Thursday, April 18, 2024

आमिर खानसोबत पदार्पण करूनही नाही मिळालं यश, कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी बनत सुमोनाने कमावलं नाव

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून करिअरची सुरुवात करून चित्रपटांपर्यंत पोहोचलेले अनेक कलाकार आपण पाहिले असतील. मात्र, काही असेही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात चित्रपटांपासून केली, पुढे काही काळ टेलिव्हिजनवर काम केले आणि पुन्हा चित्रपटांकडे मोर्चा वळवला. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुमोना चक्रवर्ती. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलच्या बायकोच्या भूमिकेत दिसणाऱ्या सुमोनाने खूपच कमी काळात तिचे या क्षेत्रात स्थान पक्के केले. सुमोना गुरुवारी (२४ जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही महत्वाच्या खास गोष्टी…

सुमोनाचा (Sumona Chakravarti ) जन्म 20 जून, 1986 रोजी लखनऊमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. लहानपणापासूनच सुमोनाने या ग्लॅमर क्षेत्रात बालकलाकार म्हणून प्रवेश केला. 1999साली आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या गाजलेल्या ‘मन’ सिनेमांत सुमोनाने भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला.

त्यानंतर तिने नव्या जोमाने एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेत ‘निवेदिता देब’ ही भूमिका निभावत टेलिव्हिजन जगात पाऊल टाकले. या मालिकेत प्राची देसाई आणि राम कपूर यांनी मुख्य भूमिका निभावली होती. या मालिकेनंतर सुमोनाने ‘डिटेक्टिव डॉल’, ‘सुन यार चिल मार’, ‘कस्तूरी’ आदी अनेक मालिकेत भूमिका साकारल्या. मात्र, तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती एकता कपूरच्या ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेतून. साक्षी तंवर आणि राम कपूर यांची भूमिका असलेल्या या शोमध्ये सुमोनाने ‘नताशा’ ही राम कपूरच्या बहिणीची भूमिका निभावली होती. सुमोनाची ही भूमिका खूपच गाजली आणि ती प्रसिद्ध झाली. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना दिसली.

मालिका करत असतानाच सुमोनाने काही चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या. यात ती २०१२ मध्ये आलेल्या अनुराग बासू दिग्दर्शित रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा अभिनित ‘बर्फी’ या सिनेमात श्रुती या इलियाना डिक्रुझच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर सुमोना साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित आणि सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस अभिनित ‘किक’ सिनेमात विधी नावाची भूमिका साकारली होती.

यानंतर सुमोना दिसली ती ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’ या शोमध्ये कपिल शर्माच्या बायकोच्या मंजू शर्माच्या भूमिकेत. या नव्या रोलमुळे तिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये अधिकच भर पडली. आताच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना सरला गुलाटी ही भूमिका निभावताना दिसत आहे. सध्या या शोचे चालू असणारे पर्व संपले असून, लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो सुमोनाच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. या शो ने तिला एक नवीन ओळख तर दिली, सोबतच विनोदाच्या क्षेत्रातही ती काम करू शकते हा आत्मविश्वास देखील दिला. सुमोना ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा’ या शो चा महत्वाचा भाग असून, मागच्या अनेक वर्षांपासून सुमोना या टीमसोबत काम करताना आपल्याला दिसत आहे.

एका मुलाखतीवेळी सुमोनाला विचारले गेले की, कपिल शर्मा अनेकदा तिच्यावर तिच्या शरीरावर विनोद करताना दिसतो. तिचे ओठ बदकासारखे आहेत, असेही नेहमी बोलतो यावेळी तुला कसे वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना सुमोना म्हणाली, “सुरुवातीच्या काळात मला याचे खूप वाईट वाटायचे. मी एकटी असताना यावर बऱ्याचदा विचार देखील करायची. माझ्यावर होणाऱ्या अशा प्रकारच्या विनोदांमुळे माझा आत्मसन्मान दुखावला जात होता. यावर उपाय म्हणून मी कपिल शर्माला मनातल्या मनात खूप शिव्या घालून माझा राग व्यक्त करायचे. असे केल्यामुळे माझी आतल्या आत होत असलेली घुसमट कमी व्हायची. मात्र, नंतर नंतर मला याची सवय झाली. कदाचित मला त्याचेच पैसे मिळत होते. म्हणून मी कधीच तक्रार केली नाही. आता याला बॉडी शेमिंग म्हणायचे का? या बाबत आजही माझा गोंधळ आहे. पण आता मी याबाबत विचार करणे थांबवले आहे.”

मागच्या काही वर्षांपूर्वी सुमोनाचे धूम्रपान करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोमुळे अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका करत तिला ट्रॉल केले होते. काहींनी तर थेट तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर देखील प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व घटनेमुळे सुमोना पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात हादरली होती. तिच्या कृतीची या व्यसनाची शिक्षा तिच्या आई- वडिलांना मिळतेय ही भावना तिच्या मनात निर्माण झाली. परिणामी तिने तिच्या वाढदिवशी सिगरेट कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे एवढे सोपे नव्हते. यासाठी तिने स्वतःवर प्रचंड मोठा ताबा ठेवला आणि केलेल्या निश्चयात यशस्वी झाली.

सुमोनाला अँड्रोमेट्रिओसिस नावाचा एक आजार आहे. सध्या सुमोना या आजाराच्या चौथ्या स्टेजवर असून, तिने स्वतः याबद्दल माहिती दिली होती. हा आजार महिलांना होत असून हा आजार गर्भाशयाशी संबंधित असल्याने यात गर्भधारणेमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. सुमोना जरी या आजाराने ग्रस्त असली, तरीही निरोगी जीवनशैलीमुळे ती या आजाराशी लढत आहे. चांगले जेवण, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे.

सुमोनाच्या उत्पन्नाबद्दल सांगायचे झाले, तर एका वृत्तानुसार, सुमोना ‘द कपिल शर्मा शो’ च्या एका भागासाठी सुमारे ८/९ लाख रुपये घेते. सुमोना जवळपास ३० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. सुमोना अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती देखील करते. यातूनही ती बक्कळ पैसे कमावते. यासोबतच तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत. ज्यात फरारी आणि मर्सिडीज यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा- 
मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “नशिब काढलंस…”
निया शर्माच्या हाॅट लूकने चाहत्यांना भुरळ! फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा