Sunday, April 14, 2024

“मराठी चित्रपटसृष्टीला काही वर्षे गरज…” मधुराणी गोखलेचे ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वामध्ये सध्या केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा चांगलाच बोलबाला दिसत आहे. या सिनेमाने आधी प्रदर्शित झालेल्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना मात देत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. आठवड्याचा शेवट असो की, सुरुवात सिनेमाचे सर्वच शो हाऊसफुल जात आहेत. सिनेमाने सर्वांचीच मने जिंकली आहेत, याला कलाकार देखील अपवाद नाही. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार हा सिनेमा पाहत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाबद्दल व्यक्त होताना दिसत आहे.

नुकताच ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने पहिला. सिनेमा पाहून आल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती सतत विविध अपडेट या माध्यमातून सर्वांना देत असते. अशातच आता तिने बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहून आल्यानंतर तिचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे.

मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर “‘आई’ कडून ‘बाईपण ‘ ला ‘ भारी ‘शुभेच्छा….!!” या कॅप्शनखाली एक व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये तिने सिनेमाचे कौतुक केले आहे. मधुराणी या व्हिडिओमध्ये म्हणते, “बाईपण भारी देवा’ या भारी चित्रपटाच्या टीमचे कौतुक करायला मी हा व्हिडीओ करत आहे. मी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता, तेव्हा मी ठरवले होते की मला इतरांचे माहिती नाही, पण मी हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन पाहणार आहे. जसे मला वाटले तसे महाराष्ट्रातील, जगभरातील असंख्य मराठी बायकांना वाटले असणार, म्हणून एवढा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

केदार सर तुमचे खूप आभार. खूप सुंदर चित्रपट, फारच छान. तु्म्ही खूप चांगला चित्रपट आम्हाला दिलात. खूप उत्तम स्त्री व्यक्तीरेखा दिल्यात आणि रोहिणी ताई, वंदना मावशी, सुकन्या, शिल्पा, सुचित्रा, दीपा तुम्ही काय चाबूक काम केली आहेत. लव्ह यू. तुम्ही पुन्हा एकदा सर्व गाजवले आहे.

जिओ स्टुडिओ आणि निखिल साने यांच्या टीमचे देखील कौतुक आहे. त्यांनी हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट केला. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, चित्रपट चांगला असेल, त्याचे प्रमोशन उत्तम झाले, तो लोकापर्यंत पोहोचला गेला तर आजही मराठी माणूस एकत्रित जाऊन चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहे. अशा छान चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीला गेले काही वर्षे गरज होती. जो तुम्ही दिलात, तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. लव्ह यू”.”

दरम्यान मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेमुळे कमालीची लोकप्रिय झाली आहे. तिला या मालिकेने एक मोठी आणि वेगळी ओळख दिली असून, ती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

अधिक वाचा-
प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

हे देखील वाचा