मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय गुणी अभिनेत्री असलेली स्पृहा जोशी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच स्पृहा अतिशय सुरेख कवियत्री देखील आहे. तिच्या कवितांचे अनेक लोकं वेडे आहेत. स्पृहाचे कवितेवरील प्रेम जगजाहीरच आहे. तिच्या कविता आतातर चित्रपटांमध्ये गाण्याच्या स्वरूपात देखील आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. सध्या स्पृहाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर चांगलीच सक्रिय झाली असून, या चॅनेलच्या माध्यमातून ती सतत तिच्या फॅन्सच्या आणि नेटकऱ्यांच्या संपर्कात आहे.
या चॅनेलचा वापर करून स्पृहा तिच्या चाहत्यांच्या फर्माईशी पूर्ण करते. अनेक कवितांचे वाचन करते, वेगवेगळ्या खास दिवसांच्या अनुषंगाने ती विविध कविता वाचताना दिसते. स्पृहाचे हे यूट्यूब व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात आणि तुफान गाजतात देखील. २७ मार्च अर्थात नुकताच आपण जागतिक रंगभूमी दिन साजरा केला.
या रंगभूमी दिनाच्या औचित्याने स्पृहाने तिच्या या यूट्यूब चॅनेलवर एक खास व्हिडिओ शेअर करत रंगमंचावरील सह कलाकारांमध्ये असलेल्या एका खास आणि सुंदर नात्याला तिने तिच्या कवितेतून व्यक्त केले आहे. रंगमंचावर वावरताना कलाकारांना एकमेकांची मोठी साथ असते. अनेक तास ते एकमेकांसोबत असतात, अशा वेळी आपल्या कलाकाराबद्दल मनात येणाऱ्या भावना स्पृहाने अतिशय समर्पक शब्दात तिच्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
तू नेमका कसा आहेस काय सांगू?
शब्दांच्या चिमटीत तुला नेमकं कसं पकडू?
रंगमंचावरच्या कठपुतळ्या जिवंत होत जातात क्षणाक्षणाने,
एका अवकाशात आपलं अस्तित्व वाढवत नेतात कणाकणाने..
तूही त्यातलाच एक..
काही रानटी झाडं असतात, आपली आपण वाढणारी
आपल्या मस्तीत, उग्र सौंदर्याने भारून टाकणारी..
आपल्याच आकाशाला हरक्षणी अधिकाधिक उंच करत जाणारी!
त्या क्षणी, त्या त्रिमितीत
चौथी भिंत ओलांडून
एक इवलीशी मूर्ती साकारते
काही सगळ्यात सुंदर, सगळ्यात शूर,
सगळ्यात प्रेमळ, सगळ्यात क्रूर!
सगळं काही तुझ्यात असतं,
सगळं काही तिथेच घडतं.
वाळूसारखा एकेक क्षण निसटताना अलगद मनात बंदिस्त होतो,
एक साधासा तरुण आता वेडावून टाकतो, कवेत घेतो,
माझ्यासाठी कायमचा रुबाबदार राजकुमार होतो.
वेळ सरून जाते, वय हरवून जातं.
लोक वेडे, अट्टाहास करत राहतात
‘जुन्या’ तुला शोधण्याचा,
मी?.. मी आनंद घेत राहते,
रंगमंचावर रोज ‘नवा’ तू सापडण्याचा..!!
– स्पृहा.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –