Tuesday, May 28, 2024

अरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश

कलाकार कोणत्याही सिनेमाची निवड करताना खूपच विचारपूर्वक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशा स्क्रिप्ट निवडतात. वर्षाला एक सिनेमा का होईना, पण त्या सिनेमाची स्क्रिप्ट दर्जेदार असावी याची काळजी कलाकार घेत असतात. मात्र, काही कलाकार असेही असतात, जे त्यावेळी काही कारणास्तव सिनेमांना नकार कळवतात. त्यांनी नाकारलेले सिनेमे इतर कलाकारांच्या पदरी पडतात आणि सिनेमे हिटही होतात. सिनेमे नाकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संजय दत्त याचाही समावेश होतो. शुक्रवारी (दि. २९ जुलै) संजय दत्त त्याचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहे. संजयच्या वाढदिवसानिमित्त त्याने नाकारलेल्या सिनेमांबाबत जाणून घेऊया…

संजय दत्त (Sanjay Dutt) याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. एकीकडे त्याच्या काळातील काही कलाकार हल्ली सिनेमातही झळकत नाहीत, तर दुसरीकडे वयाची साठी ओलांडल्यानंतरही तो अनेक हिट सिनेमे देत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शमशेरा’ हा सिनेमा सपशेल फ्लॉप ठरला, पण त्यापूर्वी त्याची भूमिका असलेला ‘केजीएफ २’ या सिनेमाने छप्परफाड कमाई केली होती. १ हजार कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत ‘केजीएफ २’ ब्लॉकबस्टर सिनेमे ठरला होता. मात्र, या लेखात आपण त्याने नाकारलेल्या सिनेमांबद्दल जाणून घेऊया. यापैकी काही सिनेमे सुपरहिटही ठरले होते.

खुदा गवाह
सन १९९२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खुदा गवाह’ (Khuda Gawah) या सिनेमात अमिताभ बच्चन आणि श्रीदेव ही सुपरहिट जोडी दिसली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. मात्र, या सिनेमासाठी निर्मात्यांनी सर्वात आधी अभिनेता संजय दत्तशी संपर्क साधला होता. या सिनेमात निर्मात्यांना नागार्जुन अक्किनेनी यांनी साकारलेल्या भूमिकेत संजय दत्तला घ्यायचे होते. असे म्हटले जाते की, संजयला अमिताभ बच्चन यांच्यापुढे दुसऱ्या मुख्य अभिनेत्याची भूमिका नको होती. त्यामुळे त्याने या सिनेमाला नकार दिला होता. त्यावेळी या सिनेमाने १७ कोटीं रुपयांच्या आसपास कमाई केली होती. ही रक्कम २०२०च्या मानाने १११ कोटी रुपये इतकी होते.

हीरो
अभिनेते जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांची मुख्य भूमिका असलेला ‘हीरो’ (Hero) हा सिनेमा सन १९८३मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. घईंना या सिनेमातील मुख्य भूमिकेत संजयला घ्यायचे होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, संजयने घईंच्या ‘हीरो’ सिनेमाला नकार कळवला होता.

प्रेमग्रंथ
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित या सुपरहिट जोडीने १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमग्रंथ’ (Prem Granth) या सिनेमात काम केले होते. विशेष म्हणजे, हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. या सिनेमासाठी निर्मात्यांनी संजय दत्तशी संपर्क साधला होता. मात्र, त्याने या सिनेमालाही नकार कळवला होता. कारण, तो तुरुंगात असल्यामुळे त्याला या सिनेमात काम करता आले नव्हते.

बाहुबली
या यादीत सन २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ (Baahubali) या सिनेमाचाही समावेश होतो. प्रभास आणि राणा डग्गुबती यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमासाठी संजय दत्तशी संपर्क साधण्यात आला होता. या सिनेमात निर्मात्यांना त्याला कट्टप्पाच्या भूमिकेत घ्यायचे होते. मात्र, इथंही माशी शिंकलीच. या सिनेमाने ६०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

त्रिमूर्ती
जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि शाहरुख खान या दिग्गज अभिनेत्यांनी काम केलेल्या ‘त्रिमूर्ती’ (Trimurti) या सिनेमासाठी आधी संजय दत्तला कास्ट करण्यात आले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील काही भागांची शूटिंग त्याच्यासोबत झाली होती. मात्र, त्यानंतर तो कायदेशीर कचाट्यात सापडला आणि त्यामुळे त्याच्या जागी अनिल कपूर याला कास्ट करण्यात आले होते.

गँगस्टर
अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाखाली २००६मध्ये तयार झालेल्या ‘गँगस्टर’ (Gangster) या सिनेमातही संजय दत्तला घेतले जाणार होते. मात्र, संजयने या सिनेमाला नकार दिला होता. त्यामुळे त्याच्या जागी अभिनेता शायनी आहुजा याला कास्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने या सिनेमातूनच पदार्पण केले होते.

ब्लफमास्टर
अभिनेता अभिषेक बच्चन याच्या २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफमास्टर’ (Bluffmaster) या सिनेमातही संजय दत्तला कास्ट केले जाणार होते. मात्र, संजय दत्तला या सिनेमाची कहाणी आवडली नाही. त्यामुळे त्याने सिनेमात काम करण्यास नकार दिला होता.

प्यार किया तो डरना क्या
सन १९९८मध्ये सुपरस्टार सलमान खान याचा ‘प्यार किया तो डरना क्या’ (Pyar Kiya To Darna Kya) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी निर्मात्यांनी संजय दत्तची विचारणा केली होती. मात्र, संजयला सलमानसमोर द्वितीय मुख्य भूमिका साकारायची नव्हती. त्यामुळे या सिनेमात त्याच्याऐवजी अभिनेता अरबाज खान याला सामील करण्यात आले होते. हा सिनेमा हिट ठरला होता.

रेस २
सर्वाधिक पसंती मिळालेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे सन २०१३मध्ये प्रदर्शित झालेला ‘रेस २’ (Race 2) सिनेमा होय. १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमात संजयला घेतले जाणार होते. तो या सिनेमात जॉन अब्राहमची भूमिका साकारणार होता. मात्र, त्याला या सिनेमाची कल्पना आवडली नव्हती.

हेरा फेरी
सुपरस्टार अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा सन २००० मध्ये प्रदर्शित झालेला ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातही संजय दत्तची एन्ट्री होणार होती. मात्र, कोर्टाच्या फेऱ्यांमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला होता. या सिनेमात सुनील शेट्टी ज्या भूमिकेत दिसणार होता, ती भूमिका संजय दत्तच्या वाट्याला येणार होती.

हे होते संजय दत्त याने नाकारलेले हिंदी सिनेमे. यातील काही सिनेमे फ्लॉप ठरले होते, तर काही सिनेमांनी छप्परफाड कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भांडं फुटलं रे! विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनन्याचा मोठा खुलासा, म्हणाली…
‘लायगर’ सारखा चित्रपट करूनही अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा का फिरतायत लोकलने?
रात्रीच्या वेळी उर्फी जावेदने केले ‘असे’ काही की, बघणारेही होतील हैराण

हे देखील वाचा