मोठमोठ्या शहरांमधील ट्रॅफिकमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या ट्रॅफिकमुळे कलाकरांना देखील मोठा तोटा होताना दिसतो. अनेकदा कलाकार वेळ वाचवण्यासाठी किंवा ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी त्यांचे चेहरे लपवत सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी देखील प्रवास करताना दिसतात. मात्र एका मराठी कलाकाराला नुकताच या ट्रॅफिकचा अतिशय वाईट अनुभव आला. यातच तो त्याच्या वयस्कर आईला सोबत घेऊन प्रवास करत असल्यामुळे त्याच्या आईला देखील या सर्व त्रासाला सामोरे जावे लागले.
हा अभिनेता म्हणजे सागर तळशीकर. सागर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून, तो अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून आपल्याला दिसत असतो. सध्या तो ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. सोशल मीडियावर लाईव्ह येत त्याने याबद्दल त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्याला या ट्रॅफिकचा अनुभव पुण्यात आला. तब्बल पाच तास तो एकाच ठिकाणी गाडीत अडकला होता.
पुढे सागरने त्याचा लाईव्हचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. सागरने त्याचा हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “मित्रहो, हा काल दिनांक २४ जुलै चा व्हीडीओ आहे. मी दुपारी १.३० ते ७.३० अडकलो होतो. ८.३० ला पुण्यात घरी पोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर ५/६ तास होतो. ७/८०० मीटर मागे पुढे झालो
असू इतकेच ..कुणीही तिथे ट्राफिक कंट्रोल ला नव्हते … माझी ८५ वर्षांची आई जिच नुकतंच मोतीबिंदू ऑपरेशन झालं आहे ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्या पण घ्यायच्या होत्या… असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यानी करायचं काय ? स्त्रियांचे बाथरूमच्या प्रॉब्लेमच काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही. आणि ७.३० ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तिथं कुणीही त्या ट्राफिकला कंट्रोल करायला, वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही ट्राफिक किंवा पोलीस नव्हता, कुणी कार्यकर्ते पण नव्हते ..भयंकर आहे हे …. शक्य असल्यास शेअर करा … चुकून काही कारावसं वाटलं संबंधिताना तर इतराना उपयोगी पडेल .. शक्यता कमीच आहे पण तरी …. सर्वांचे मनःपूर्वक आभार .. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे .. ”
सागरच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत संताप देखील व्यक्त केला आणि सागरची चौकशी केली आहे.