Tuesday, July 9, 2024

प्रसिद्ध गायक शान झाला पोरका! मायेचं छत्र कायमचं हरपलं, डोळ्यातील अश्रू थांबेना

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि उत्तम होस्ट शानवर (Shaan) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाने त्याची आई गमावली आहे. शानच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांनी गुरुवारी (२० जानेवारी) एका ट्वीटद्वारे शानच्या आईच्या निधनाची माहिती दिली. शानची आई सोनाली मुखर्जीही गायिका होत्या. शोक व्यक्त करताना कैलाश खेर यांनी लिहिले, “शानच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमच्या शानच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच तिन्ही जगाचा अधिपती भगवान शिवकडे प्रार्थना आहे. चिरंतन प्रार्थना.”

आईवर आहे गर्व
यापूर्वी २०१६ मध्ये दिलेल्या मुलाखतीत शानने त्याच्या आईबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “माझी आई (सोनाली मुखर्जी) हे एकमेव कारण आहे की, मी माझ्या संधीचा फायदा घेऊ शकलो, एक दिवसाची नोकरी न करता, मी गायक म्हणून करिअर करू शकलो. तिने एकटीने माझी बहीण सागरिका आणि मला वाढवले. माझ्या वडिलांचे १९८६ साली निधन झाले. तेव्हा मी फक्त १४ वर्षांचा होतो. १९७० ते २००० या काळात ती चित्रपटातील गाण्यांसाठी कोरस सिंगर होती.” (sonali mukherjee mother of popular bollywood singer shaan passed away)

आपल्या आईबद्दल बोलताना शानपुढे म्हणाला, “तिने एकटीने आई आणि वर्किंग वुमन या दोन्ही भूमिकांचा समतोल कसा साधला, हा एक चमत्कार आहे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे. तिने मला आणि सागरिकाला आम्हाला जे करायचे आहे ते करायला प्रोत्साहन दिले. तिने कधीही तिची इच्छा आमच्यावर लादली नाही. अनुजी (अनु मलिक, संगीतकार) (Anu Mallik) यांना आठवते की, २००० मध्ये, जेव्हा मी गायक म्हणून थोडासा समोर आलो होतो, तेव्हा माझ्या आईने त्यावेळच्या आघाडीच्या संगीतकारांना सांगितले होते की, तिला कोरस गाणे थांबवायचे आहे. याचे कारण म्हणजे, कुठेतरी मला लाज वाटू नये. लाज वाटण्यापेक्षा, मला तिचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो.”

लोकप्रिय पार्श्वगायक शान ‘चार कदम’, ‘कुछ तो हुआ है’, ‘आओ मिलो चलो’, ‘हे शोना’, ‘जब से तेरे नैना’ आणि ‘बेहती हवा सा’ या गाण्यांसाठी ओळखला जातो. शानने टेलिव्हिजनवर ‘सा रे ग म पा’, ‘सा रे ग म प लिल चॅम्प्स’ आणि ‘स्टार व्हॉईस ऑफ इंडिया’ सारखे कार्यक्रम देखील होस्ट केले आहेत. बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्याला अनेक आयफा आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा