Friday, March 29, 2024

सैफ अली खानची लेक असूनही साराने का पसरले होते रोहित शेट्टीपुढे हात? थेट ऑफिसमध्ये घुसत…

आपण पाहतो की, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे कुटुंबातील व्यक्तीच इंडस्ट्रीत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना इंडस्ट्रीत लाँच करणं चुटकी वाजवल्यासारखंच. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरून वाद झाल्याचं आपण पाहिलंच आहे. बाहेरच्यांना कलाकारांना इंडस्ट्रीत येऊ द्यायचं नाही, अन् स्वत:च्याच मुलांना सिनेमात काम द्यायचं, असा आरोप बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांवर होतो, पण आधीच स्टार असलेल्या एखाद्या कलाकाराची मुलगी दिग्दर्शकाकडे जाऊन हात जोडून काम मागत असेल, तर? होय बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आई- वडिलांच्या प्रसिद्धीचा फायदा न घेता स्वत: दिग्दर्शकाकडे जाऊन हात जोडून- रडून काम मागितलंय आणि त्या अभिनेत्रीला पाहून खुद्द दिग्दर्शकालाही अश्रू अनावर झाले होते, तर ती अभिनेत्री म्हणजे सारा अली खान आणि दिग्दर्शक आहे रोहित शेट्टी, पण पुढे यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. आज आपण हेच जाणून घेणार आहोत, चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया.

रोहित शेट्टी म्हणजे जणू बॉलिवूडमधल्या ऍक्शन सिनेमांचा किंगच. हे त्याच्या सिनेमातील हिरो मोठ- मोठ्या गुड्यांची धुलाई काय करतो, जबरदस्त डायलॉग. वगैरे वगैरे या सर्व गोष्टींमुळे त्याचा सिनेमा प्रेक्षकांनाही आवडतो. २००३ साली जमीन सिनेमापासून रोहित शेट्टीनं दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. त्याचा पहिलाच सिनेमा फार काही चालला नाही, पण नंतर ३ वर्षे वाट पाहिल्यानंतर २००६ साली त्याचा ‘गोलमाल- फन अनलिमिटेड’ हा सिनेमा आला. अजय देवगण, अर्शद वारसी, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. यानंतर रोहितच्या गोलमालची सीरिज चांगलीच गाजली. पुढं त्यानं ‘सिंघम’, ‘बोल बच्चन’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘दिलवाले’ यांसारखे हिट सिनेमेही बनवले. आता तो त्याच्या करिअरमधला १३ वा सिनेमा बनवत होता. सिनेमाचं नाव होतं ‘सिंबा.’

सिंबा सिनेमात मुख्य भूमिकेत होता. रणवीर सिंग. अभिनेत्री शोधण्याचं काम सुरू असावं. तेव्हाच सारा अली खानचा रोहितला एक नाही, तर ५-६ मेसेज आले की, सर मला तुमच्यासोबत काम करायचंय, तेव्हा रोहितने तिला रिप्लाय करत सांगितलं ऑफिसमध्ये ये म्हणून. त्यावेळी रोहितला वाटलं की, सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे, म्हणल्यावर ४-५ बॉडीगार्ड असतील, ३-४ मॅनेजर असतील, पण ती जेव्हा आली, तर रोहितच्या मॅनेजरने त्याला सारा आल्याचं सांगितलं. रोहित म्हणाला, कोणासोबत आलीये. ती म्हणाली, “एकटीचे.” हे ऐकून रोहितपण हँग झाला.

आता ‘द कपिल शर्मा शो’ तर सर्वांनाच माहितीये. कलाकार आपल्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये हजेरी लावत असतात. असंच एकदा रोहित शेट्टी अन् सारा अली खानही त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळी खुद्द रोहित शेट्टीनेच खुलासा केला होता की, सारा अली खानने त्याच्यासमोर खरोखर हात जोडून काम मागितलं होतं.

तो म्हणाला होता की, “आता ही स्टार झालीये म्हणून सांगू शकतो, पण ही जेव्हा ऑफिसमध्ये आली, तेव्हा तिने माझ्यासमोर हात जोडले आणि हात जोडून म्हणाली, ‘सर मला प्लीज काम द्या.’ तेही सैफ अली खानची मुलगी. अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी एकटी चालून ऑफिसमध्ये येणे आणि दिग्दर्शकासमोर बसून म्हणणे की, सर मला काम द्या प्लीज. मला अक्षरश: रडू आलं. मी पण म्हणलं, कर तू हा पिक्चर.” पुढं तो म्हणतो, “मला ना सैफचा फोन आला, ना अमृता जींचा. जे काही स्ट्रगल आहे, ते फक्त आणि फक्त साराचंच आहे.”

जवळपास ८० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा २८ डिसेंबर, २०१८ ला रिलीझ झाला. या सिनेमात सारानं मुख्य अभिनेत्री बनून काम केलं. रोहितचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. हा त्याच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा गल्ला जमवला. यानंतर सारा ‘लव्ह आज कल’, ‘कुली नंबर १’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या सिनेमात झळकली.

तर अशाप्रकारे इतक्या मोठ्या अभिनेत्याची मुलगी असूनही साराने हात जोडून काम मांगितलं आणि सिनेमात कामही केलं. साराविषयी आणखी रंजक माहिती अशी की, ‘सिंबा’ हा सिनेमा साराच्या करिअरमधील दुसरा सिनेमा होता. ७ डिसेंबर, २०१८ रोजी रिलीझ झालेल्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून सारानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग होतं फिदा, तोच मायकल जॅक्सन गायचा बप्पी दांचे गोडवे; म्हणालेला…
चाहत्यांना पोट दुखेपर्यंत हसवलं, पण काळाच्या ओघात मागे पडले ‘हे’ विनोदवीर
कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान

हे देखील वाचा