Saturday, November 23, 2024
Home मराठी “एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी…” बिग बॉस फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

“एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी…” बिग बॉस फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

सध्या मराठी मनोरंजनविश्वात फक्त एका आणि एकाच सिनेमाची तुफान चर्चा होत आहे, आणि तो सिनेमा म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाची सुरुवातीपासूनच मोठी चर्चा होती. आता हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अंकुश चौधरी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याला अगदी शाहीर साबळे यांच्यासारखंच लूक देण्यात आला आहे. हा सिनेमा अनेक कारणांमुळे कमालीचा चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. सिनेमात अतिशय नावाजलेल्या आणि प्रतिभावान कलाकारांची फौज दिसत आहे. मात्र याच सिनेमात काम करण्याची एका कलाकाराची संधी हुकली आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याचे त्याला किती दुःख आहे, हे सांगितले आहे.

बिग बॉस फेम किरण माने यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. विविध मालिकांमधून काम करत ते प्रेक्षकांसमोर आले. मात्र त्यांना बिग बॉसने खूप मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांना केदार शिंदे यांनी शाहीर साबळे या सिनेमासाठी देखील विचारणा केली होती, मात्र किरण यांना या सिनेमाला नकार द्यावा लागला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““…एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबाॅस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच… आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्‍यापुढेच उभा रहाणार आहे… हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण… याआधी बिगबाॅसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता.

‘मुलगी झाली हो’ चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, “किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो.” मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं… मायणीत…

…चौथी-पाचवीत होतो. वडिलांनी टेपरेकाॅर्डर आणला. सोबत पाचसहा कॅसेटस् होत्या. त्यातल्या काही होत्या शाहीर साबळेंच्या ! ‘बापाचा बाप’, ‘आबुरावाचं लगीन’ अशी लोकनाट्यं त्यात होती. ती ऐकून याड लागलं. अक्षरश: तोंडपाठ केली ती. चारपाच मित्र जमवले.. त्यांनाही हा नाद लावला. मग काय, दर रविवारी आमच्या घरापुढच्या व्हरांड्याचं स्टेज बनवायचं आणि शाहिरांची लोकनाट्य सादर करायची ! आयुष्यातलं पहिलं ‘स्टेज’ , पहिल्या नाटकातला पहिला अभिनय, पहिला प्रेक्षक, अभिनयाचं पहिलंवहिलं कौतुक…हे सगळं सगळं अनुभवायला शाहीरांची ती लोकनाट्यं कारणीभूत ठरली.

अकरावीला काॅलेजसाठी सातार्‍यात आल्यावर जेव्हा-जेव्हा शाहीरांचा कार्यक्रम सातारला असेल तेव्हा कार्यक्रमाच्या आधीच ते जिथं मुक्कामाला असत तिथं पोहोचायचो. तिथं जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घ्यायचो. लै भारी वाटायचं. मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय !

…’महाराष्ट्र शाहीर’च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बाॅस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली.

पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !!!”

मात्र आता हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अतिशय उच्च स्थानी असलेल्या शाहीर साबळे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सर्वच खूप उत्साहित आहे. दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे अभिनयात पदार्पण करत आहे. तिच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठमोठ्या लोकांवर विनोद करणाऱ्या कपिल शर्माला मुलीची ‘ती’ मागणी ऐकून फुटला होता घाम, वाचा तो किस्सा
वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा