Tuesday, December 3, 2024
Home कॅलेंडर ‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत

‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत

या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकं फक्त मुख्य नायक आणि नायिका बनण्यासाठीच येतात, पण नायक आणि नायिका यांच्याव्यतिरिक्त देखील सिनेमांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका असतात. नेहमी चर्चांमध्ये देखील मुख्य अभिनेता आणि अभिनेत्रीच असतात. या दोन व्यक्तिरेखा सोडून सिनेमात जर काही महत्त्वाचं असतं, तर ते म्हणजे खलनायक. खलनायकाशिवाय नायकाला महत्त्व असतंच कुठं ना. खलनायक नसला, तर सिनेमाची सगळी मजाच जाते. आताच्या काळातील खलनायकांना पाहून प्रेक्षकांना एवढी भीती वाटणार नाही, पण 70, 80 आणि 90च्या दशकातील खलनायक पाहिले, तर प्रेक्षकांना ते खलनायक खऱ्या आयुष्यातही तसेच आहेत की काय असं वाटायचं. याच खलनायकाच्या भूमिका निभावून बॉलिवूडमध्ये खलनायकाला नायकाइतकेच महत्त्व मिळवून देणारे अभिनेते म्हणजे अमरीश पुरी.

भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी या ग्लॅमर क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केलंय, पण मंडळी तुम्हाला माहितीये का? अमरीश पुरी सुरुवातीला विमा कंपनीत काम करायचे. मग त्यांना सिनेमाची ओढ कशी लागली? कसे ते एवढे प्रसिद्ध अभिनेते बनले, हेच आज आपण या लेखातून जाणून घेऊया…

अमरीश पुरी हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर त्यांच्या अनेक खलनायकी भूमिका येतात. अमरीश पुरींनी त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या उत्कृष्ट संवादफेकीमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यांचे सिनेमे रिलीझ झाल्यानंतर रसिक प्रेक्षक फक्त अमरीश यांचे संवाद ऐकण्यासाठीच जायचे. अमरीश कदाचित पहिले असे खलनायक असतील, ज्यांनी त्यांच्या बळावर चित्रपट यशस्वी केले आहेत.

पंजाबच्या नवांशहरमध्ये 22 जून,1932रोजी अमरीश पुरी यांचा जन्म झाला. प्रत्येकजण तोंडात चांदीचा चमचा घेऊन येत नसतो. जवळपास सर्वांनाच पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम तर करावंच लागतं. अमरीश पुरींनीही अभिनयात येण्यापूर्वी सरकारी नोकरी केली, पण अभिनयाची आवड त्यांना नोकरीकडे जाऊच देत नव्हती. तरीही त्यांनी कसंतरी २१ वर्षे विमा कंपनीत काम केलं. काम करतानाच त्यांची भेट इब्राहिम अल्काजी यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्या या आवडीचे रूपांतर स्वप्नात झाले. इब्राहिम अल्काजी म्हणजे थिएटर दुनियेतील मोठ्ठं नाव. ते थिएटर दिग्दर्शक होते. त्यांनी अमरीश पुरींना थिएटर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमरीश पुरींनी थिएटर आणि सिनेदिग्दर्शक सत्यदेव दुबे यांची भेट घेतली. अमरीश पुरी जेव्हा थिएटर करत होते, तेव्हाच त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायचा होता, पण दुबेंनी त्यांना सांगितलं की, सिनेमात जोपर्यंत चांगला रोल मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी आपली नोकरी सोडली नाही पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अमरीश एक नाटक करत होते, तेव्हा त्यांना दिग्दर्शक सुखदेव यांनी पाहिलं होतं. त्यांनीच त्यांच्या 1971साली आलेल्या ‘रेशमा और शेरा’ सिनेमात घेतलं. त्यावेळी त्यांचं वय होतं 39वर्षे. याच सिनेमातनं अमरीश पुरींची मोठ्या पडद्यावरच्या करिअरला सुरुवात झाली होती. जेव्हा त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, तेव्हा ते ए ग्रेडचे ऑफिसर झाले होते, पण ते म्हणतात ना, ‘जे होतं, ते चांगल्यासाठीच होतं,’ हे अमरीश पुरींसाठीही खरंच ठरलं.

‘रेशमा और शेरा’ या सिनेमातील अमरीश यांचा अभिनय सर्वांनाच खूप आवडला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहण्याचा प्रश्नच येत नव्हता. या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अमरीश पुरींनी ज्या हेतूने प्रवेश केला, त्यांचा तो हेतू साध्य तर झालाच, पण वेगळ्या पद्धतीने. नायक होण्याच्या स्वप्नाने या क्षेत्रात आलेल्या अमरीश पुरींनी खलनायक होऊन नायकापेक्षा अधिक लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘नायक’, ‘मिस्टर इंडिया’, ‘करण अर्जून’, ‘कोयला’ अशा जवळपास ३०० पेक्षा अधिक सिनेमात त्यांनी काम केलं. अमरीश यांनी जवळपास सर्वच सिनेमांमध्ये क्रूर खलनायक रंगवला. त्यांनी साकारलेल्या सर्व खलनायकांवर भारी पडला तो 1987 साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘मोगॅम्बो’. त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे तर सोडाच. आजही प्रेक्षकांना आनंद झाला तरी त्यांच्या तोंडात आपसुकच, ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग येतो म्हणजे येतोच. अशाप्रकारे त्यांचे या सिनेमातले डायलॉगही अजरामर झाले.

अमरीश यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांपेक्षा, ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात एकदम विरुद्ध होते. अनेक दशकं या क्षेत्रात राहूनही त्यांचे कोणासोबत अफेअर झाले नाही. अमरीश यांच्या आयुष्यात सुरुवातीपासून ते त्यांच्या जाण्यापर्यंत फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे त्यांची पत्नी उर्मिला दिवेकर. या क्षेत्रात येण्याआधीपासूनच त्यांची आणि उर्मिला यांची भेट झाली होती. पंजाबी आणि साऊथ इंडियन अशी जोडी असणाऱ्या या कपलच्या लग्नासाठी घरातून खूप विरोध झाला. पण, खाईन तर तुपाशी नाही, तर उपाशी ही म्हण इथं अमिताभ यांना लागू होते. त्यांनी हार न मानता प्रयत्न केले आणि 1957साली त्यांचं लग्न झालं.

अमरीश पुरी खूप मोठे आणि ताकदीचे अभिनेते होते. त्यांच्यातील अभिनेता किती खरा होता, याचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी धर्मवीर भारती यांनी लिहिलेल्या ‘अंधायुग’ या नाटकात ‘धृतराष्ट्र’ ही भूमिका साकारली होती. अमरीश पुरींचे हे पहिलेच नाटक होते. पण हे नाटक करताना अंध दाखवण्यासाठी डोळे उघडे ठेवणे आवश्यक होते. असे राहण्यासाठी खूप त्रास होत होता. मुख्य म्हणजे 17 मिनिटांच्या या नाटकात अमरीश यांचे मोठे मोनोलॉग होते. पण जेव्हा नाटक सुरू झाले, तेव्हा त्यांनी एकही संवाद न विसरता 17मिनिटं पापण्या न झपकता ही भूमिका निभावली. नाटक बघणारे प्रेक्षक देखील हैराण झाले की, 17 मिनिटं ते पापण्या न झपकता कसे राहिले.

अमरीश पुरींनी या क्षेत्रात येण्यासाठी आणि इथे टिकण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे त्यांचा मुलगा राजीवने या क्षेत्रात यावे, अशी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. या अस्थिर इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी दिवसरात्र घ्यावे लागणारे कष्ट त्यांना मुलाला द्यायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी मुलाला या इंडस्ट्रीमध्ये न येण्याचे सांगितले. आज त्यांच्या मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये आहे.

सिनेसृष्टी दणाणून सोडणाऱ्या अमरीश पुरींचं 12 जानेवारी, 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले, पण त्यांचे डायलॉग आणि त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत, हे महत्त्वाचं.

अशाप्रकारे 21 वर्षे काम करून ए ग्रेड ऑफिसर बनल्यानंतरही अमरीश यांनी ती नोकरी सोडली आणि फिल्म इंडस्ट्रीत येऊन ती गाजवलीही.(special story about amrish puri know here)

अधिक वाचा –
– खिशात 500 रुपये घेऊन मुंबईत आले, नाना पाटेकरांनी केलेली मोलाची मदत; मकरंद अनासपुरेंबद्दल तुम्हाला हे माहितीये का?
मानधन घेताना रजनीकांत यांनाही टक्कर देतो थालापती विजय, कुण्या अभिनेत्रीसोबत नाही तर चक्क फॅनसोबत केलंय लग्न

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा