५ जी प्रकरणात जुही चावलाच्या अडचणीत वाढ; दंड म्हणून २० लाख रुपये भरण्याचे कोर्टाने दिले आदेश


सध्या आपण ४ जीच्या नेटवर्कचा उपयोग करून इंटरनेट वापरत आहोत. लवकरच ५ जीचे नेटवर्क आपल्याला वापरायला मिळणार आहे. मात्र याचे अनेक दुष्परिणाम देखील होणार आहे. या ५ जी योजनांमुळे होणारे परिणाम लक्षात आणून देत जुही चावल्याने एक याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर दिल्ली हाय कोर्टात सुनावणी झाली.

या सुनावणीमध्ये जुही चावलाला २० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. ५ जी वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणार्‍या खटल्याच्या माध्यमातून, तिने कायद्याच्या प्रक्रियेचा चुकीचा वापर केला. याबद्दल तिला दंड म्हणून २० लाख रुपये जमा करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. अभिनेत्री जूही चावला आणि इतर दोन जणांना ही रक्कम भरण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले, “या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला आहे. या प्रकरणात असे दिसते, की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली आणि म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. हे आरोप त्रासदायक आहेत. एकीकडे तुम्ही फालतू अर्ज करता आणि दुसरीकडे अर्ज मागेही घेता, शिवाय किंमत देण्यास देखील तयार नाही.”

यावेळी जुही चावलाचे वकील मित मल्होत्रा यांनी म्हटले की, “सदरचा दंड हा कोर्टाने रद्द करावा. या विरोधातही याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली.” जुहीला हा दंड भरण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.

जुही चावलाने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, “या ५ जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होत असून, पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती की, ५ जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुले, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट सांगावे.”

पुढे तिने म्हटले आहे की, “माझा मुद्दा ५ जीवर बंदी आणायचा बिलकुल नाहीये. लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही ५ जी तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला सर्वांना हे स्पष्ट सांगायचे आहे की, आम्ही ५ जी तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. तथापि, आम्ही केवळ सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील केले की, ५ जी तंत्रज्ञान सर्व मानवजातीसाठी, पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध लोक, प्राणी सुरक्षित आहे का?, याचे उत्तर देण्यात यावे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.