Friday, April 19, 2024

बाथटबमध्ये श्रीदेवीला ‘त्या’ अवस्थेत पाहून सुन्न झाले होते बोनी कपूर! वाचा नेमकं काय घडलं होतं त्या काळरात्री…

‘चांदनी’ हे नाव ऐकल्यानंतर सिनेरसिकांच्या मनात सर्वप्रथम नाव येतं, ते म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘श्रीदेवी’चं. आपल्या हटके अदांनी भरलेल्या अभिनयाने तिने सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडले होते. तिनं बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांसोबत सिनेमात काम केले. यामध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनिल कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, दिलीप कुमार यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. ती आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होती. परंतु ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी तिनं या जगाचा निरोप घेत आपल्या चाहत्यांच्या मनावर घाव घातला होता. तिच्या जाण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कोणालाही याबाबत विश्वास पटत नव्हता की, श्रीदेवी आपल्यात राहिली नाहीये. तिचा दुबईतील एका हॉटेलच्या रूममधील बाथटबमध्ये बुडल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी सर्वांच्या तोंडात एकच प्रश्न होता की, नेमकं त्या रात्री काय झालं होतं आणि तिचा मृत्यू कसा झाला होता? तिच्या शेवटच्या वेळी तिचे पती बोनी कपूर तिच्यासोबत होते. त्या रात्री काय झाले होते, हे त्यांनी सांगितले होते. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया…

बोनी कपूर, श्रीदेवी आणि खुशी कपूर हे २० फेब्रुवारी, २०१८ रोजी झालेल्या कौटुंबिक लग्नसोहळ्यात सामील होण्यासाठी दुबईत दाखल झाले होते. यानंतर बोनी कपूर काही कामानिमित्त लखनऊला परत आले होते, तर श्रीदेवी दुबईमध्येच राहिली होती. यानंतर २४ फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवीचा मृतदेह बाथटबमध्ये पाहून बोनी कपूर सुन्न झाले होते. त्या रात्री काय झालं होतं आणि श्रीदेवीसोबत त्यांचं शेवटचं काय बोलणं झालं होतं?, हे सर्व बोनी यांनी आपला मित्र आणि ट्रेड ऍनालिस्ट कोमल नाहटा यांना सांगितले होते. हे सर्व कोमल यांनी आपल्या ब्लॉगवर पब्लिश केले होते. तसेच आपल्या ट्विटर हँडलरही शेअर केले होते.

बोनी कपूर यांनी कोमला नाहटा यांना सांगितले होते की, “२४ फेब्रुवारीला सकाळी श्रीदेवीसोबत माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी तिने मला सांगितले की, ‘पापा (श्रीदेवी बोनी यांना या नावाने बोलवायची)’ मला तुझी आठवण येत आहे.’ परंतु मी तिला सांगितले नाही की, मी त्याच दिवशी संध्याकाळी तिला भेटण्यासाठी दुबईला येत आहे. जान्हवीला असे वाटत होते की, मी दुबईला यावे. कारण तिला भीती होती की, तिचा आई, जिला एकटं राहण्याची सवय नव्हती, ती आपले पासपोर्ट किंवा इतर कोणती महत्त्वाची वस्तू हरवू शकते.”

बोनी कपूर यांना श्रीदेवीला सरप्राईझ द्यायचे होते, त्यासाठी ते दुबईला पोहोचले होते. त्यांनी श्रीदेवीला दुबईच्या ‘एमिरेट्स टॉवर्स’ या हॉटेलमध्ये पोहोचून सरप्राईझ दिले होते. हॉटेलमधून बनावट चावी घेऊन त्यांनी श्रीदेवीच्या खोलीचा दरवाजा उघडला होता आणि श्रीदेवीला आश्चर्यचकित केले होते. त्यांनी सांगितले होते की, “श्रीदेवी मला म्हटली होती की, तिला अंदाज होता की मी तिला भेटण्यासाठी दुबईला येऊ शकतो. यानंतर मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो. बाथरूममधून बाहेर येत मी तिच्यापुढे रोमँटिक डिनरला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. मी श्रीदेवीला विनंती केली की, दुसऱ्या दिवशी शॉपिंग करणे रद्द कर. कारण परत येण्याचे तिकीट बदलायचे होते. आम्हाला २५ फेब्रुवारीच्या रात्री भारतात परतायचे होते. शॉपिंगसाठी २५ तारखेला दिवसभरातील खूप वेळ मिळू शकला असता. श्रीदेवी आताही डिनर करण्याच्या मूडमध्ये होती आणि ती रोमँटिक डिनरसाठी तयार होण्यासाठी अंघोळीला गेली.”

बोनी यांनी पुढे बोलताना म्हटले होते की, “मी लिव्हिंग रूममध्ये गेलो, तर श्रीदेवी मास्टर बाथरूममध्ये अंघोळीला आणि तयार होण्यसाठी गेली. लिव्हिंग रूममध्ये मी दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाच्या क्रिकेट सामन्याचे अपडेट घेण्यासाठी टीव्ही पाहू लागलो. त्यानंतर मला काळजी वाटली की, शनिवारी सर्व हॉटेलमध्ये गर्दी असेल. जवळपास ८ वाजले होते, अशामध्ये मी श्रीदेवीला लिव्हिंग रूममधूनच आवाज दिला. मी दोन वेळा तिला बोलावले. परंतु तिच्याकडून प्रत्युत्तर आलं नाही. त्यानंतर मी बेडरूममध्ये आलो. बाथरूमचा दरवाजा वाजवला आणि त्यानंतर तिला आवाज दिला. आतमधून पाण्याचा आवाज ऐकून, मी ‘जान’ असा आवाज दिला.”

“जेव्हा श्रीदेवीची कोणतीच प्रतिक्रिया आली नाही, तेव्हा मला काळजी वाटू लागली. मी धक्का देऊन दरवाजा उघडला. दरवाजा आतमधून बंद नव्हता. मी पाहिले की, श्रीदेवी बाथटबमध्ये पूर्णपणे बुडली होती. तिच्याकडून कसलीही हालचाल होत नव्हती,” असे ते पुढे बोलताना म्हणाले होते.

कोमल नाहटा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शेवटी लिहिले होते की, “जे काही झाले, त्यासाठी कोणीही तयार नव्हते. श्रीदेवी पहिल्यांदा बुडली, त्यानंतर बेशुद्ध झाली की आधी बेशुद्ध झाली आणि मग बुडली. कदाचित याबाबत कोणालाही माहिती पडणार नाही. बाथटबमधून थोडंही पाणी खाली सांडले नव्हते. श्रीदेवीला कदाचित एक मिनिटही संघर्ष करण्यासाठी वेळ मिळाला नाही. कारण जर तिने बुडताना आपले हात-पाय चालवले असते, तर थोडं तरी पाणी बाथटबमधून बाहेर आले असते. परंतु खाली पाण्याचा एक थेंबही नव्हता.”

बोनी कपूर आणि कोमल यांनी सांगितल्यानुसार, अशाप्रकारे श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला होता. आज जरी श्रीदेवी आपल्यात नसली, तरी ती नेहमीच चाहत्यांच्या स्मरणात राहील. श्रीदेवीने आपल्या ५१ वर्षांच्या कालखंडात जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केले होते. तिचा पहिला सिनेमा बालकलाकार म्हणून ‘जूली’ होता, तर तिचा शेवटचा सिनेमा हा ‘मॉम’ होता. यासाठी तिला मरणोत्तर सर्वोत्तम अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त सन २०१८ मध्ये आलेल्या ‘झिरो’मध्येही श्रीदेवीची झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिने कॅमियोची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भाऊ सोपं नाही ‘पंकज त्रिपाठी’ होणं, कधीकाळी स्टूडियोतून धक्के मारून हाकललं होतं.! वाचा कलावंताची संघर्षगाथा

-चिरलेल्या गळ्यासह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह; अमिताभ यांच्यासोबतच्या भुमिका विशेष गाजल्या

-तुफान स्टारडम पाहिलेल्या ‘या’ पाच सेलीब्रेटींना आयुष्याच्या शेवटी केवळ पैसे नसल्याने गमवावा लागला जीव

हे देखील वाचा