सिनेसृष्टीमध्ये एका पेक्षा एक प्रतिभावान अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. यातील अनेक कलाकारांना लहानपणापासूनच रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. काहींचा हा कौटुंबिक वारसा असल्याने ते अभिनयात कार्यरत आहेत, तर काही मेहनतीने आणि जिद्दीने इथे नाव कमवत आहेत. या सर्वांमध्ये आपल्यातील कलेच्या जोरावर नव्वदच्या दशकापासून सिनेसृष्टीमध्ये अधिराज्य गाजवणारा, आणि खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अर्थातच अक्षय कुमार. गुरुवारी (९ सप्टेंबर) अक्षय त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
अभिनेता अक्षय कुमारचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे ९ सप्टेंबर, १९६७ रोजी झाला होता. काही काळ त्याने मुंबईमधून शिक्षण घेतले होते. अक्षयला मार्शलआर्ट्सची विद्या अवगत आहे. बँकॉकमध्ये ही विद्या शिकत त्याने तिथेच कुकची नोकरी देखील केली. मार्शलआर्ट्सह तो टायकोंडोमध्येही पारंगत आहे. तिथे त्याने ब्लॅक बेल्ट जिंकला आहे. आपल्यामधील मेहनत आणि जिद्दीने त्याने आपल्या आयुष्यात एवढे यशाचे शिखर गाठले आहे. त्याचा मुलगा देखील उत्तम कराटे खेळतो.
एक कुक कसा झाला स्टार
अक्षय स्वतः मार्शल आर्ट्समध्ये पारंगत होता. तो काही लहान मुलांना देखील ही विद्या शिकवायचा. त्यावेळी तेथील एका लहान मुलाने त्याला मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. त्या लहान मुलाचे ऐकून अक्षयने फोटोशूट केले. त्यांनतर त्याने मॉडेलिंगमध्ये भाग घेतला. सर्वात पहिल्या दोन तासाच्या मॉडेलिंगचे त्याला ५ हजार रुपये मिळाले. अक्षयला वाटले हे, तर खूपच छान आहे. कमी मेहनत करूनही जास्त पैसे मिळत आहेत. त्यानंतर त्याने पुढे अभिनयामध्येच करिअर करायचे ठरवले.
साल १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला महेश भट्ट यांचा ‘आज’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल टाकले. आपल्या मेहनतीने त्याने साल १९९१मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. त्याचा चित्रपटातील सुरुवातीचा प्रवास चांगला नव्हता. त्याचे बरेचसे चित्रपट रुपेरी पडद्यावर फार चालत नव्हते. त्यानंतर साल १९९४ पासून सिनेसृष्टीतील त्याची गाडी थोडी रुळावर आली. त्याने ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘मोहरा’ अशा हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाने अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट दिले. यामध्ये ‘अजनबी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
अक्षयने आतापर्यंत आपल्या रोमँटिक, ऍक्शन आणि कॉमेडीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशात त्याचा ‘फिर हेराफेरी’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये परेश रावल आणि सुनील शेट्टीसह त्याचा अभिनय विनोदाला चार चाँद लावणारा ठरला. साल २००६मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु आजही हा चित्रपट पाहिला की, प्रेक्षक पोट दुखेपर्यंत हसतात.
त्याने ‘एयरलिफ्ट’, ‘रुस्तम’, ‘केसरी’, ‘बेबी’, ‘पॅडमॅन’ ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’ आणि ‘हाऊसफुल’ ‘बेलबॉटम’ असे अनेक देशप्रेमावर आधारित आणि सामाजिक संदेश देणारे यशस्वी चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी छाप पाडली. अक्षयचे मधल्या काळात अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. परंतु त्याने ट्विंकल खन्ना बरोबरच विवाह केला. साल २००१ मध्ये या दोघांनी लग्न केले असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलाचे नाव आरव आहे, तर मुलीचे नाव नितारा आहे. अक्षय लवकरच ‘रामसेतु’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘अतरंगी या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जाणून घ्या या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिका, शो ‘टीआरपी’च्या यादीत कोणत्या स्थानावर आहे
-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे