Tuesday, July 9, 2024

‘मला सारखे वाटत होते त्याला मी फोन करावा मात्र…’, सिद्धार्थच्या ट्रेनरने मोकळ्या केल्या त्याच्या भावना

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा वयाच्या ४० व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री दुःखात आहे. अशातच त्याच्या जिम ट्रेनरने सांगितले आहे की, मागील काही दिवसापासून सिद्धार्थला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याला नीट व्यायाम देखील करता येत नव्हता.

सिद्धार्थच्या ट्रेनरने सांगितले की, “तो केवळ दोन तास वर्कआउट करायचा परंतु यामध्ये ब्रेक आणि आराम करत त्याला तीन ते चार तास लागायचे. सिद्धार्थ हा केवळ क्लाइंट नव्हता तर माझा एक चांगला मित्र होता. तो अनेकवेळा त्याचा अनुभव शेअर करायचा. मित्रापेक्षा मी त्याला माझा भाऊ मानत होतो. आम्हा दोघांची एक वेगळीच बॉन्डिंग होती.” (sidharth shukla workout trainer sonu give information about his routine)

तो पुढे म्हणाला की, “माझी आणि त्याची शेवटची भेट माझ्या वाढदिवशी झाली होती. २४ ऑगस्टला माझा वाढदिवस होता. त्या दिवशी तो जिममध्ये आला मला शुभेच्छा दिल्या, व्यायाम केला आणि मग गेला. २५ तारखेला मी भोपाळला शूटिंगसाठी चाललो होतो तेव्हा त्याने मला खूप चिडवलं. तो म्हणाला की, “आता तू अभिनेता होणार आणि मला टक्कर देणार. शूटिंगवर नको जाऊ, अभिनय सोडून दे. २४ तारखेला आम्ही शेवटचे वर्कआउट केले. मी त्याला सांगितले होते की, मी ३० तारखेला परत येणार आहे. तेव्हा तो म्हणाला की, ठीक आहे मी तुझ्या असिस्टंटच्या मदतीने वर्कआउट करेल.”

ट्रेनरने पुढे सांगितले की, “२५ तारखेला तो जेव्हा जिममध्ये आला तेव्हा मी तर तिथे नव्हतो. पण त्या दिवशी त्याने २५ मिनिट वर्कआउट केलं. मी तिथे नसल्यामुळे त्याचे मन लागले नाही आणि तो तेथून निघून गेला. मी तीन दिवस आधीच आलो आहे. मी काल रात्रीच सिद्धार्थला कॉल करण्याचा विचार करत होतो. परंतु कॉल करायचे राहून गेले. काल रात्री खरंच दोन-तीन वेळा विचार आला होता की, त्याला कॉल करावा आणि सांगावं की, परवापासून व्यायाम सुरु करूयात. कॉल करायचा होता पण त्याला घाबरून मी कॉल केला नाही. कारण मला वाटत होते की, जर मी आज भेटलो नाही तर तो खूप रागवेल.”

तो पुढे म्हणाला की, “सिद्धार्थ एक सरळ मार्गी व्यक्ती होता. त्याला जर राग आला तर तो लगेच व्यक्त करायचा. त्याने कधीच माझे नाव घेतले नाही. नेहमी मला सर म्हणून आवाज द्यायचा. आम्ही रोज ४ तास एकत्र घालवत होतो. सकाळी तो जिमला यायचा आणि संध्याकाळी रनिंगसाठी आम्ही जायचो. लॉकडाऊन दरम्यान त्याचे पोट वाढले होते. त्यामुळे तो रनिंग करत करायचा. तिथे सोसायटीच्या ग्राऊंडमध्ये तो रनिंग करायचा. मला अजूनही तो आता आपल्यात नाहीये या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण त्याला बघण्याची माझी अजिबात हिम्मत झाली नाही. तिथे त्याची बहीण आणि मेहुणे होते. तपासणी चालू होती त्यामुळे कोणालाही भेटू देत नव्हते. दीदीने मला कॉल करून सिद्धार्थच्या घरी जाऊन आईची काळजी घ्यायला सांगितली. मी मम्मीजवळ दोन तास बसलो होतो.”

सिद्धार्थचे हे जाणे सर्वांसाठी अगदी अनपेक्षित होत. एवढ्या कमी वयात काय होईल याचा कोणी विचार देखील केला नसेल. या बातमीमुळे त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्या वर्गामध्ये देखील दुःखाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा