हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आजपर्यंत जे जे मोठे अभिनेते झाले आहेत त्यापैकी बहुतेक जणांच्या करियरच्या सुरुवातीचे काही सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. राखेतून पुन्हा क्षितिज भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या अभिनेत्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. हा संघर्ष महानायक अमिताभ बच्चन यांनादेखील चुकला नाही तर मग तिथे इतर कलाकारांची काय व्यथा असणार… असेच आणखी एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत ज्यांची देखील अशीच संघर्षमय कथा आहे. मोहनीश बहल यांनी स्वतःच याबद्दल माध्यमांसमोर खुलासा केला होता. 14 ऑगस्ट रोजी मोहनीश बहल त्यांचा 62वा वाढदिवस करत आहेत. यानिमित्ताने चला जाणून घेऊयात त्यांच्याविषयी सर्वकाही…
मोहनीश बहल (Mohnish Bahl) यांनी 1983 मध्ये चित्रपट ‘बेकरार’ मध्ये सहाय्यक भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर तर जणू त्यांच्या फ्लॉप चित्रपटाची रांगच लागली. एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर मोहनीश बहल यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु ऐन वेळी त्यांना ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाची ऑफर आली आणि त्यानंतर त्यांचं संबंध आयुष्यच बदलून गेलं.
बॉलिवूडमधील अपयशाने निराश होऊन मोहनीश हे वैमानिक होण्याचा विचार करीत होते आणि व्यावसायिक फ्लाइंग लायसन्स मिळविण्यासाठी काम करत होते. परंतु, जेव्हा सलमान खान (Salman Khan) याने ‘मैने प्यार किया’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी मोहनीश यांच्या नावाची शिफारस केली तेव्हा या सर्व गोष्टी बदलल्या होत्या.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मोहनीश म्हणाले होते की, “एक दिवस सलमान खान आणि मी एकमेकांना रस्त्यात धडकलो आणि तेव्हापासून आम्ही मैत्री केली. सलमान त्यावेळी चित्रपट निर्मितीच्या व्यवसायातदेखील जाण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून जेव्हा त्याला ‘मैंने प्यार किया’मध्ये ब्रेक मिळाला, तेव्हा त्याने खलनायकाच्या भूमिकेसाठी माझ्या नावाची शिफारस केली. त्या दिवसांत खलनायकाची भूमिका साकारणं मला खूप अवघड जात होतं. कारण मी एक फ्लॉप हिरो होतो. परंतु अशा परिस्थितीतही मी खलनायकाची भूमिका साकारली. माझ्यासाठी ही खऱ्या अर्थाने कारकीर्दीची सुरुवात ठरेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.”
मोहनीश बहल यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. मोहनीश यांच्या पणजी रतनबाई शिलोत्री यांच्यापासून जी घरात अभिनय परंपरेला सुरुवात झाली ती आजतागायत सुरूच आहे. त्यानंतर आजी शोभना समर्थ, आई नूतन, मावशी तनुजा आणि आता बहीण काजल आणि तनिशा मुखर्जी, याशिवाय स्वतः मोहनीश असा हा अभिनयाचा वारसाच या कुटुंबाला लाभला आहे. यापुढे या कुटुंबातून आणखी कलाकार घडले आणि बॉलिवूडमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको.
मोहनीश यांनी आतापर्यंत ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘वास्तव’, ‘शोला और शबनम’, ‘पानिपत’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत आणि अजूनही ते बॉलिवूडमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘देवों कें देव महादेव’ बनून घराघरात पोहोचला मोहित रैना, ‘हे’ रंजक किस्से तुम्हाला माहितीच पाहिजेत
‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; एक नजर टाकाच