रणबीर कपूर, बॉलिवूडमधील हँडसम आणि चार्मिंग अभिनेता. रणबीर जेवढा त्याच्या लुक्समुळे आणि पर्सनॅलिटीमुळे ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या प्रभावी आणि दमदार अभिनयामुळे देखील चर्चेत असतो. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि नावाजलेल्या कपूर घराण्यातल्या या मुलाने कपूर घराण्याचा हा वारसा अगदी यशस्वी पद्धतीने चालवला आहे. रक्तातच अभिनय असलेल्या रणबीरला या क्षेत्रात येऊन नुकतेच १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २००७ साली रणबीरचा पहिला सिनेमा ‘सांवरिया’ प्रदर्शित झाला होता.

संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमातून रणबीरसोबतच सोनम कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिनेमा जरी फ्लॉप ठरला असला तरी सिनेमातील गाणी आणि रणबीर दोघेही तुफान गाजले. रणबीरने त्यांच्या पहिल्याच सिनेमात अपयश पाहिले. मात्र त्यानंतर त्याने प्रत्येक सिनेमात प्रभावी अभिनय करत स्वतःला एक उत्तम म्हणून सिद्ध केले. रणबीरने त्याच्या या प्रवासात अनेक उत्कृष्ट आणि सुपरहिट सिनेमे केले, मात्र त्याच्या या १४ वर्षांमध्ये त्याने ६ अशा सिनेमांना नकार दिला ज्यांनी प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या मनावर राज्य करत बॉक्स ऑफिसावर यशाचे झेंडे गाडले. आज या लेखातून आपण रणबीरने कोणत्या ६ सिनेमांना नकार दिला ते जाणून घेणार आहोत.
जिंदगी ना मिलेगी दोबारा :
जोया अख्तर दिग्दर्शित आणि ऋतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल अभिनित हा सिनेमा आजही लोकं आवडीने बघतात. या सिनेमातील हृतिकचा रोल रणबीरला ऑफर झाला होता, मात्र गणितं न जुळल्याने त्याने या सिनेमाला नकार दिला. पण जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून रणबीरला नक्कीच पश्चाताप झाला असणार.

गली बॉय :
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा हा सिनेमा आणि यातील गाणी तुफान गाजली. या चित्रपटात रणवीरला एक महत्वाची भूमिका ऑफर करण्यात आली होती, मात्र त्याला रणवीर सिंगसोबत सहायक भूमिका करायची नसल्याने त्याने या भूमिकेला नकार दिला. सिनेमा हिट देखील झाला आणि त्यावर्षीच्या सर्व पुरस्कारांवर त्याने मोहोर देखील उमटवली.

दिल धडकने दो :
जोया अख्तरच्याच या सिनेमात रणबीरला रणवीर सिंगचा रोल ऑफर करण्यात आला होता. तर प्रियंका चोप्राच्या जागी करीना कपूरला घ्यायचा विचार होता. जर असे झाले असते तर रियल लाईफमधील भावाबहिणीची जोडी रील लाईफमध्ये देखील दिसली असती. मात्र इथे देखील काही गोष्टी जुळून न आल्याने रणबीर ऐवजी रणवीर सिंगला ही भूमिका देण्यात आली.

२ स्टेट्स :
आलिया आणि अर्जुन कपूर यांचा हा सिनेमा खूप गाजला. चेतन भगत यांच्या पुस्तकावर आधारित असलेला हा सिनेमा आधी रणबीरला ऑफर झाला होता. मात्र त्याने सिनेमाला नकार दिला आणि ही भूमिका अर्जुन कपूरच्या झोळीत पडली. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.

बँड बाजा बारात :
रणवीर सिंगचा पदार्पणाच्या सिनेमा असणारा बँड बाजा बारात हा सरावात आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याला या सिनेमाची कथा न आवडल्याने त्याने ही भूमिका नाकारली. जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि हिट झाला तेव्हा त्यांना नक्कीच सिनेमा नाकारल्याचे दुःख झाले असेल.

देली बेली :
कल्ट सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिनेमाने इमरान खानला एक नवी आणि मोठी ओळख मिळवून दिली. या सिनेमातील त्याची भूमिका आधी रणबीर कपूरला ऑफर झाली होती.

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव
–अल्लू अर्जुन अडकला अडचणीत, अपमानकारक जाहिरातीमुळे तेलंगणा सरकार पाठवणार नोटीस










