वयाच्या २६ व्या वर्षी ‘राष्ट्रीय पुरस्कार’ पटकावणारी पहिली महिला सिंगर, अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल डे’, वाचा सुरमयी प्रवास


आज बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि सुरेल गायिका असणारी श्रेया घोषाल तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य गाण्यांना आपल्या आवाजाने गाजवणाऱ्या श्रेयासाठी तिचा हा वाढदिवस खूप खास आहे, कारण श्रेया आता प्रेग्‍नेंट आहे. श्रेयाने खूप कमी वयात खूप जास्त नाव कमावले आहे.

श्रेयाचा जन्म १२ मार्च १९८४ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. श्रेयाला सुरुवातीपासूनच गाण्याबद्दल खूप प्रेम होते. गाण्याकडे असलेला तिचा ओढा पाहून तिच्या आई- वडिलांनी तिला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गाणे शिकवण्यास सुरुवात केली. वडिलांची बदली झाल्यानंतर श्रेया आणि तिचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. मुंबईत आल्यावर श्रेयाच्या गाण्याच्या करियरला एक वेगळी आणि अनपेक्षित भरारी मिळाली.

श्रेयाने त्याकाळी खूपच लोकप्रिय असणाऱ्या ‘सा रे ग म पा’ या कार्यक्रमात चाईल्ड स्पेशल पर्वात सहभाग घेतला आणि तो शो जिंकला सुद्धा. श्रेयाने यानंतरही तिच्या गाण्याचे शिक्षण चालूच ठेवले. काही वर्षाने श्रेयाने पुन्हा याच कार्यक्रमात तरुणांच्या पर्वात सहभाग घेतला, आणि हा शो पुन्हा जिंकला. यानंतर तिचे नशीब पूर्णच पालटले.

या शोमुळे श्रेया प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आईच्या नजरेत आली. त्या तिचा हा शो पाहायच्या, त्यांनीच भन्साळींना श्रेयाला गाण्याची संधी देण्याचे सुचवले. त्यानंतर संजय यांनी तिला त्यांच्या ‘देवदास’ या सिनेमात पार्श्वगायन करण्याची पहिली संधी दिली. श्रेयाने या संधीचे सोने केले आणि पहिल्याच सिनेमातील गाण्याने तिला पुरस्करांसह प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

सन २००२ मध्ये आलेल्या ‘देवदास’ या सिनेमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या सिनेमातील श्रेयाने गायलेले ‘मोरा पिया’ आणि ‘डोला रे डोला’ ही गाणी तुफान गाजली. पहिल्याच चित्रपटासाठी श्रेयाला प्लेबॅक सिंगर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर श्रेयाने कधीच मागे वळून पाहिले नाही. वयाच्या २६ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी श्रेया ही पहिली महिला गायिका आहे.

संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपला गुरू मानणाऱ्या श्रेयाने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगु, बंगाली, आसामी आदी १४ भाषांमधील २०० हून अधिक सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. श्रेया फक्त भारतात प्रसिद्ध आहे, असे बिलकुल नाहीये. तिने तिच्या गायनाने भारताबाहेरील लोकांना देखील खूप वेड लावले आहे. याचा प्रत्यय आपल्याला एका गोष्टीवरून येतो तो म्हणजे, अमेरिकेतल्या ओहिओ राज्यात २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिची गाणी तिथे ऐकली जातात.

श्रेयाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर श्रेयाने तिचा मित्र असणाऱ्या शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले आहे. या दोघांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. श्रेयाने एकदा एका शो मध्ये तिला कसे प्रपोज केले हे सांगितले होते. ती म्हणाली, “आम्ही दोघेही आमच्या एका मित्राच्या लग्नाला गोव्याला गेलो होतो. मला काहीच कल्पना नव्हती की शिलादित्य मला प्रपोज करणार आहे. ज्यावेळी तो मला रिंग घेऊन प्रपोज करणार होता, त्यावेळी त्याने मला सांगितले खारू ताई बघ, मी पण वेडी काही विचार न करता खारू ताई शोधायला लागली, तेवढयात त्याने रिंग काढली आणि मला प्रपोज केले, तेव्हा त्याने माझ्यासाठी एक गाणे देखील गायले होते.”

या दोघांनी त्यांचे नाते जगापासून लपून ठेवले. श्रेयाने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. या दोघांनी ५ फेब्रुवारी २०१५ ला बंगाली पद्धतीने लग्न केले होते. शिलादित्य हा एक इंजिनियर असून रेसिलियंट टेक्नोलॉजी कंपनीचा मालक आहे.

श्रेयाने याच महिन्यात ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेयर करत दिली. यावेळी तिने लिहिले होते की, “बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे.” असे लिहीत तिने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो सुद्धा शेअर केला होता.

श्रेयाला तिच्या कारकिर्दीत ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कारांसोबतच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोट्याधीश असणाऱ्या सलमान खानवर आली होती वाईट वेळ, फी न भरल्याने काढले होते वर्गाच्या बाहेर, मग वडिलांनी…

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन


Leave A Reply

Your email address will not be published.