Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड युक्रेनमध्ये शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनु सूदने व्यक्त केली चिंता, ट्वीट करत म्हणाला…

युक्रेनमध्ये शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनु सूदने व्यक्त केली चिंता, ट्वीट करत म्हणाला…

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या दिलदार व्यक्तिमत्त्वामुळे विशेष प्रसिद्ध आहे. सोनुने कोरोना काळात गोर गरिबांना, गरजूंना केलेल्या मदतीने तो लाखो गरिबांसाठी देव बनला होता. या काळात प्रत्येकजण सोनू सूदने केलेल्या कामाचे, मदतीचे कौतुक करताना दिसत होता. त्यामुळेच सोनूच्या या कामासाठी प्रत्येकजण आभार मानत होता. आता पुन्हा एकदा सोनु सूदने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी चिंता व्यक्त केली आहे.

जगभरात सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. दोन्ही देशात सध्या प्रचंड संघर्ष सुरू झाला असून युक्रेनवर रशियाने बॉम्ब हल्ला केला आहे. ज्यामुळे युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. रशियाच्या पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये हल्ल्याची घोषणा करताच अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित राहण्याचे संदेश दिले आहेत. सोबतच त्यांच्यासाठी प्रार्थनासुद्धा करत आहे.

या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी उपाय शोधण्याचेही त्याने आव्हान केले आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणतो की, “१८,००० भारतीय विद्यार्थी आणि अनेक कुटुंबे युक्रेनमध्ये अडकले आहेत. मला विश्वास आहे की, भारत सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असेल. मी भारतीय दूतावासातुन त्यांना या समस्येवर मार्ग काढण्याचा आग्रह करत आहे.” याबद्दल सोनू सूदसह अनेक कलाकारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान अभिनेता सोनु सूद त्याच्या या दिलदार व्यक्तिमत्वासोबतच दमदार अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध आहे. सोनूने अनेक गाजलेल्या चित्रपटात आपल्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याने १९९९ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला तो तामीळ चित्रपटातील आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. मात्र त्यानंतर त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले. सोनूने आपल्या अभिनयाने अनेक दशके चित्रपट जगतावर अधिराज्य गाजवले आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तो नेहमीच त्याच्या सामाजिक आणि लोकोपयोगी कामांमुळे सगळीकडे कौतुकाचा विषय ठरत असतो.

हेही वाचा –

हे देखील वाचा