Wednesday, July 3, 2024

..आणि म्हणून निळू भाऊंनी विनम्रतेने नाकारला ‘महाराष्ट्र भूषण’

नावापुढे असलेला ‘माजी’ शब्द जिथे अनेकांसाठी प्रतिष्ठेचा मापदंड ठरतो, त्याच जगाचे प्रतिनिधी असलेले निळू फुले (Nilu Phule) यांनी एकेकाळी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार विनम्रतेने नाकारला होता. मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना जाऊन अकरा वर्षांचा काळ लोटला असली तरी निळू फुलेंचा करारी आवाज रसिकांच्या मानत कायम आहे.

भाजीपाला आणि लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. निळू फुले यांचे खरे नाव निलकांत कृष्णाजी फुले होते.  ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. निळू फुले यांचे महाराष्‍ट्राच्‍या चित्रपट, नाट्य क्षेत्रातच योगदान नाही तर सामाजिक क्षेत्रातही त्‍यांनी भरीव काम केलेले आहे. सेवादलाच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी सामाजिक कार्यात स्‍वत:ला वाहून घेतले होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्‍या विचारांचा त्‍यांच्‍यावर पगडाच नव्‍हता तर ते त्‍यांचे विचार प्रत्‍यक्ष जगत असत. (why veteran actor nilu phule rejected maharashtrabhushan award)

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी पुण्यात इंदिरा गांधींचा ताफा निळू फुलेंनी अडविला होता. त्यावेळी पोलिसांच्या मारहाणीत ते जखमी झाले होते. बहुजनांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी बहुजन महासंघाचा सक्रिय प्रचार केला होता.

‘बाई वाड्यावर या’ म्हटलं की आजही निळू फुलेंचा चेहरा समोर येतो. मात्र देशाला हादवून सोडणाऱ्या खैरलांजी हत्याकांडानंतर भैय्यालाल भोतमांगेंची भेट घेऊन मदतीचे हात देणारे निळू फुलेच होते. गमतीचा भाग म्हणजे निळू भाऊंनी कधीही ‘बाई वाड्यावर या’ असा एकही डायलॉग आपल्या कोणत्याच सिनेमात म्हटला नाही.

सिंहासन, पिंजरा, एक गांव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. सखाराम बाईंडर या विजय तेंडुलकरांच्या नाटकातील त्यांचा अभिनय एवढया जबरदस्त ताकदीचा होता की त्याला तोड नाही. पुढे बेबी, रण दोघांचे, पुढारी पाहिजे, राजकारण गेलं चुलीत, सुर्यास्त, प्रेमाची गोष्ट या निळु भाऊंच्या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सुर्यास्त या नाटकाकरीता त्यांना नाटयदर्पण अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

पडद्यावरचे ‘खलनायक’ असलेल्या निळू भाऊंनी स्टेज आर्टिस्ट, विडी कामगार, हमाल-मापाडी, साखर कामगार यांच्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला. विचारांनी पक्के लोहियावादी असलेले आणि रक्तात अभिनेता आणि अंतरंगात सामाजिक कार्यकर्ता भिनलेले निळुभाऊ अजब रसायन होते.

वर्ष २००३. राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी जेष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते निळू फुले यांची निवड निश्चित केली होती. पुरस्कार निवडसमितीचे लोक निळूभाऊंची संमती मिळवण्यासाठी त्यांना भेटले .तर निळू भाऊंनी त्यांना नम्रपणे सांगितले “माझे अभिनयाच्या क्षेत्रातील किंवा सामाजिक क्षेत्रातील काम महाराष्ट्रभूषण द्यावे इतके मोठे नाही. ”

फक्त नकार दिला नाही तर माझ्यासारख्या वृद्धाला पुरस्कार देण्यापेक्षा तो गडचिरोलीमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अभय व राणी बंग सारख्या समाजसेवकांना मिळावा असे मत व्यक्त केले. पुरस्कार व सन्मानासाठी धडपडणाऱ्या युगात पद्मश्री व महाराष्ट्र भूषण सन्मान ही नम्रपणे नाकारण्याचे धाडस पूर्वी कधी कोणी दाखवले नाही व भविष्यात दाखवेल की नाही याबद्दल शंका आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा निळूभाऊंचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार,महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी पुरस्कार मिळाले, राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला.

निळु फुले यांचे काही मराठी चित्रपट 
पिंजरा, बिनकामाचा नवरा, सिंहासन, सामना, माझा पति करोडपती, गोष्ट छोटी डोंगराऐवढी, एक होता विदुषक, गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, जैत रे जैत, कदाचित, मोसंबी नारंगी, भालु, भुजंग, माल मसाला, हळद रूसली कुंकु हसलं, बायको असावी अशी, भिंगरी, कळत नकळत, पुत्रवती, चटक चांदणी, लक्ष्मीची पाउले.

अधिक वाचा-
‘बाई वाड्यावर या…च्या पलीकडेही निळूभाऊ खुप शिल्लक आहेत…’, फुलेंच्या स्मृतीदिनानिमित्त भरत जाधवची हृदयस्पर्शी पोस्ट
– “मराठी चित्रपटसृष्टीला काही वर्षे गरज…” मधुराणी गोखलेचे ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा