अभिनय क्षेत्रातील कास्टिंग काउचसारख्या गंभीर समस्येने या झगमगाटी दुनियेचं भीषण वास्तव लोकांसमोर आणलं होतं. अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल उघड भाष्य केले होते. या संपुर्ण प्रकारामुळे अभिनय क्षेत्रावर अनेकांनी टीकेचा भडीमार केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री आणि टेलिव्हिजन कलाकार दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) याविषयी मोठा खुलासा केला आहे.
मध्यंतरी संपूर्ण सिनेसृष्टीत ‘मी टू’च्या वादळाने सर्वत्र खळबळ माजवली होती. अनेक महिला कलाकारांनी काम मिळवताना कशाप्रकारे त्यांना निर्मात्यांकडून अश्लील मागण्या केल्या जातात, याचा खुलासा केला होता. यावेळी पहिल्यांदाच टीव्ही कलाकार दिव्यांका त्रिपाठीने मोठा खुलासा केला आहे. दिव्यांकाने याबद्दल बोलताना सांगितले की, ती या क्षेत्रात नवीन असताना, कामासाठी संघर्ष करत असताना तिलाही अशाच प्रकारची मागणी करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर असं न केल्यास तिच्या करिअरला धोका पोहोचेल, तिचं करिअर उध्वस्त होईल, अशीही धमकी देण्यात आल्याचा मोठा खुलासा तिने केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना दिव्यांकाने सांगितले की, “अभिनय क्षेत्रात नवख्या असलेल्या कलाकारांना या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असा चुकीचा संदेशही दिला जातो. मात्र मी या सर्व गोष्टी आधीपासून जाणत होते. त्यामुळेच मी अशा अफवांना बळी पडले नाही.”
या संपुर्ण प्रकरणाबद्दल बोलताना तिने सांगितले की, “एक मालिका संपल्यानंतर माझ्याकडे कसलेही काम नव्हते, काम मिळवण्यासाठी संघर्ष चालू होता. माझ्याकडे लाइटबील, हप्ते भरायलाही पैसे शिल्लक नव्हते. त्यावेळी मला मोठं काम पाहिजे असेल, तर दिग्दर्शकासोबत वेळ घालवावा लागेल अशी ऑफर मिळाली होती.”
याबद्दल पुढे बोलताना तिने सांगितले की, “तु खूप समजूतदार आहेस, या क्षेत्रात हे सर्व करावे लागते, असंही मला त्यावेळी सांगण्यात आलं.” हा प्रकार ‘मी टू’ चळवळीच्या आधीचा असल्याचा खुलासाही दिव्यांकाने यावेळी केला. तिच्या या खुलाशाने अभिनय क्षेत्रातील असुरक्षितता पून्हा एकदा समोर आली आहे.
हेही वाचा :










