Saturday, September 30, 2023

‘हा माझा मार्ग एकला’ म्हणणाऱ्या सचिनजींनी 61 वर्षांच्या करिअरमध्ये तयार केली असंख्य नाती, आजही गाजवतायेत सिनेसृष्टी

मनोरंजनाच्या या जगात अनेक जुन्या नव्या कलाकारांनी बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. खूप काही समजत नसले तरी या आभासी जगाशी त्यांची लहानपणीच ओळख होते. बालकलाकार म्हणून त्यांना खूप प्रेम मिळते. मोठे झाल्यानंतर हे कलाकार पुन्हा मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण करतात मात्र बालकलाकार म्हणून त्यांना जे प्रेम, लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते ती मुख्य अभिनेत्याच्या रूपात मिळत नाही आणि हे कलाकार काही काळ संघर्ष करतात मात्र यश न मिळाल्याने त्यांचे मार्ग बदलवतात. काही या क्षेत्रात राहूनच दुसरे विभागात कार्यरत होतात तर काही त्यांचे फिल्डच बदलतात.

आज आपण पाहिले तर मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आधी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले, पण अपेक्षित यश न आल्याने त्यांनी पुन्हा मराठीमध्ये त्यांचा मोर्चा वळवला. याच काही गोष्टींशी थोडे साधर्म्य असलेले आपले मराठी अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर. (sachin pilgaonkar) मराठीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गायक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सचिनजी यांनी देखील हिंदीमध्ये नशीब अजमावून पाहिले. मात्र यश न आल्याने ते मराठी मध्ये सक्रिय झाले, आणि त्यांनी यशाचे शिखर गाठले. आज सचिन पिळगावकर त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश. (sachin pilgaonkar birthday special know his journey and his unknown facts )

सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट,1957 साली मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. त्यांचे वडील चित्रपट निर्माते असल्याने घरात तसे चित्रपटांचे वातावरण होते. वयाच्या चौथ्या वर्षी सचिन यांनी राजा परांजपे यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमातून सर्वोत्कृष्ट अभिनय करत थेट राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. सचिन यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. 1967 साली हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘मजली दीदी’ या सिनेमात काम करत त्यांनी हिंदीमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. या दोन चित्रपटानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मोठमोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

पुढे 1975 साली त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’ या सिनेमातून मुख्य भूमिका साकारत हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘बालिका वधू’, ‘नादिया के पार’, ‘अखियों के झरोको से’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘शोले’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यांना हिंदीमध्ये अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा मराठीकडे वळवला. मराठीमध्ये ‘सचिन’ हे नाव ब्रँड झाले. सचिन यांचा सिनेमा म्हणजे तो हिट होणारच हे सर्वानाच माहित असायचे.

सचिन यांनी 1982 साली आलेल्या ‘माय बाप’ चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकले. या सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र समीक्षकांनी सिनेमाचे खूप कौतुक केले. पुढे 1984 साली त्यांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा सिनेमात दिग्दर्शित केला आणि यात अभिनय देखील केला. याच सिनेमाने त्यांना यशाची चव चाखायला मिळाली. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी त्यांना त्यांचा मार्ग सापडला असल्याने, त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘अशी ही बनवाबनवी’ आदी अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठीमध्ये केले. मराठी विनोदला एका नवीन रूपात प्रेक्षकांपुढे त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून सादर केले.

सचिनजी यांनी फक्त हिंदी,मराठी चित्रपटांमध्येच काम केले असे बिलकुल नाही. त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाने टीव्ही इंडस्ट्री देखील तितकीच जोरदार गाजवली जितका मोठा पडदा गाजवला. 90च्या दशकातील सर्वात कॉमेडी शो म्हणून ओळखला जाणारा ‘तू तू मैं मैं’ हा शो त्यांनी दिग्दर्शित केला. स्टार प्लसवर येणाऱ्या या शोने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. सासू सुनेची विनोदी आणि अनोखी नोकझोक यात अतिशय विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली. त्यांनी दारा सिंग यांची मुख्य भूमिका असणारा ‘हद करदी अपने’ या मालिकेचे देखील दिग्दर्शन केले. यासोबतच सचिनजी यांनी ‘चलती का नाम अंताक्षरी’ या शोचे सूत्रसंचालन देखील केले. २००७ साली सचिनजी आणि सुप्रिया या गोड जोडीने स्टार प्लसवर सुरु झालेल्या ‘नच बलिये’ या डान्सिंग शोच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. सचिनजी यांनी झी मराठीवर ‘एका पेक्षा एक’ हा डान्सिंग शो देखील चालू केला. यात त्यांनी महागुरूंची भूमिका निभावली होती. सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी उंची आणि एक नवीन ओळख मिळवून दिली.

सचिनजी यांच्याबद्दल अधिक सांगायचे म्हणजे सचिनजी यांना उर्दू भाषेचे सखोल ज्ञान आहे. 1967साली ‘मजली दीदी’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान खुद्द मीनाकुमारी यांनी सचिनजींना उर्दू भाषेचे ज्ञान दिले. अनेक कार्यक्रमांमध्ये सचिनजींची उर्दू भाषेवरील पकड आणि प्रेम दिसून येते. कदाचित या एका महत्वाच्या गुणामुळे देखील त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात खांसाहेब ही भूमिका उत्तम वठवली. त्यांच्या करियरमधील ‘खांसाहेब’ ही पहिली नकारात्मक भूमिका होती. सचिनजी उत्तम शायर देखील आहे. त्यांनी त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘हाच माझा मार्ग’ प्रकाशित केली.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची भेट सुप्रिया यांच्याशी झाली आणि कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 1995 मध्ये सचिनजी यांनी अभिनेत्री सुप्रिया यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या वयात 10वर्षांचे अंतर आहे. अतिशय खास म्हणजे सचिन आणि सुप्रिया या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया नावाची एक मुलगी असून, ती देखील या क्षेत्रात कार्यरत आहे. श्रिया पिळगावकरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, सोबतच ती शाहरुख खानच्या ‘फॅन’ सिनेमात आणि ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरीजमध्येही दिसली.

वयाच्या 66 व्या वर्षी देखील सचिन पिळगावकरांचा फिटनेस भल्याभल्याना लाजवणारा आहे. ते आजही त्याच जोशाने, त्याच उमेदीने काम करताना दिसतात.

अधिक वाचा-
‘कोंबडी पळाली’ या गाण्याने मिळाली खरी ओळख, असा होता मराठमोळ्या क्रांती रेडकरचा चित्रपट प्रवास
अभियांत्रिकी सोडून शरत सक्सेनाने मनोरंजन विश्वात पदार्पण, पण ‘या’ लोकप्रिय व्हिलनला आहे ही भीती

हे देखील वाचा