बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांवर पडली आहे भाईजानची ‘वक्रदृष्टी’


भाईजान सलमान खान आज (२७ डिसेंबर) त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानला यारो का यार म्हणून म्हटले जाते. त्याच्या मैत्रीची अनेक किस्से बॉलिवूडमध्ये आणि कलाकारांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात. सलमान त्याची मैत्री निभावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्याबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, तो आनंदाच्या प्रसंगी नसला तरी दुःखाच्या प्रसंगी नेहमीच सर्वांसाठी उभा असतो. मात्र हाच सलमान जेव्हा एखाद्याला त्याच्या शत्रूच्या यादीत स्थान देतो तेव्हा काय घडते हे तर सर्वांनाच माहित आहे. सलाम आज बॉलिवूडमध्ये अशा ठिकाणी आहे जिथे तो एखाद्याचे करिअर बनवू देखील शकतो आणि बिघडवू देखील शकतो.

सलमान खानला आपण बॉलिवूडचा शनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तो ज्यांच्या पाठीशी उभा राहतो ते तर त्याची देवासमान पुजाच करतात. परंतु एखाद्यावर त्याची वक्रदृष्टी पडली की मग सलमान उभ्या आयुष्यात त्या व्यक्तीचं तोंड पाहत नाही. वरून त्या व्यक्तीच्या करियरचे बारा वाजतात ते वेगळेच! कारण सलमानचा दिलदारपणा जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा राग देखील बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या याच रागामुळे अनेक सेलिब्रिटींशी त्याचं वाजलं आहे. या दबंग सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या पाच शत्रूसमान असणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

विवेक ओबेरॉय

या यादीतील पहिलंच नाव विवेक ओबेरॉयचं आहे. नाव वाचूनच आपल्या लक्षात आलंच असेल का ते…पण असो ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्यात जवळीक वाढू लागली होती. ही खबर आधीच प्रेमभंग झालेल्या सलमानला समजली. मग जे व्हायचं तेच झालं. विवेक ओबेरॉय याने एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की, मध्यरात्री सलमानने फोनवर खूप शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीदेखील दिली. या घटनेनंतर विवेक आणि सलमान यांच्यात जणू युद्धच सुरू झालं. या घटनेनंतर विवेकचं बऱ्यापैकी सुरू असलेलं करियर अचानक अडखळलं. त्याच्या करियरच्या या अवस्थेसाठी कुठे ना कुठे सलमानच जबाबदार आहे असं बहुतेकांचं म्हणणं आहे.

अर्जुन कपूर

सलमान खान आणि अर्जुन कपूर हे एकमेकांकडे पाहतही नाहीत. सलमानचं त्याच्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम हे सर्वश्रुत आहे. जेव्हा सलमानची वहिनी मलाइका अरोराशी अर्जुनचे नाव जोडलं गेलं होतं तेव्हापासून याची सुरुवात झाली. जेव्हा सलमानच्या सख्या भावासोबत जर असं घडत असेल तर तो शांत कसा बसेल? आता अर्जुन आणि मलायका यांनी आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलं आहे. यामुळेच सलमानच्या कोणत्याही चित्रपटात किंवा त्याच्या कोणत्याही कार्यक्रमात अर्जुन कपूरला येण्यास बंदी घातली गेली आहे.

अरजीत सिंह

प्रसिद्ध गायक अरजीत सिंगही सलमान खानच्या शत्रूंच्या यादीत काही वर्षांपूर्वीच सहभागी झाला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सलमानने अरिजीतला विचारलं होतं की तू झोपला होतास का? अरजीतने प्रत्युत्तर देऊन उत्तर दिले की आपल्यामुळेच मला झोप लागली. अरजीतची उत्तर देण्याची पद्धत सलमानला पसंत पडली नाही आणि त्याने अरिजीतचे गाणे आपल्या ‘सुल्तान’ चित्रपटातून काढून टाकलं. अरिजीतनेही अनेक वेळा माफी मागितली खरी पण सलमानचं मन काही उमललं नाही.

Photo Courtesy : Instagram/arijitsingh

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने प्रथम सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ साइन केला आणि नंतर ऐन वेळी तो करण्यास नकार दिला. यावर सलमान खूप चिडला होता. बऱ्याचदा त्याने प्रियंकाला या गोष्टीवरून सुनावलं. त्याचवेळी, प्रियांकाने भारत सिनेमाला एक नाच गाणं असलेला चित्रपट म्हणून संबोधलं होतं. यावरून सलमान आणि प्रियंकामधील संबंध आणखीनच ताणले गेले.

रणबीर कपूर

तसं पाहायला गेलं तर सलमान आणि रणबीरच्या शत्रूतेचं मुख्य कारण कतरिना कैफ आहे. पण रणबीरने बॉलिवूडमध्ये लॉन्च होण्यापूर्वीपासूनच या भांडणाचा पाया रचला गेला होता. माध्यमांनूसार सावरीया या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी रणबीर आणि सलमान यांच्यात एका पार्टीत भांडण झाले होतं. एकदा या विषयावर बोलताना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर म्हणाले होते की एका माथेफिरू स्टारमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री अस्वस्थ आहे. या नंतर हे प्रकरण निवळलं आणि सलमानने रणबीरच्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात एक कॅमिओ केला, पण कतरिना आणि रणबीरच्या वाढत्या संबंधांमुळे सलमानला हैराण झाला होता. यात विचार करण्यासारखी बाब म्हणजे सलमान-कतरिना अजूनही चांगले मित्र आहेत पण सलमान आणि रणबीर मात्र एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

Photo Courtesy : Instagram/neetu54

हेही वाचा :

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव


Latest Post

error: Content is protected !!