Monday, May 27, 2024

खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत! WHY I KILLED GANDHI चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाबरोबरच राजकारणातही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यापैकीच एक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे आहेत. आता अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवणार आहेत. ते मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणार आहेत.

मात्र आता त्यांच्या चित्रपटावरून एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’  (Why I Killed Gandhi) चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, या चित्रपटात काम करण्यापूर्वी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परवानगी घेतली होती का?

याच कारणामुळे अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. ज्यावर आता अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचवेळी त्यांनी असे स्पष्ट केले की, या चित्रपटाचे शूटिंग ते राजकारणात येण्यापूर्वी झाले आहे.

आपली प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, “या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ साली झाले होते. कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत.”

पुढे ते म्हणाले, “कलाकार म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली होती आणि ती मी साकारली. त्या विचारधारेचा जेव्हा मी प्रचार आणि प्रसार करतो आणि माझी राजकीय विचारधारा ही वेगळी गोष्ट आहे. व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचा मी आदर करतो. चार पाच वर्षापूर्वी केलेला सिनेमा आहे आणि तो बाहेर आल्यानंतरच त्यामध्ये काय आहे हे मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे.”

आपले म्हणणे मांडत अमोल पुढे म्हणाले, “राजकीय भूमिका घेणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. माझ्या पक्षातल्या लोकांना याला विरोध केला तर वैशम्य वाटण्याचे कारण नाही. कारण ही राजकीय भूमिका आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींना हे मी कळवलेले आहे,” असेही अमोल कोल्हे प्रतिक्रिया देताना म्हटले आहेत.

अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते खासदार आहेत. तसेच ते डॉक्टर देखील आहे. परंतु त्यामध्ये त्यांचे जास्त मन न रमल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी ,‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘राज माता जिजाऊ’, ‘वीर संभाजी’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. ते त्यांच्या चाहत्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा