Saturday, June 29, 2024

संगीतविश्व समृद्ध करणारे संगीतकार अजय- अतुल, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

ज्यांच मन संगीतासाठी बालपणापासूनच उधाण झालं, ज्यांच तन मन संगीतातच रंगल दंगलं आणि बेभानही झालं, अशी एक गायक, गीतकार, संगीतकार भावांची जोडी जिने सर्वांना त्यांच्या तालावर नाचायला भागही पाडलं आणि त्यांच्यात संगीतातून आंतर्मुख व्हायलाही भाग पाडलं. ज्यांच संगीत केवळ भक्तीगीत, लोकगीतापुरतं मर्यादीत राहिलं नाही, तर लावणी, डिजे, अगदी आयटम साँगपर्यंत गेलं. ज्यांनी त्यांच्या संगीतातून इतिहास घडवला, ते म्हणजे अजय – अतुल. अस्सल मराठमोळी जोडी, जिने संपूर्ण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण केली. ज्यांनी अनेकदा पूर्वापार चालत आलेल्या काही मर्यादा पार करत अनेक सुमधूर गाणी दिली, त्या जोडीचा आजपर्यंतचा प्रवास झाला तरी कसा जाणून घेऊया.

11 सप्टेंबर 1974रोजी अतुलचा आणि त्यानंतर दोन वर्षांनी 21 ऑगस्ट 1976रोजी अजयचा पुण्यात राहाणाऱ्या गोगावले कुटुंबात जन्म झाला. वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे कुटुंबात संगीताचा वारसा असणं वैगरे काही संबंधच नव्हता. पण अजय आणि अतुल दोघे भावांना लहानपणापासूनच गाणी वेड लावत होती. ते पुण्यात फिरायचे त्यावेळी असणारे बँड पाहायचे, त्यातील वाद्य त्यांना आकर्षित करायची. असाच त्यांचा संगीताकडे कल हळूहळू वाढत होता. बरं त्यात शिक्षणात फार गती नव्हती, पण तरी बेसिक शिक्षण घ्यायलाच हवं तसं त्यांनी पुढे घेतलंही. पण लहानपणी लागलेल्या संगीताच्या आवडीने त्यांना आज सेलिब्रेटी केलं हे नक्की.

लहान असताना हे दोन भाऊ पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावायचे, खरंतर त्यावेळी त्यांना ते जे काही करत आहेत, त्यालाच संगीतकार असणं असं म्हणतात, हे त्यांच्या गावीही नव्हतं. संगीत दिग्दर्शन, संगीतकार अस काही असतं ही त्यांना माहितही नव्हतं. पण त्यांना ते आवडत होतं. आपण नाही का कधीतरी टेबलच वाजव, कपाटच वाजव असं काही करतो, तसं ते दोन भाऊ मिळून करायचे. मग त्यासाठी कधी घरातली भांडीही वापरायचे. मिळेल ती गाणी ऐकायचे. त्यावर बालमनाला पटेल अशा चर्चाही करायचे. पण याच गोष्टींचा त्यांच्या जडनघडनीत फायदा होत गेला. मोठा भाऊ अतुल गायचा, मग त्याला लहान भाऊ अजय साथ द्यायचा असाच आपला त्यांचा प्रवास सुरु झालेला. खरंतर तिथेच अजय-अतुल ही जोडी बनायला सुरुवात झाली होती.

वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्या बदली होत होत्या. तशी त्यांची बदली शिरुरला झालेली. त्यावेळचीच एक गोष्ट ही दोघं एकदा दुसरी – चौथीत असतानाची गोष्ट, त्यांनी बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा शिरुर येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी सादर केलेला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके देखील उपस्थित होते. त्यांना या दोघांचा पोवाडा एवढा आवडला होता, की त्यांनी त्यांचा सत्कार केलेला. त्यावेळी या दोन भावांनी अनेकदिवस तो हार जपून ठेवला होता.

वडीलांच्या बदली होत असल्याने प्रत्येकवेळी नव्या गावात नव्याने मित्रमंडळी तयार होत असत, पण तरी ते व्हायला काही वेळ लागत. मग अशा परिस्थितीत हे दोन भाऊच एकमेकांचे चांगले मित्र बनले, जिथे जातील तिथे एकत्रच जायला लागले. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम, माया आणि मैत्री बहरत होतं, बरं एकाकडे एखादी गोष्ट नसली, तरी दुसऱ्याकडे ती असायची. त्यामुळे ते दोघे एकमेकांना पूर्ण करायचे. त्यांचा प्रवासच असा सुरू होता. मग सायकलवरून डबलसीट फिरणं, ते फिरताना चाली तयार करणं हे या दोन भावांमध्ये व्हायचं. ते एखाद्या गाण्यांवर चर्चाही करायला लागले की गाणं एवढं भारी कसं झालंय याचं त्यांना कुतुहल वाटायला लागलं. हळुहळू दिसेल ते आणि मिळेल त्यातून ते गाण्यांबद्दल शिकायला लागले. घरची परिस्थिती तशी बेताची होती, दोन वेळचं सुखाने जेवायला मिळत होतं, पण तरी मुलांचे सगळेच हट्ट पूर्ण करता येतील अशातली गोष्टही नव्हती. एकदा असं झालं की हे दोघे भाऊ पुण्याला आल्यानंतर बँडबरोबर वैगरे फिरायचे. पण एकदा त्यांना तिथूनच संगीताच्या एका क्लासबद्दल माहिती मिळाली, आता वाद्यांची आणि संगीताची आवड असलेले हे दोघंजण त्या क्लासबद्दल विचारायला गेले, तिथून सगळी माहिती काढून तू हे शिक मी हे शिकतो वैगरे अशी स्वप्न रंगवत घरी पोहचले आणि वडीलांना सांगितलं. पण वडिलांनी दोघांनाही परिस्थितीची जाणीव करून देत आपल्याला ते शक्य नसल्याचे सांगितले. पण तरीही या दोन भावांची आवड काही कमी होत नव्हती. तसा घरातून त्यांच्या संगीताला पाठिंबाही नव्हता आणि विरोधही नव्हता. पोरं करतायेत काही तरी तर करू देत म्हणून आई-वडिलांनी कधी त्यांना ना म्हटलं नव्हतं. त्यामुळे हे दोघे भाऊ, मित्रांकडून त्यांच्याकडे असलेल्या वाद्यांवरून शिकत होती. असं करत करतच ते काही जाहिरातींसाठी काही मालिकांसाठी चाली तयार करू लागली. बरं यांच्याकडे कोणतं वाद्य नव्हतं, त्यामुळे प्रोड्यूसरला, दिग्दर्शकाला सायकलवरून येताना रचलेल्या चाली ते तोंडानेच ऐकवत. असंच काम ते सुरुवातीला करू लागले.

असाच एक किस्सा असा की एकदा एका प्रोड्यूसरने त्यांना पैशांऐवजी त्याच्याकडे त्याच्या वडीलांनी दिलेला पण फार वापर न झालेला हार्मोनियम त्यांना दिला. खरंतर या हार्मोनियमने त्यांची फार साथ दिली. कारण आता हातात वाद्य आलं होतं. अशीच त्यांच्या लहानपणीची गोष्ट म्हणजे तिळगूळ देण्याच्या बहाण्याने ते पंडीत भीमसेन जोशींना भेटायला गेले होते आणि त्यांच्याकडून आशिर्वादही घेऊन आले होते. त्यांच्यासाठी इलाईराजा म्हणजे आदर्श होते. त्यांच्याकडे पाहून त्यांना संगीत याविषयी आधिक आकर्षण वाटायचं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यामुळे त्यांना पुढे इलाईराजा यांच्याशी भेटही करता आली होती. त्यांच्यासाठी तो एक दैवी क्षण होता. आणखी एक त्यांच्या लहानपणीचा किस्सा म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम व्हायचा. त्यात अतुल हार्मोनियम वाजवायचा आणि अजय कोरस द्यायचा. पण एकदिवस त्या कार्यक्रमातील मुख्य गायक आला नाही, आणि त्यावेळी अजयने गाणं गायलं. सर्वांना ते आवडलंही. तिथेच अजयमधील गायक सापडला होता. पुढे त्याने अनेक गाणी गायलीही.

असो, पुढे पुण्यात शिक्षण घेता घेता असंच काम करताना ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर अगदीच हॉटेलमध्ये राहणं वैगरे सगळंच काही परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे ते स्टुडिओमध्येच झोपायचे. बरं हे स्ट्रगल त्यांनी एंजॉय केल्याचं ते आजही सांगतात. त्यांच्यामते ते ज्यासाठी हे करत होते, त्यात त्यांना आनंद मिळत होता, त्यामुळे तो स्ट्रगल कधी त्यांना स्ट्रगल वाटला नाही. याचदरम्यानची एक गोष्ट म्हणजे आपली मुलं काही इंजिनियर, डॉक्टर बनणार नाहीत हे आई-वडील जाणून होते. त्यामुळे एकदा या भावांच्या इच्छेखातर त्यांनी साधारण एक लाखापेक्षा जास्त किंमत असलेला कि बोर्ड त्यांना घेऊन दिला होता. आता आई – वडिलांनी एवढा विश्वास टाकलाय म्हटल्यावर या दोन भावांनी एखादं खेळणं असावं असा तो कि बोर्ड कोळून प्यायला. त्यांना आता हातात साधन मिळालं होतं. पुढे मुंबईत स्ट्रगल सुरू असताना त्यांना टाईम्स म्यूझिककडून विश्वविनायक या अल्बमसाठी काम मिळालं आणि खऱ्या अर्थाने त्यांना बाप्पाचा आशिर्वाद मिळाला. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेले नाही. त्या अल्बममध्ये एस. पी. बालसुब्रमण्यम, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. असं अनेक वृत्तांत म्हटलंय या अल्बमनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची प्रोड्यूसर राम गोपाल वर्मा यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर त्यांनी गायब या हिंदी चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले. त्यांनी राम गोपाल वर्मा यांचात तेलुगू चित्रपट शॉकसाठीही काम केलं. असं करत त्यांना कामं मिळत गेली. मराठीत त्यांचा पहिला मोठा चित्रपट ठरला, तो म्हणजे अगं बाई आरेच्चा. या चित्रपटातील मल्हारवारी, मन उधान वाऱ्याचे अशी गाणी आजही रसिकांची आवडती आहेत. पुढे त्यांनी सावरखेड एक गाव, जत्रा, नटरंग, जोगवा, चेकमेट, उलाढाल, एक डाव धोबिपछाड, आता गं बया, सैराट, लय भारी, माऊली, झुंड अशा अनेक चित्रपटांसाठी हिट गाणी दिली. केवळ मराठी पुरतंच त्यांच काम मर्यादीत राहिलं असं नाही. त्यांच्यामते संगीत हे जागतिक आहे, त्याला मर्यादा नसते. त्याचमुळे त्यांनी शंकर महादेवन असो, कुणाल गांजावाला असो, श्रेया घोशाल असो किंवा हरिहरन अशा अमराठी गायकांकडूनही मराठी गाणी गाऊन घेतली. ते सांगतात जेव्हा एखादं गाणं ते तयार करत असतात, त्याचेवेळी ते गायकाचा विचार करायला लागतात आणि त्यामुळे ते त्याच गायकाकडून ते गाणं गाऊन घेण्याचा प्रयत्न करतात. हेच त्यांच्या यशाचं गमकही आहे, त्यांना कुठे कोणती गोष्ट हवी हे समजतं, त्यात लहानपणी गाण्यांचा केलेला ऍनेलिसेस आता त्यांना फायदेशीर ठरतो. त्यांच्या अनेक मुलाखतीत त्यांनी असंही सांगितलं की ते संगीताबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान घेतलं नसेल, पण त्याचमुळे त्यांनी कोणतीही चौकट ठरवलेली नाही, त्यांना चौकटीबाहेरचा विचार करता येतो. त्यांनी पुढे मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही आपली जागा तयार केली, आज त्यांच्या नावावर अग्निपथ, विरुद्ध, सिंघम, पीके, सुपर ३०, झिरो, तानाजी, धडक असे गाजलेले हिंदी चित्रपटही आहेत.

त्यांनी जत्रा या मराठी चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्याचीच चाल अग्निपथमधील चिकनी चमेली या गाण्यालाही दिली आहे. त्यावरून अनेकदा त्यांना तीच तीच चाल का लावता असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर ते सांगतात. दुसऱ्यांनी आमची चाल वापरून काहीतरी चूकीचं करण्यापेक्षा आम्ही आमच्याच गोष्टी वापरणं कधीही चांगलं. आता कोंबडी पळाली या गाण्याबद्दल बोलतच आहोत, तर त्याचा किस्सा असा की असं काही गाणं त्या चित्रपटात करायचं ठरलं नव्हतं. पण भरत जाधवच्या एका पात्राच्या तोंडात सतत येणारा ऑ या शब्दात त्यांना एक ठेका दिसला, आणि त्यांनी असं काहीतरी गाणं होऊ शकतं म्हणून चित्रपट दिग्दर्शक आणि प्रोड्यूसरला तयार केलं आणि आनंद शिंदे यांच्याकडून ते गाऊनही घेतलं. त्या गाण्याने पुढे धूमाकूळ घातला. आणखी एक आशाच एका गाण्याचा किस्सा असा की आता ग बया या चित्रपटातील सजून सांज अशी हे गाण्यासाठी दिलेलं म्यूजिक हे चक्क तोंडाने तयार करण्यात आले आहे. यामागे संजय नार्वेकरने त्यांना चॅलेंज दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केल्याचं सांगितलं जातं. त्या गाण्यासाठी चक्क 9 दिवस रेकॉर्डिंग झालं होतं.

अजय अतुल यांची एक चांगली गोष्ट म्हणजे ते चित्रपटांसाठी गाणी तयार करताना आधी त्या चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्र समजून घेतात, जेणेकरून त्या कथेच्या अनुशंगाने आणि पात्रानुसार गाणी तयार करता येतील. सैराटच्या बाबतीतलाच एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणजे ज्यावेळी नागराज मंजुळे त्यांना जेव्हा कथा ऐकवत होते. त्याचवेळी त्यांना एक ट्यून सुचली होती, त्यासाठी त्यांनी मंजुळेना सांगितलं की त्या चित्रपटातील परशा नावाचं पात्र जे विहरीकडे पळत जाणारे त्याला स्लोमोशनमध्ये पळत जाऊ द्या म्हणजे तिथे एक सुंदर गाणं बसेल आणि तिथेच याड लागलं गाण्याचं ट्यून तयार झाली. त्यात वापरलेले गावकडचे शब्दही जाणूनबुजून वापरण्यात आलेले, त्याला कारण असं की त्या चित्रपटाचा मुळ ठेकाच गावकडचा होता. बरं या गाण्यानं आणखी एक इतिहास घडवला. तो म्हणजे हे भारतातील पहिलं गाणं बनलं, जे हॉलिवूडमधील स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं. तो अनुभव सांगताना अजय-अतुल म्हणतात त्या क्षणाचं वर्णन ते करूच शकत नाहीत. सैराट चित्रपट आजही त्यातील गाण्यांसाठी सर्वांच्या लक्षात राहातो. बरं या चित्रपटाने केलेले विक्रम पाहाता, हिंदीत तो धडक नावाने, तर मनासू मलिंगे या नावाने कन्नडमध्ये रिमेक करण्यात आला. या दोन्ही रिमेक चित्रपटांसाठीही अजल-अतुलनेच संगीत दिलं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पहिले मराठी संगीत दिग्दर्शक ठरले, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना जोगवा या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अजय आणि अतुल या दोन भावांना मोठं यश मिळाल्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांनी लहानपणापासून लावणी, जागरण गोंधळ, वासुदेव, अशी अनेक लोकगीतं ऐकली होती पाहिली होती आणि त्याचाच त्यांना फायदा झाला. आज त्याचमुळे सामान्य माणसांपर्यंत त्यांची गाणी पोहचतात ती सामान्य मानसांना गाता येतात आणि त्या गाण्यांवर ठेकाही धरावा वाटतो. त्यांची अगदी मन उधाण वाऱ्याचे पासून, कोंबडी पळाली, आप्सरा आली, खेळ मांडला, जीव रंगला दंगला, झिंगाटपर्यंत अनेक गाणी हिट झाली. ती अनेकदा कोणत्याही कार्यक्रमात , गाडीत वाजतानाही दिसतात. ते सांगतात की त्यांना लाईव्ह म्युझिक जास्त आवडतं म्हणजे इलेक्ट्रॉनिकवर वाद्यांचा आवाज काढणं सोपं आहे पण त्यात तांत्रिकपणा असतो. पण जेव्हा एखादा व्यक्ती एखादं वाद्य वाजवतो, त्याच जिवंतपणा असतो, कदाचित त्यांच्या याच विचारांमुळे आजही लोकांना त्यांची गाणी जवळची वाटतात.

त्यांनी त्यांच काम कधीच चित्रपटांपुरतं मर्यादीत ठेवलं नाही. त्यांनी विश्वविनायका नंतर बेधूंद, संग संग हो तुम, मिरा कहे, विश्वात्मा अशी काही अल्बमही काढले, काही रिऍलिटी शो मध्ये ते जजही बनले. अनेका नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. अनेक मालिकांसाठी गाणी लिहिली. त्यांना 2003 साली सही रे सही या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी अल्फा गौरव पुरस्कारही मिळाला होता. हा त्यांचा पहिला मोठा पुरस्कार होता. त्यांनी लख लख चंदेरी, झी गौरव गीत अशी गाणीही तयार केली. त्यांनी महाभारत, एका पेक्षा एक, राजा शिवछत्रपती, वादळवाट, सा रे ग म प आशा मालिकांसाठी, शो साठीही गाणी केली. त्यांनी अजल अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट या नावाने आपला कार्यक्रमही केला. त्यांनी मेक इन इंडियाच्या प्रेझेंटेशनसाठी बॅकग्राऊंड म्यूझिक स्कोरही दिला. इतकंच नाही तर जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातून त्यांनी प्रोड्यूसर म्हणूनही पाऊल ठेवलं. मुळात जे जे संगीतात प्रयोग करता येतील, ते ते करून पाहायचे हेच या दोन संगीतवेड्या भावांना माहित आहे. बरं त्यांच्यात कधी भांडण होतं का या प्रश्नावर ते सांगतात आमची व्यक्तीमत्व वेगळी आहेत, एरवी आम्ही छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादही घालतो, पण संगीताच्या बाबतीत कधी वाद होत नाहीत. खरंतर ते एकमेकांना पूर्ण करतात, म्हणूनच ते एकमेकांपासून दूर होऊ शकत नाहीत, असंच त्यांच म्हणणं आहे.

त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल ते फार कधी कुठे बोलत नाहीत, किंवा फार काही माहिती उपलब्धही नाही. पण या दोघांचीही लग्न झाली असून ते दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. आता त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दलच बोलायचं झालं तर ते त्यांच्या आई-वडिलांच्या फार जवळ आहेत. पण जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हाची ही घटना. त्यांच्यासाठी आई-वडील म्हणजे सगळंकाही आहे. त्यामुळे वडील जाणं हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना फँड्रीसाठी टायटल साँग करण्याचं काम आलं होतं. आता नागराज मंजुळेंचा चित्रपट, आणि झीचा चित्रपट असल्याने त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला. ज्या दु:खातून ते जात होतं, त्याच भावना फँड्रीच्या टायटल साँगमधून उतरल्याचे ते सांगतात.

असो, पण लहानपणी लागलेल्या संगीतवेडाने या दोन भावांना आज इथपर्यंत आणलं, त्यांच्या जमीनीवरच पाय घट्ट रोवून ठेवण्याच्या स्वभावाने आणि प्रत्येकवेळी काहीतरी नवीन वेगळं करण्याच्या वेडाने आज त्यांना यश मिळालंय. फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटिंच्या पहिल्या 100 जणांमध्येही त्यांचं नाव झळकलंय. अशी ही भावांची जोडी या पुढेही अनेक आजरामर गाणी सर्वांसाठी घेऊन यावेत हीच अपेक्षा आज आपण बाळगू शकतो.

अधिक वाचा- 
अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देत सना खानने गुपचूप केले लग्न; तर अपहरण केल्याचाही लावण्यात आला होता अभिनेत्रीवर आरोप
‘तेरे नाम’ हिट झाल्यानंतर ‘या’ दाेन चित्रपटातून भूमिका चावलाला का केले रिप्लेस? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा