आणि काजोलचे ‘चांद सिफारिश’ गाणे चाहत्यांना प्रचंड आवडले होते. शानचे हे गाणे त्याच्या हिट गाण्यांपैकी एक आहे. जे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

जबसे तेरा नैना
रणबीर कपूर आणि सोनम कपूरने पदार्पण केलेला चित्रपट ‘सावरियां’ सुपरहिट झाला नव्हता, पण चित्रपटातील ‘जबसे तेरा नैना’ हे गाणे खूप हिट झाले.

चैन आपको मिला
‘हंगामा’ चित्रपटातील ‘चैन आपको मिला’ हे गाणे शानने साधना सरगमसोबत गायले आहे. गाणे बऱ्यापैकी रोमँटिक आहे, पण त्याचा व्हिडिओ मजेदार आहे.

कुछ कम
प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटातील हे एक दुःखी गाणे आहे. या गाण्यालाही चांगली पसंती मिळाली आहे.

हेही नक्की वाचा-
प्रथमेश लघाटेची खतरनाक स्टाईल! होणाऱ्या पत्नीला ‘या’ नावाने मारतो हाक, एकदा वाचाच
शहनाज गिलचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘एवढी हॉट…’

 

हे देखील वाचा