Monday, July 1, 2024

‘आता मी थकली आहे’, म्हणत टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माने डिलीट केल्या तिच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट

‘ससुराल सिमर का’ आणि ‘ब्रह्मराक्षस २’ या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री निक्की शर्मा सध्या तिच्या वैयक्तिक कारणांमुळे मीडियामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. निक्कीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या सर्वच पोस्ट डिलीट केल्या असून, तिच्या या कृत्यामुळे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटत आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्वच पोस्ट डिलीट केल्या होत्या. मागच्या वर्षी १ जानेवारी २०२१ या दिवशी तिने सर्वच जुन्या पोस्ट डिलीट करत नवीन सुरुवात केली होती. मात्र आता निक्की शर्माची गोष्ट वेगळी आहे. निक्कीने पोस्ट डिलीट केल्यानंतर एक क्रिप्टीक मेसेज लिहिला असून, हा मेसेज सर्वांनाच काळजीत टाकणारा आहे.

निक्की शर्माने मेसेजमध्ये लिहिले आहे की, “मी खूपच प्रयत्न केला मात्र मी थकली आहे. मी आता स्वतःच्या विचारांमधून मोकळी होऊ इच्छिते.” निक्कीच्या या मेसेजनंतर ससुराल सिमर का फेम अभिनेता अभिषेक भालेरावने ट्विट केले आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले, “माझी सह अभिनेत्री असणाऱ्या निक्कीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्वच पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिने तिच्या स्टोरीवर फक्त एक मेसेज लिहिला आहे. मी तिच्याशी बोलण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहे. मी तिला मेल, मेसेज सर्वच माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून तिच्याशी संपर्क होत नाही. मी याबद्दल खूप विचार केला की, मला या गोष्टीला पुढे वाढवले पाहिजे की नाही.”

मात्र अभिषेकने हे ट्विट केल्यानंतर काही काळाने ते लगेच डिलीट केले. अनेकांनी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ती कोणालाच उत्तर देत नाही. मात्र हे नक्की की, तिचा मूड चांगला नसून ती नैराश्यात आहे. तर तिच्या एका सह कलाकाराने सांगितले की, निक्की एकदम ठीक असून, ती स्वतः कडे लक्ष देत आहे.

निक्की शर्माचे अधिकृत इन्स्टा पेज व्हेरिफाइड असून, तिला ९०.४ K फॉलोवर्स असून, ती स्वतः २४२ लोकांना फॉलो करते. पण तिने तिच्या पोस्ट, स्टोरी, फोटो सर्वच डिलीट केले आहे. ससुराल सिमर का आणि ब्रह्मराक्षस या दोन्ही मालिकांशिवाय तिने ‘माइंड द मल्होत्राज’ या अमेझॉन प्राईमच्या सिरीजमध्ये तर ‘दहलीज’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा