व्वा! गायन-अभिनयानंतर आता केतकी दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, चाहतेही झालेत उत्सुक


गायन आणि अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण करणारी पुण्याची युवा कलाकार केतकी माटेगावकर हिने आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच जागतिक कीर्तीचे कलाकार म्हणून ओळख असलेल्या महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर यांनी केतकीने संगीतबद्ध केलेल्या रचना गायल्या आहेत. इतकेच नव्हे तर गायन क्षेत्रातील केतकीचे गुरु असलेले पं. रघुनंदन पणशीकर यांनी स्वत: व आई सुवर्णा माटेगावकर या दोघांनी देखील तिने संगीतबद्ध केलेल्या रचना गात केतकीच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे.

आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केतकी माटेगावकर हिने या विषयीची अधिकृत घोषणा केली. केतकीची आई आणि प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर, वडील पराग माटेगावकर यावेळी उपस्थित होते. (singer ketaki mategaonkar become music composer)

संगीतकार म्हणून केलेल्या पदार्पणाविषयी अधिक माहिती देताना केतकी म्हणाली, “मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. माझ्यासाठी हा योग्य मार्ग आहे, असे नेहमी वाटत आले. आपल्याकडे फारशा महिला संगीतकार न झाल्याने एखाद्या गाण्याकडे, चालीकडे पाहण्याचा एका स्त्री संगीतकाराचा एक वेगळा दृष्टीकोन या निमित्ताने श्रोत्यांना अनुभवता येईल.”

पुढे तिने सांगितले की, “संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खाडीलकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावं आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावे, असे मला मनापासून वाटते. महिला संगीतकारांच्या चांगल्या रचना देखील रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा केतकीने व्यक्त केली.”

पुढे केतकी म्हणाली की, “२०१५-१६ साली मी ‘हरी दर्शनाची ओढ’ या गाण्याचे संगीत केले होते. सुरेश वाडकर यांनी ते गायले. त्यावेळी तू एक चांगली संगीतकार होऊ शकशील, पुढे काम करत रहा, असा प्रेमळ सल्ला सुरेश वाडकर यांनी दिला. त्या वेळी स्टुडिओत असलेल्या संगीतकार अशोक पत्की यांना आवर्जून बोलावून घेत त्या दोघांनी माझे कौतुक केले. नंतर २०१८ साली किशोरी आमोणकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘बोलावा विठ्ठल’ हे गायची संधी मिळाली. नुकतेच या गाण्याने यु ट्यूबवर १ मिलियनचा टप्पा गाठला. या सर्व पार्श्वभूमीवर ‘माई’ हा अल्बम केला.”

पुढे म्हणाली की, “मी संगीतबद्ध केलेल्या पहिल्याच अल्बममध्ये महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, माझे गुरु पं रघुनंदन पणशीकर आणि आई सुवर्णा माटेगांवकर हे प्रतिथयश कलाकार गायले आहेत. एखाद्या तरुण महिला संगीतकाराला तिच्या संगीतकार म्हणून होत असलेल्या पहिल्याच प्रयत्नावर इतक्या लोकप्रिय आणि जागतिक कीर्तीच्या गायकांनी विश्वास टाकला हे माझ्यासाठी खूप विशेष आहे असे केतकीने यावेळी सांगितले. माझ्या अभिनय व गायन कलेचे कौतुक रसिकांनी नेहमीच केले. महाराष्ट्राची कन्या म्हणून मला सिने व संगीत रसिकांनी खूप प्रेम दिले. आता संगीतकार म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव आहे. अपेक्षांचे दडपण असले तरी, ही जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करेल, असा विश्वास केतकी माटेगांवकर हिने यावेळी व्यक्त केला.”

केतकी माटेगांवकर हिने संगीत दिग्दर्शन केलेला ‘माई’ हा अल्बम लवकरच रसिक श्रोत्यांच्या भेटीला येत असून यामध्ये दोन भागांत एकूण ९ गाणी असतील. केतकीची पणजी सौदामिनी माटेगावकर अर्थात माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध करण्यात आल्या असून धार्मिक, सकारात्मक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे.

“आमच्या घरात धार्मिक वातावरण आहे. एक युवा गायिका, अभिनेत्री असलेल्या केतकीने तिचा पहिला अल्बम हा धार्मिक गीतांचा, अभंगांचा केला, याचा मला अतिशय आनंद आहे. आमच्या माईंच्या गीतांच्या या उपक्रमात संपूर्ण माटेगांवकर कुटुंबीयांनी योगदान दिले आहे,” असे सुवर्णा माटेगावकर यांनी आवर्जून नमूद केले.

एक युवा संगीतकार ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न गायकांकडून गाऊन घेत असताना कसा अनुभव होता असे विचारले असता केतकी म्हणाली, “माईक समोर आला की, आपला मोठेपणा बाजूला सारत हे सर्व कलाकार गायले. त्यामुळे खरे दडपण तर माझ्यावर होते.”

लवकरच केतकी माटेगावकर या अधिकृत युट्यूब चॅनल बरोबरच स्पॉटीफाय, मॅजिक मिस्ट आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे ही गाणी रसिकांना अनुभविता येणार आहेत. चित्रपट सोडून इतर प्रकारच्या संगीताला मिळत असलेली रसिकांची पसंती पाहता नजीकच्या भविष्यात अनेक प्रतिथयश कलाकारांची संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचेही केतकीने सांगितले.

हेही वाचा

‘कह दू तुझे या चूप रहू’, इंद्राला करायचे आहे दिपूला प्रपोज, पण कसे?

सलमान खानला वाटतेय ‘आरआरआर’ची भीती? निर्मात्यांना दिली ‘ही’ चेतावणी

सनी लिओनीने करीना कपूरसमोर व्यक्त केलं दुःख; म्हणाली, ‘माझ्या सवयीमुळे लाजिरवाणं व्हावं लागतं…’

 


Latest Post

error: Content is protected !!