Wednesday, July 3, 2024

कोणत्या भीतीमुळे इंदिरा गांधींनी घातली होती ‘आंधी’ सिनेमावर बंदी?

हिंदी सिनेसृष्टीत शेकडो सिनेमे रिलीझ झालेत, आणि होत आहेत. यापैकी काही सिनेमांच्या नावामुळे, वादग्रस्त दृश्यांमुळे, तसेच चुकीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्यावर बंदी आणली जाते. सत्तरच्या दशकातही असाच एक सिनेमा होता, ज्यावर बंदी आणली होती. ही बंदी कोणत्याही साध्या- सुध्या माणसाने नाही, तर खुद्द पंतप्रधानांनीच घातली होती. कोणता होता तो सिनेमा आणि असं काय होतं त्या सिनेमात जाणून घेऊया या व्हिडिओतून.

देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचं वर्ष म्हणजे १९७५. २६ जून, १९७५ रोजी सकाळच्या रामपाऱ्यात झालेली ती घोषणा आजही लोकांच्या आठवणीत आहे. ती घोषणा होती, “राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केली आहे. घाबरण्याची काही गरज नाही.” फक्त या एकाच गोष्टीसाठी १९७५ हे वर्ष ओळखलं जात नाही. आणीबाणी लागू करण्याच्या २० आठवड्यांपूर्वी आणखी एक गोष्ट घडली होती. ती गोष्ट आणीबाणी इतकी दुर्दैवी तर नक्कीच नव्हती, पण तिचा याच्याशी संबंध आहे. ती गोष्ट इतर काही नाही, तर १३ फेब्रुवारी, १९७५ रोजी रिलीझ झालेला सिनेमा होता. त्या सिनेमाचं नाव होतं ‘आंधी.’

आपल्या नावासारखंच या सिनेमानंही वादळ निर्माण केलं होतं. पण रिलीझवेळी नाही, तर आणीबाणीवेळी. ज्यावेळी लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की, सिनेमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजींची कहानी दाखवण्यात आलीये. मग काय. काँग्रेस सरकारने सिनेमावर कात्री मारत सिनेमा डब्ब्यात बंद करण्याची जीवतोड प्रयत्न केला. पण पुढं सरकारनं जे काही केलं, त्यामुळे सिनेमाने एक उदाहरण म्हणूनच आपली छाप सोडली की, जेव्हा- केव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तलवार चालवली जाईल, तेव्हा- तेव्हा ‘आंधी’सारखं वादळ आल्याशिवाय राहणार नाही.

‘आंधी’ सिनेमाच्या रिलीझवेळी जोरदार चर्चा रंगली. कुठे गुपचूप, तर कुठे सर्वांसमोर दावे केले जाऊ लागले की, गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बनला आहे. दक्षिण भारतापर्यंत पोस्टर छापण्यात आले. ज्यांवर लिहिण्यात आलं होतं की, “आपल्या पंतप्रधानांना मोठ्या पडद्यावर पाहा.” दिल्लीच्या एका वृत्तपत्रात जाहिरात छापण्यात आली. त्यावर लिहिलं होतं की, “स्वतंत्र भारताची एक महान महिला नेत्याची कहाणी.”

जोरात पसरणाऱ्या अफवांच्या भट्टीतील कोळसा आणखीच तापू लागला. अवघ्या काँग्रेस पक्षाचे कान टवकारले गेले. तशीही त्याकाळी देशातील परिस्थिती तणावात होती. सरकारला भिती होती की, हा सिनेमा त्यांची प्रतिमा आणखी खराब करू शकते. त्याचवेळी इंदिरा गांधींनाही याबद्दल समजले. त्यांनी त्यावेळी स्वत: हा सिनेमा पाहिला नव्हता. मात्र, त्यांनी त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना पाठवलं. त्या म्हणाल्या होत्या, “जावा आणि पाहा हे लोकांनी पाहण्याच्या लायकीचं आहे की नाही. त्यांचा त्याच्याशी कोणता संबंध आहे की नाही?” त्यांनी पाठवलेले अधिकारी सिनेमा पाहून परतले. त्यांना सिनेमात कुठेही वादग्रस्त गोष्टी दिसल्या नाहीत. उलट त्यांनी सिनेमाचं कौतुकच केलं. हा सर्व तपास तोपर्यंत चालला होता, जेव्हा गुलजार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचा इंदिरा गांधींशी काहीही देणं-घेणं नाही.

आता तुम्हाला समजलं असेलच की, हे सर्व सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीवरून पेटलं होतं. सिनेमात मुख्य अभिनेत्रीचं पात्र साकारत होत्या सुचित्रा सेन. सिनेमात त्यांची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा, चालणे-वागणे सर्वकाही इंदिरा गांधीं यांच्याशी मिळतं-जुळतं होतं. त्यांच्या केसांनाही अगदी त्याच पद्धतीनं पांढरे करण्यात आले होते, ज्याप्रकारे इंदिरा गांधी यांचे केस होते. इंदिरा गांधी आणि सिनेमातील मुख्य अभिनेत्रीमधील अशी समानता नाकारणं कठीण होतं.

त्यावेळी निर्मात्यांनी अशा समानतेला फक्त आणि फक्त एक योगायोग असल्याचं सांगितलं. मात्र, या वादाच्या अनेक वर्षांनंतर खुद्द गुलजार यांनी मान्य केले की, त्यांनी आपल्या सिनेमाच्या नायिकेसाठी इंदिरा गांधी यांच्याकडूनच प्रेरणा घेतली होती. फक्त प्रेरणाच घेतली होती. ते पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. गुलजार यांचा असा विश्वास होता की, त्यावेळी राजकारणात इंदिरा गांधी यांच्यासारखी दमदार महिला नेता दुसरी कुणीच नव्हती. त्यांचं एक वेगळंच वर्चस्व होतं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून गुलजार यांनी काही गोष्टी उधार घेतल्या होत्या.

खरं तर ‘आंधी’वर लावण्यात आलेली बंदी ही रिलीझवेळी घातलीच नव्हती. खरं तर सिनेमा रिलीझ झाल्यानंतर २३ किंवा २४ आठवड्यांनंतर या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. या सिनेमावर बंदी घालण्याचं मोठं कारण होतं गुजरात विधानसभा निवडणूक. खरं तरत सिनेमात असे काही सीन होते, जिथे सुचित्रा सेन यांच्या पात्राला सिगारेट ओढताना आणि दारू पिताना दाखवण्यात आलं होतं. गुजरातमधल्या विरोधी पक्षाने या क्लिप्सचा वापर केला आणि या क्लिप्स अशाप्रकारे सर्वत्र पसरवल्या की, हे सर्व इंदिरा गांधीच करत आहेत. यामुळे इंदिरा गांधी यांना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यांनी या सिनेमावर बंदी घालणेच योग्य असल्याचे समजले.

ज्यावेळी सिनेमावर बंदी घातली, त्यावेळी गुलजार मॉस्कोत होते. सिनेमा मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंगसाठी जाणार होता. पण जशी बातमी आली की, भारतात सिनेमावर बंदी घातलीये, तेव्हा या सिनेमाची स्क्रीनिंगही रद्द करण्यात आली. गुलजार यांनीही भारताची वाट धरली. भारतात येताच त्यांच्या हातात सरकारकडून आदेश पडला की, जिथे सुचित्रांच्या पात्राला सिगारेट ओढताना आणि दारू पिताना दाखवण्यात आलंय, ते सीन काढून टाकावे. यासोबत असेही सांगण्यात आले की, हेही सांगावं लागेल की, सिनेमाचा कोणाशीही संबंध नाही.

सिनेमाचे निर्माते जे ओमप्रकाश यांनी संपूर्ण प्रयत्न केला की, सिनेमावरील बंदी काढण्यात यावी, पण सरकार आपल्या अटींवरून माघार घेण्यास तयारच नव्हते. त्यावेळी गुलजार यांनीही आयडिया केली आणि सुचित्रा यांच्या सिगारेट ओढणारे आणि दारू पिणारे सीन काढून टाकले. त्याजागी त्यांनी एक नवीन सीन टाकून दिला. ज्यात सुचित्रा या इंदिरा गांधी यांच्या फोटोसमोर उभ्या आहेत आणि त्यांना आपलं प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगत आहेत.

आता तुम्ही म्हणाल की, सिनेमावर तर बंदी घातली आहे, पण आम्ही तर सिनेमा पाहिला आहे. इतकंच नाही, तर युट्यूबवर ‘आंधी’ सर्च केल्यानंतर संपूर्ण सिनेमा येतो. हे शक्य झालं कारण नंतर सिनेमावरील सर्व बंदी मागे घेण्यात आली. १९७७ साली आणीबाणी काढण्यात आली होती. केंद्रात जनता दलाचे सकरार आले होते. या सरकारने ‘आंधी’ सिनेमावरील सर्व बंदी हटवली होती. फक्त बॅनच काढला नाही, तर सिनेमाला राष्ट्रीय टीव्हीवरही प्रसारित करण्यात आले.

अशाप्रकारे इंदिरा गांधी यांनी सिनेमावर बंदी घातली होती. या सिनेमातील ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे बिना जिंदगी से कोई’, ‘तुम आ गये हो’ ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. तसेच, सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कुमार यांना ‘बेस्ट ऍक्टर’चा पुरस्कार मिळाला होता, तर गुलजार यांना ‘बेस्ट फिल्म’ क्रिटिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
पालथ्या घड्यावर पाणी! जबरदस्त स्टारकास्ट असूनही सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ सिनेमे
आमिरने जुहीसोबत केले होते किळसवाणे कृत्य, मग तिनेही ७ वर्षे पाहिलं नव्हतं त्याचं तोंड
सैफ अली खानची लेक असूनही साराने का पसरले होते रोहित शेट्टीपुढे हात? थेट ऑफिसमध्ये घुसत…

हे देखील वाचा