Tuesday, June 18, 2024

हे माहितीये का? इतिहास रचणाऱ्या ‘या’ १७ व्यक्तींचा जन्म पाकिस्तानचा, पण त्यांनी भारतालाच मानले आपले घर

ऑगस्ट १४ आणि १५, हे दोन असे दिवस आहेत, जे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले खरे, पण त्यासाठी एकात्मतेची किंमत मोजावी लागली. लाखो लोकांना सुरक्षेसाठी सीमापार पलायन करावे लागले. सांप्रदायिक तणाव आणि हिंसेमुळे दोन्ही देशाच्या लोकांनी सीमेपार पलायन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तींबद्दल, जे जन्मले ब्रिटिश भारतात म्हणजेच आताच्या पाकिस्तानात, पण त्यांनी भारतालाच आपली मातृभूमी मानले.

कोण आहेत ते प्रसिद्ध १७ व्यक्ती?
लालकृष्ण आडवाणी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर, १९२७ कराची (आता पाकिस्तानात) येथे झाला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून केली. त्यांनी २००२-२००४ या कालावधीत भारताचे सातवे उपपंतप्रधानांचे पद भूषविले. साल २०१५ मध्ये त्यांना देशाचा द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान, ‘पद्मविभूषण’ने गौरवण्यात आले.

सुनील दत्त
सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म ६ जून, १९२९ रोजी झेलम, पंजाबचा उत्तरी समभाग, पाकिस्तान येथे झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत सुनील दत्त जसे प्रसिद्ध झाले, तसेच त्यांचा राजकीय कार्यकाळही निष्कलंक राहिला. २५ मे, २००५ रोजी राहत्या घरी वांद्रे, मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

राम जेठमलानी
राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर, १९२३ रोजी पाकिस्तानच्या शिखरपूर, सिंध प्रांतात झाला होता. ते वयाच्या १८व्या वर्षी अधिवक्ता झाले आणि भारतातील गुन्हेगारी खटल्यांचे सर्वोत्कृष्ट अधिवक्ता म्हणून ओळखले जात होते. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, तसेच हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या मारेकर्‍यांचा बचाव करण्यासह भारताच्या इतिहासातील काही सर्वात उच्च-वर्गीय गुन्हेगारी खटल्यांमध्ये युक्तिवाद करत नाव कमावले. यामध्ये शेअर बाजार घोटाळे, जेसिका लाल हत्या खटल्यातील मनू शर्मा, स्पेक्टर्म घोटाळ्यातील द्रमुक नेते कनिमोझी आणि दिवंगत अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीचा दावा याचा समावेश आहे. त्यांनी राजकीय कारकीर्दीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ६व्या व ७व्या लोकसभेत मुंबईच्या खासदारकीचे पद भूषवलेले. वयाच्या ९५व्या वर्षी ८ सप्टेंबर, २०१९ रोजी त्यांचे निधन झाले होते.

गुलजार
प्रसिद्ध गीतकार गुलजार साब यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. संपुरन सिंग कालरा हे गुलजार या नावाने ओळखले जातात. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९३४ रोजी दीना, पाकिस्तान येथे झाला होता. सर्व वयोगटातील लोकांमध्ये सुप्रसिद्ध लेखक आणि कवी यांच्या यादीत गुलजार हे एक अग्रणी नाव आहे. त्यांच्या अप्रतिम लेखणी आणि अभिव्यक्ती कौशल्याने त्यांना अतुलनीय आणि लोकप्रियतेच्या शिखरावर स्थानापन्न केले. त्यांनी ‘श्रीमान सत्यवादी’ चित्रपटाने गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

शेखर कपूर
भारतीय चित्रपट निर्माता निर्देशक शेखर कपूर यांचा जन्म ६ डिसेंबर, १९४५ रोजी लाहोर पाकिस्तान येथे झाला होता. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘मासूम’ आणि ‘बॅन्डेट क्वीन’ या बहुचर्चित चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी ‘जान हाजीर’ आणि ‘टूटे खिलौने’ या चित्रपटांमध्ये अभिनयाचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांना ‘एलिझाबेथ’ या चित्रपटासाठी अकादमी पुरस्काराने सम्मानित केले गेले.

मिल्खा सिंग
प्रख्यात धावपटू आणि सुवर्णपदक विजेते मिल्खा सिंग यांना परिचयाची गरज नाही. त्यांनी भारताला खेळाच्या नकाशावर जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा (पाकिस्तान) येथे २० नोव्हेंबर, १९२९ रोजी झाला. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चार वेळा सुवर्ण पदक व एक वेळा राष्ट्रकूल स्पर्धा, १९५८ मध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले होते. १९५६ व १९६४ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९५९मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.

दिलीप कुमार
प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांचा जन्म ११ डिसेंबर, १९२२ रोजी पेशावर, पाकिस्तान येथे झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. ते ‘ट्रॅजेडी किंग’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘दाग’, ‘शहीद’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘मुघल-ए-आझम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रशंसनीय काम केले. त्यांनी ७ जुलै २०२१, रोजी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.

इंदर कुमार गुजराल
दिनांक ४ डिसेंबर, १९१९ रोजी भारताच्या एका स्वातंत्र्यसंग्राम सेनानी इंदर कुमार गुजराल याचा जन्म झेलम, पाकिस्तान येथे झाला होता. वयाच्या ११व्या वर्षी बाल आंदोलन आयोजित करण्यामुळे त्यांनी पोलिसांचा मार सहन केला होता. स्वतंत्र भारतात सक्रिय राजनैतिक वाटचालीत त्यांनी बारावे पंतप्रधानपद भूषवले होते. त्यांचे निधन ३० नोव्हेंबर, २०१२ रोजी झाले होते.

मदन लाल खुराना
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल श्री मदनलाल खुराना, यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९३६ रोजी फैसलाबाद, पाकिस्तान येथे झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचे २७ ऑक्टोबर, २०१८ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते.

खुशवंत सिंग
सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांचा जन्म २ फेब्रुवारी, १९१५ रोजी हाडाली, पाकिस्तान येथे झाला होता. त्यांनी लिहिलेली ‘ट्रेन टू पाकिस्तान’ सर्वात जास्त चर्चित आणि प्रसिद्ध कादंबरी आहे. ते उत्कृष्ट इतिहासकार व कादंबरीकार होते, जे राजकीय समालोचक होते. त्यांचे निधन २० मार्च, २०१४ रोजी दिल्ली येथे झाले होते.

भगत सिंग
निर्भीड, शूर आणि पराक्रमी स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९०७ रोजी बांगा, पाकिस्तान येथे एका देशभक्त कुटुंबात झाला होता. भारताचे महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक असलेल्या भगत सिंगांनी इंग्रज साम्राज्याला हादरवून सोडले. त्यांच्या कामामुळे त्यावेळच्या तरुण क्रांतिकारींना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रोत्साहन दिले. क्रूर इंग्रज साम्राज्याने घाबरून या शूरवीराला २३ मार्च, १९३१ रोजी त्यांच्या दोन पराक्रमी सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी दिली.

राजेंद्र कुमार
दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार यांचा जन्म २० जुलै, १९२९ रोजी सियालकोट, पाकिस्तान येथे झाला होता. विभाजनानंतर अनेक यातना सहन करत त्यांच्या कुटुंबाने मुंबई गाठले होते. पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत येत त्यांच्या अस्सल अभिनयाने  ‘जुबिली कुमार’ अशी ओळख मिळवली. त्यांचे निधन १२ जुलै, १९९९ रोजी मुंबई येथे झाले होते.

पृथ्वीराज कपूर
भारतीय चित्रपट इतिहासातील महत्त्वाचे नाव असलेल्या पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर, १९०६ रोजी फैसलाबाद, पाकिस्तान येथे झाला होता. फाळणीनंतर कपूर कुटुंबाने अथक प्रयत्न आणि कष्ट सहन करून भारतात स्थलांतर केले. कालांतराने कपूर कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान आणि ओळख बनवली. त्यांचे निधन २९ मे, १९७२ रोजी मुंबई येथे झाले होते.

राज कपूर
राज कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे मोठे सुपूत्र होते. त्यांचा जन्म १४ डिसेंबर, १९२४ रोजी पेशावर, पाकिस्तान येथे झाला होता. त्यांना ‘शोमॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी दिशा दिली. त्यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेम, कुटुंब, सहिष्णुता आणि देशप्रेमाची भावना प्रेक्षकांमध्ये रुजवली. त्यांचे निधन २ जून, १९८८ रोजी दिल्ली येथे झाले होते.

विनोद खन्ना
दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर, १९४६ रोजी पेशावर, पाकिस्तान येथे एका व्यापारी कुटुंबात झाला होता. ते आपल्या काळातील असे अभिनेते होते, ज्यांना ‘अमर अकबर ऍंथनी’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कुर्बानी’ यांसारख्या चित्रपटातून ओळख मिळाली झाले. त्यांचे निधन २७ एप्रिल, २०१७ रोजी मुंबई येथे झाले होते.

प्रेम चोप्रा
अभिनेते प्रेम चोप्रा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात क्रूर खलनायक म्हणून ओळखले जाते. ते त्यांच्या ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ या प्रसिद्ध संवादासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९३५ लाहोर, पाकिस्तान येथे झाला होता.

मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९३२ गाह, पाकिस्तान येथे झाला होता. ते भारताचे तेरावे पंतप्रधान होते. १९९९ साली देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच, त्यांना ‘इंदिरा गांधी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

हे देखील वाचा