मित्रांनो राजकारण हा येड्यागबाळ्याचा खेळ नव्हे, असं आपण नेहमीच ऐकत असतो. राजकारण म्हणजे घराणेशाहीवर पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा असंही चित्र अनेकदा पाहायला मिळतं. पण काहीही असलं तरीही भारतात प्रत्येकाला राजकारणाचं थोडंफार का असेना वेड हे असतचं. म्हणूनच भारतात गल्लीबोळात युवा नेते दरदिवसाला तयारही होत असतात. ‘दोन हाना पण नेता म्हणा’ इतकंच या भावड्यांच म्हणण असतं.
बरं हे राजकारणाचं याड फक्त गल्लीतल्या पोरांनाच आहे असंही नाही बर का. या क्षेत्राचा मोह भल्याभल्या बॉलिवूड कलाकारांनाही आवरला नाही. यांपैकी काही कलाकार तर राजकारणातंही स्टार बनलेत. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया बॉलिवूड आणि राजकारण अशी दोन्ही मैदाने गाजवलेले कलाकार.
अमिताभ बच्चन
अभिनयाचा रंगमंच गाजवता गाजवता राजकारणाच्या फडात शिरणाऱ्या कलाकारांच्या यादीतील पहिले कलाकार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. बॉलिवूडवर अनेक दशके आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेले अमिताभ बच्चन १९८४ मध्ये राजकारणाच्या मैदानात उतरले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकारणाचा रस्ता धरला. त्यांनी इलाहाबाद मतदार संघातून निवडणूक लढवली होती आणि दणदणीत विजय देखील मिळवला होता. तेव्हाच्या दिग्गज राजकारणी हेमवती नंदन शर्मा या दिग्गज नेत्याचा त्यांनी पराभव केला होता. पण त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला.
शत्रुघ्न सिन्हा
बॉलिवूडच्या जगात असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी राजकारण आणि अभिनय ही दोन्हीही मैदाने यशस्वीपणे गाजवलीयेत. या कलाकारांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव आघाडीवर आहे. हिंदी चित्रपट जगताला अनेक सुपरहीट चित्रपट देणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांची अभिनय कारकिर्दही सुपरहीटंच ठरताना दिसत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेता शेखरसुमनचा पराभव करत बिहारच्या राजकारणात प्रवेश केला होता. पडद्यावर खलनायक म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा राजकारणात मात्र नायक ठरले. शत्रुघ्न सिन्हा यांनी राज्यस्तरावर आरोग्यमंत्रीपद भूषवलंय तर केंद्रातही ते अनेकदा मंत्री राहिलेत.
जया बच्चन
महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनीही राजकारणात यश मिळवलं. अजूनही त्या राजकारणात क्रियाशील आहेत. त्याआधी जया बच्चन एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. गुड्डू, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अभिनयाइतकीच जया बच्चन यांची राजकीय कारकिर्दही यशस्वी राहीलीये. २००४ पासून जया बच्चन राजकारणात सक्रिय आहेत. २००४ मध्ये त्यांना समाजवादी पार्टीकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले. आपल्या बिंनधास्त आणि स्पष्ट भूमिकांमुळे त्यांनी सभागृह गाजवलंय.
हेमा मालिनी
जया बच्चन यांच्याप्रमाणेच ड्रिम गर्ल म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही राजकारणाचे मैदान दणाणून सोडले आहे. आपल्या घायाळ सौंदर्याने सिने जगतावर राज्य करणाऱ्या हेमा मालिनींनी राजकारणातही आपले वर्चस्व सिद्ध केले. १९९९ मध्ये अभिनेता विनोद खन्ना यांचा त्यांनी प्रचार केला होता आणि इथूनच त्यांची राजकारणात एंट्री झाली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये हेमा मालिनी या भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या होत्या. सध्या हेमा मालिनी ‘मथुरा’ या मतदार संघाच्या खासदार आहेत.
स्मृती इराणी
सध्या देशाच्या राजकारणात स्मृती इराणी हे नाव चांगलेच गाजत आहे. एक सामान्य घरातील मुलगी, अभिनेत्री ते केंद्रिय मंत्री असा प्रेरणादायी प्रवास स्मृती इराणी यांनी केलाय. छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. वर्ष २००३ मध्ये भाजपा पक्षात प्रवेश करत स्मृती इराणी यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांचे राजकीय वजन वाढत गेले. २०१४ मध्ये त्यांनी अमेठीमधून तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. सध्या स्मृती इराणी या केंद्रात मंत्रीपदावर असून भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
उर्मिला मातोंडकर
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उर्मिला मातोंडकर हे नावही चांगलेच गाजत आहे. उर्मिला मातोंडकर यांनी अगोदर सिने जगतात आपल्या अभिनयाची जोरदार छाप पाडली होती. एक यशस्वी अभिनत्री म्हणून तिचे नाव आजही घेतले जाते. जितकी लोकप्रियता उर्मिला यांला सिने जगताने मिळवून दिली, तितकीच ती राजकारणातही मिळताना दिसत आहे. वर्ष २०१९ पासून उर्मिलाने राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणात भाग घेतलाय. पहिल्याच निवडणूकीत पराभवाची धूळ चाखावी लागल्यानंतर २०२० मध्ये उर्मिलाने शिवसेना पक्षात प्रवेश केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-