आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; तर आज आहेत बॉलिवूडचे यशस्वी गायक


आपल्या देशात आणि मनोरंजनसृष्टीत संगीताला प्रचंड महत्व आहे. प्रत्येक चित्रपटात कमीत कमी एक तरी गाणे असतेच असते. याच संगीताने अनेक एक से बढकर एक असे प्रतिभावान संगीतकार आणि गायक आपल्याला दिले आहेत. प्रत्येक गायकाने त्याच्यातले वेगळेपण रसिकांसमोर ठेवले. अशाच या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे कैलाश खेर. भारतीय संगीतामध्ये सुफी गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेणारा हा गायक म्हणजे संगीत क्षेत्रातील एक मोठे प्रस्थ. आपल्या हटके आणि भारदस्त आवाजाने बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱ्या कैलाश यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी.

कैलाश यांचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झालेला. त्यांचे वडील हे काश्मिरी पंडित होते आणि त्यांना लोकगीतांची खूप आवड होती. त्यामुळे साहजिकच कैलाश यांनाही बालपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले. कैलाश यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गाणं गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजामुळे त्यांचे कुटुंबच नाही, तर मित्रपरिवारही आश्चर्यचकित झाले होते. बालपणीच सर्वांना आपल्या आवाजाने घायाळ करणाऱ्या कैलाश यांचा संगीताच्या वाटेवरचा प्रवास वाटतो तितका सोपा आणि सहज नव्हता.

जेव्हा त्यांनी पूर्ण वेळ गाण्यालाच द्यायचे ठरवले, तेव्हा त्यांना घरातून खूप विरोध झाला. कारण त्यांनी पूर्णवेळ संगीतासाठी द्यावा, हे त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. मात्र संगीत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. यातच वयाच्या १३ व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी त्यांनी घर सोडले. ते अनेक ठिकाणी गेले. तेथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या महान लोकांकडून संगीताचे धडे गिरवले आणि लोकसंगीताचे अधिकाधिक ज्ञान संपादित केले. पुढे ते दिल्लीला आले. तिथे त्यांनी संगीताचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्याच्यातून तो थोडेफार पैसे कमाऊ लागले. ते परदेशी नागरिकांनाही संगीताचे धडे द्यायचे.

सन १९९९ हे वर्ष कैलाशच्या आयुष्यातील सरावात कठीण आणि निराशादायी होते. आशेचा कोणताच किरण त्यांना दिसत नव्हता. त्यावर्षी त्यांनी त्यांच्या मित्रासोबत हॅण्डीक्राफ्ट एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. यात त्यांना आणि त्यांच्या मित्राला मोठे नुकसान झाले. हे सहन न झाल्यामुळे कैलाशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते सिंगापूर आणि थायलंडला गेले. तिथे सहा महिने राहून ते पुन्हा भारत आले आणि थेट ऋषिकेशला गेले. तिथे त्यांनी साधू आणि संतांची गाणे गायला सुरुवात केली. कैलाश यांचे गाणे ऐकून सर्व साधू जोशाने नाचायला लागायचे. यासर्व सकारात्मक वातावरणात राहून त्यांचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा आला आणि त्यांनी चित्रपटांसाठी गायन करण्याच्या उद्देशाने मुंबई गाठली.

मुंबईत आल्यानंतर त्यांचा खरा संघर्ष सुरु झाला. अतिशय गरिबीत आणि झोपडपट्टीत राहून त्यांनी अनेक काळ व्यतीत केला. त्यांच्याकडे त्या काळात घालायला चप्पल देखील नव्हती. तुटलेली चप्पल घालूनच ते २४ तास स्टुडिओचे चक्कर मारायचे. मात्र एकदिवस त्यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि संघर्षाचे फळ त्यांना मिळाले आणि संगीतकार राम संपत यांनी त्यांना एक जिंगल गाण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांना ५००० रुपये दिले गेले. त्यांच्यासाठी तेव्हा ते ५००० रुपये काही छोटी रक्कम नव्हती. पहिल्या जिंगलनंतर त्याच्याकडे जिंगल्सची रांगच लागली. त्याने पॅप्सीपासून ते कोका कोलापर्यंत मोठ्या ब्रॅण्डसाठी जिंगल्स तयार केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांचे नाव मोठे होत असले, तरी तेव्हा त्यांच्यासाठी बॉलिवूड अजून दूर होते. चित्रपटांमध्ये गाण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली.

पुढे त्यांना ‘अंदाज’ चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमातील ‘रब्बा इश्क ना होवे’ गाणे त्यांनी गायले. गाणे हिट तर झाले, पण कैलाश यांना अपेक्षित प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. मात्र ‘वैसा भी होता है’ या चित्रपटातील ‘अल्ला के बंदे’ हे गाणे त्यांनी गायले आणि तो एका रात्रीत सुपरस्टार झाला. आजपर्यंत कैलाशने हिंदीत ५०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. यासोबतच त्यांनी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा प्लेबॅक केले आहे. यात पाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया, मराठी आदी भाषांचा समावेश आहे. ‘तेरी दिवानी’ हे गाणं त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरले.

कैलाश यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी २००९ साली मुंबई येथी शीतल यांच्याशी लग्न केले. त्यांना कबीर नावाचा एक मुलगा देखील आहे.

कैलाश यांना अनेक पुरस्करानी देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यात दोन वेळा फिल्मफेयरचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा ऍवॉर्ड ही मिळाला आहे. तर त्याला देशातील सर्वोच्च समजला जाणारा पद्मश्री किताब ही देण्यात आला आहे. कैलाशचा ‘कैलाश’ नावाचा बँड आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल शोज करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.