Thursday, March 28, 2024

मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेणारा अन् सलमानला धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण?

काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अनेक खुलासे समोर आले. त्यातील एक खुलासा म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गोल्डी ब्रार याने फेसबुवरून याची माहिती दिली. याचवेळी या गँगने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानलाही मारण्याची धमकी दिली आहे. यामागे काय कारण, आणि कोण आहे लॉरेन्स बिश्नोई त्याची गँग याबद्दल या लेखातून जाणून घेऊ.

१९९२ साली पंजाबमध्ये लॉरेन्सचा जन्म झाला. त्याचे वडील पोलिस कॉन्सटेबल होते, तर आई गृहिणी होती. घरातील परिस्थितीही चांगली होती. त्यामुळे लॉरेन्सला हवं ते मिळालं. त्याने शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो चंदीगढच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेला आणि येथेच त्याने गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला. शिकत असतानाच त्याने कॉलेजमधील राजकारणात प्रवेश केला. त्याने पंजाब विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, पण त्यात त्याला पराभव झाला. त्याला हा पराभव जिव्हारी लागला. त्यामुळे दोन गटात भांडणं झाली. यात फायरिंगही झाली. अनेक रिपोर्टनुसार यानंतर त्याच्यावर केसही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, लॉरेन्स गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला. असं म्हणतात की त्याला कुख्यात ग्रँगस्टर जग्गू भगवानपुरी यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील गुरुमंत्र दिला. लॉरेन्स हा शहीद भगतसिंग यांचा भक्त असून त्याने भिंतींवरही त्यांचे फोटो लावले आहेत. आज तो जेलमध्ये असूनही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याला नरेश शेट्टी, संपत नेहरा, सुक्खा यांसारख्या गँगस्टरची साथ मिळाली. त्यांच्या साथीने त्याने मोठी गँग तयार केली. ज्यातील गँगस्टर केवळ देशातच नाही, तर विदेशातही आहेत.

लॉरेन्सला अनेकदा जेलमध्ये जावे लागले आहे. २०१५ मध्ये त्याला कोर्टमध्ये नेत असाताना त्याने पोलिसांना चकमा दिला होता आणि असं सांगितलं जातं की तो नेपाळला गेलेला. तिथून त्याने काही हात्यारे घेतली आणि तो पंजाबला आला. त्यानंतर पुन्हा तो पोलिसांच्या हाती लागला. तो आत्ताही तिहारच्या जेलमध्ये बंद आहे. पण तो जेलमध्ये असला, तरी आपली गँग चालवत आहे. इतकंच नाही, तर १५० च्या आसपास त्याचे फेसबुक आयडी आहेत त्यातील साधारण दोन अकाऊंट तो चालवतो आणि अन्य अकाऊंट त्याचे फॉलोवर्स चालवतात. विशेष म्हणजे त्याच्या अकाऊंटवर त्याचे फोटोही अपलोड होत असतात. तो अनेकदा फोनवरून त्याची गँग चालवत असल्याचेही म्हटले जाते. तसेच त्याच्या गँगमधील लोक ट्रॅवल एजंट, डायमंड व्यापारी, गुटखा व्यापारी, रेस्टॉरंट मालक असे अनेक श्रीमंत लोकांकडून खंडणी वसूल करत असतात. त्यामुळे पैसाही भरपूर मिळतो. इतकंच नाही तर काही रिपोर्ट्सनुसार साधारण ७०० शार्पशूटर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये सामील आहे. ते देशात आणि विदेशात विखुरलेले आहे. त्याचमुळे त्याला बाहेरून मोठा सपोर्ट असून तो मोठमोठ्या सुपारीही घेतो. त्याचमुळे त्याला सध्याचा सुपारी-किंग असंही म्हटलं जातं.

मुसेवाला हत्या प्रकरणातही त्याच्या गँगचा हात असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. गँगस्टर विकी मिद्दुखेडा याच्या हत्याप्रकरणात मुसेवालाचे कनेक्शन असल्याच्या दाव्यामुळे त्याचा बदला म्हणून मुसेवालाची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी लॉरेन्स बिश्नोई याचा यात डायरेक्ट हात नसल्याचे समजत आहे. कारण सध्या लॉरेन्स तिहार जेलमध्ये असून त्याच्याकडे फोनही नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की मुसेवालावर आठ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. या आठ लोकांपैकी दोन लोकं पुण्यातील असल्याचे समोर आले. संतोष जाधव आणि सौरभ महाकाल अशी या दोन पुण्याच्या शूटरची नावे असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगचे मेंबर असल्याचे म्हटले जात आहे.

आता वळूया लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यातील रायवलरीकडे. २०१८ मध्ये लॉरेन्सने सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली. त्याने साथीदार संपत नेहराला सलमानला मारण्यासाठी पाठवले होते, पण यात नेहरा यशस्वी झाला नाही. असं काही वृत्तांत सांगण्यात आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे आणि बिश्नोई समाज काळवीटांची पुजा करतो. पण सलमानने १९९८ साली काळवीटांची शिकार केली होती, त्यामुळे लॉरेन्सने त्याची सुपारी घेतलेली आहे, पण सलमानच्या प्रकरणानंतर लॉरेन्सला स्पेशल जेलमध्ये ठेवण्यात आले असून ज्यात त्याला फोन वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

दरम्यान काही रिपोर्ट्मध्ये असेही म्हटले जात आहे की, कॉलेजच्या राजकारणावेळी झालेल्या दुश्मनीत लॉरेन्सच्या गर्लफ्रेडची हत्या झाली होती. त्यानंतर त्याने गुन्हेगारीला जवळ केले, पण कारण आता तो एक मोठा गँगस्टर झाला असून त्याची गँगही मोठी आहे. त्यामुळे आता पुढे त्याच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहाणेच आपल्या हातात आहे.

हेही पाहा- सलमान खानला धमकी देणारी लॉरेंस बिश्नोई गँग

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा