Saturday, December 7, 2024
Home कॅलेंडर प्रेमात झुरत असलेल्या आशिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक कैलाश खेर

प्रेमात झुरत असलेल्या आशिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक कैलाश खेर

गेल्या दशकात अनेक भारतीय गायकांनी बॉलीवूड आपल्या आवाजाने गाजवलं. तेव्हा आतासारखे मोठ्या प्रमाणावर गायक नव्हते किंवा समोर येत नव्हते. त्यामुळे चाहत्यांना कोणत्या गायकाने कोणत्या चित्रपटातील गाणं गायलंय हे तोंडपाठ असायचं. अशातच एक गायक ‘अल्ला के बंदे’ म्हणत बॉलीवूडमध्ये येतो काय अन् हे सगळं विश्व व्यापून घेतो काय? सगळंच अद्भुत होतं. हे पहिलं गाणं गाण्यासाठी त्याने जवळपास ८०० जिंगल्स गायल्या होत्या, हे फारसं कुणाला माहितंही नसेल. तो गायक अर्थातच कैलाश खेर.

खेर यांच्या गाण्याची प्रेरणा

लांब कुरळे केस हे कैलाशच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य आकर्षण आहे. कैलाश यांच्या गाण्यांवर लोकसंगीत आणि सुफी संगीताचा पगडा.  ७ जुलै १९७३ मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ मध्ये कैलाशचा जन्म झाला. कैलाशचे बालपण मेरठ मधेच गेलं. लहानपणी त्यांनी कधीच संगीत ऐकले नाही किंवा गाणे गायले नाही. वडिलांकडून ते कबीरांचे दोहे आणि गुरुसाहेबवाणी ऐकत. त्याचे वडील लोकगीत गात असतं. वडिलांकडून कैलास यांनी संगीताचे थोडे फार ज्ञान मिळवले. तेव्हा कैलास यांना गाणे आणि संगीताबद्दल प्रेम निर्माण झाले. पंडित भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर, कुमार गंधर्व, नुसरत फतेह अली खान यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली.

गाण्यासाठी गाठली दिल्ली

कैलास यांनी संगीताच्या पुढील शिक्षणासाठी वयाच्या १३ व्या वर्षी दिल्ली गाठली. मात्र उदरनिर्वाहासाठी त्यांनी संगीत शिक्षणासोबत काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्याच्या संगीत शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ लागला. त्यांनी खर्च भागवण्यासाठी अनेक उद्योग सुरु केले मात्र त्यांना सर्व उद्योगांमध्ये अपयश मिळाले. या अपयशाच्या मालिकांमुळे निराश होऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.  पण ते म्हणतात ना अपयश हि यशाची पायरी आहे. याच अपयशातून त्यांना आशेचा एक किरण सापडला आणि त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत केला मोठा संघर्ष

गायक होण्यासाठी त्यांनी मुंबई बराच काळ संघर्ष केला. अनेक संगीतकारांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी ऑडिशन दिल्या. त्यांच्या याच प्रयत्नांना अखेर थोडे यश आले आणि त्यांना संगीतकार राम संपत यांनी एक जाहिरातीसाठी गाणे गायला बोलवले आणि इथूनच त्याचे नशीब पालटायला सुरुवात झाली.

रब्बा इश्क ना होवे अन् अल्ला के बंदेने रचला इतिहास

पुढच्या काही दिवसातच त्यांनी अक्षय कुमारच्या ‘अंदाज’ या सिनेमात ‘रब्बा इश्क ना होवे’ हे गाणे गायले आणि त्याच्या संगीताच्या गाडीने वेग धरला. २००३मध्येच आलेल्या वैसा भी होता है पार्ट २ सिनेमातील ‘अल्लाह के बंदे गाण्याने धुमाकूळ घालता. कैलाश खेर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. प्रेमात झुरत असलेल्या प्रेमवीरांचा कैलाश आवडता गायक बनला.

मिळाली मोठी संधी

त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यात स्वदेस, मंगल पांडे, सरकार, बाहुबली, सलाम-ए-इश्क, फना आदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे अल्बम देखील प्रचंड लोकप्रिय झाले. शिवाय कैलाश यांनी अनेक जिंगल्स देखील स्वरबद्ध केल्या. कैलास यांनी आजवर अनेक प्रादेशिक भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

चांगल्या कामाचे असे मिळाले बक्षीस

कैलाश यांना २००७ साली फना या सिनेमासाठी फिल्मफेयर अवॉर्ड देखील मिळाला. त्यांच्या या संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल २०१७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वाचनीय लेख-


 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा