अनेक दिग्गज, श्रेष्ठ आणि जेष्ठ कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. अशाच एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे जोहरा सेहगल. जोहरा यांनी अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. भरपूर वय होऊनही त्यांचा अभिनयाप्रती असलेला उत्साह कधीच कमी झाला नाही. वयाने जरी त्या खूप असल्या तरी मनाने त्या नेहमीच तरुण होत्या. स्वातंत्र्यपूर्वीच जोहरा सेहगल यांना आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळाली. आज जोहरा सेहगल यांची जयंती त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
जोहरा सेहगल यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ साली रामपूर रियासतच्या नवाबी घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव साहिबजादी जोहरा मुमताज उल्लाह खान बेगम होते. वयाच्या केवळ पाचव्या वर्षी ग्लूकोमा मुळे त्यांच्या एका डोळयाची नजर गेली. त्याकाळी जवळपास ३ लाख पौंड खर्च करून लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार केले गेले. त्यानंतर त्यांना पुन्हा नजर आली.
जोहरा या १० वी ला असताना वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले. जोहरा यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना समजल्यावर त्या खूपच नाराज झाल्या कारण एवढ्या कमी वयात लग्न करण्याच्या विरोधात त्या होत्या. जोहरा यांचे लग्न लांबवले जावे यासाठी त्यांनी जोहरा यांना दहावीमध्ये तीन वेळा नापास केले. कारण दहावी होत नाही तोपर्यंत जोहरा यांचे लग्न झाले नसते.
जोहरा यांनी १९३५ साली उदय शंकर यांच्यासोबत डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या चित्रपटांमध्ये एक चरित्र कलाकाराच्या रूपात समोर आल्या. त्यांनी उदय शंकर यांच्यासोबत १९४० पर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये डान्स परफॉर्मन्स दिले. त्यानंतर त्या उदय शंकर यांच्या डान्स ग्रुपच्या ट्रेनर झाल्या. पुढे त्यांची भेट इंदोरच्या एका शास्त्रज्ञ, पेंटर आणि डान्सर असलेल्या कामेश्वर सेहगल यांच्याशी झाली. दोघे प्रेमात पडले मात्र जोहरा मुस्लिम तर कामेश्वर हिंदू होते. त्यामुळे घरातून विरोध झाला. आपल्या कुरुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी १९४२ साली लग्न केले.
हिंदी चित्रपटांमध्ये जोहरा यांनी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केले. १९४६ साली त्यांनी ‘धरती के लाल’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. जोहरा सेहगल यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून रणबीर कपूरपर्यंत सर्वच पिढीतील कलाकारांसोबत काम केले. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्यांनी चीनी कम, हम दिल दे चुके सनम, चलो इश्क लड़ाएं, अफसर, द गुरु, तमन्ना, वीर जारा, सांवरिया आदी चित्रपटांमध्ये काम केले.
जोहरा सेहगल यांना खाण्याची फारच हौस होती. त्यांना सर्वात जास्त पकोडे, कढी आणि मटण कोरमा आवडायचा. घरत पाहुणे आले की त्या लगेच पकोडे बनवण्यास सांगायच्या आणि पाहुण्यांपेक्षा जास्त स्वतःच खायच्या. २०१० साली त्यांना भारत सरकारच्या पदमविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १० जुलै २०१४ साली जोहरा यांनी या जगाचा निरोप घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-